कायद्यामुळे स्त्री निर्भय राहू शकते- धरमसिंग चव्हाण

शालेयवृत्त सेवा
0

 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभाग वाजेगाव बीटचा उपक्रम ।


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महिला सक्षम व निर्भय कशी होईल या दृष्टीने समाजाने प्रयत्न केल्यास महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाही. आज आपण पाहतो महिला या सर्व क्षेत्रात आघाडीवर असून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. महिलांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध केला पाहिजे, कायद्यामुळे महिला निर्भय राहू शकतात, असे प्रतिपादन धरमसिंग चव्हाण यांनी केले. 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभाग वाजेगाव च्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे महिला अत्याचार कायदा व सुव्यवस्था या विषयावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेडचे पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 


याप्रसंगी वाजेगाव विभागाचे शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी, अब्दुल फहिम, मुख्याध्यापक बाबुराव जाधव, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, शेख फेरोज, शेख शमिमा यांची प्रमुख उपस्थिती होती.


 श्री धरमसिंग चव्हाण पुढे म्हणाले, कोणत्याही महिला किंवा मुलीने अत्याचार सहन न करता त्यांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्यांचा समजपूर्वक स्वतःच्या संरक्षणासाठी अवलंब केला पाहिजे. विविध सरकारी कार्यालयात महिला तक्रार निवारण केंद्र असते. या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महिलांचे समुपदेशन केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 


या कार्यक्रमात वाजेगाव बीट अंतर्गत सर्व महिला शिक्षिका यांची उपस्थिती होती. प्रारंभी श्री चव्हाण यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी कु अंतरा तारू हिने अत्यंत सुरेल आवाजात स्वागत गीत गायले. डॉ अब्दुल कलाम फाउंडेशन, रामेश्वर यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनने दिलेल्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सीमा देवरे यांनी केले.


कार्यक्रम यशस्वितेसाठी रूपाली गोजवडकर, धम्मदीना सोनकांबळे, मुक्ता गोरगिळे, उषा एडके, सादिया अंजूम, आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)