नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :
नंदुरबार येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे तर प्रमुख वक्ते म्हणून पर्यवेक्षक पंकज पाठक आणि व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी पर्यवेक्षक विपुल दिवाण उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे तसेच लोकमान्य टिळकांची वेशभूषा धारण केलेला विद्यार्थी तेजस वाडेकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वेशभूषा केलेला विद्यार्थी क्रिष्णा सोनार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात कविता भंडारी यांनी आजचा दिवस का साजरा केला जातो ? लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य , तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान इत्यादी गोष्टी विशद केल्या. प्रमुख वक्ते पंकज पाठक यांनी महान विभूती यांचे जन्म दिवस व पुण्यतिथी आपण का साजरे करतो ? त्यांच्याकडून कोणता बोध घ्यावा ? आपला देश कशामुळे महान होईल ? अशा विविध गोष्टी उदाहरणासह स्पष्ट केल्यात. दरम्यान लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता ५ वी ते १० वी चे जवळपास १०७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. इयत्ता ५ वी च्या गटात अमित बोरसे, दक्ष सोनवणे, दर्शन बंजारा, इयत्ता ६ वी च्या गटात कुणाल पाटील, हर्षवर्धन शिंदे, विराज वायकर, भाविक परदेशी इयत्ता ७ वी च्या गटात गुणवंत गिरासे, दुर्गेश पाटील, वेदांत पाटील, जन्मेंजय पगारे तर इयत्ता ८ वी ते १० वी च्या गटात श्यामसिंग जाधव, धीरज नांदूरकर, अभिषेक सोनार, दादाभाई पाटील, मोहित मराठे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रशांत जानी, राजश्री गायकवाड, मिलिंद चव्हाण, शशिकांत हजारी यांनी केले. अध्यक्षीय समारोपमध्ये मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व तर अण्णाभाऊ साठे यांचे कर्तृत्व अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावित यांनी तर आभार प्रदर्शन भरत पेंढारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .