बैल पोळा - शंकर गच्चे

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्राच्या लोकजीवनात सण-उत्सव-समारंभ याला अनन्य-साधारण असे महत्व आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही अनेक सण-महोत्सव साजरे केले जातात. महारष्ट्रातील ग्रामीण-शहरी व आदिवासी समुदायात अनेक सण मोठ्या आत्मियतेने, निष्ठेने व श्रद्धेने हजारो वर्षापासून उत्साहात साजरे केले जातात. या सणांना उत्सवच का म्हणतात. तर ते मानवी शरीराला व मनाला सतत उल्हासित करतात.मनाला सतत नवनवीन गोष्टींविषयी उत्सुकता असते. यातूनच वेगवेगळ्या चांगल्या रूढी आणि परंपरांची निर्मिती झाली. 


या सणावारांच्या निमित्ताने वेगवेगळ्या जाती-धर्माची माणसे आपुलकीने, प्रेमाने व मायेने एकमेकांच्या अधिक जवळ येतात. हाच या सणांच्या पाठीमागील  उद्देश असतो. तसेच निसर्गाचं ऋण फेडण्याचा मुख्य हेतूही साध्य होत असतो. शेतकऱ्यांच्या घरी बाराही महिने सणवार-उत्सव सुरूच असतात. पंचमीनंतर महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण श्रावण महिना संपतेवेळी म्हणजे श्रावण अमावास्येला येतो. भारतीय ग्रामीण संरचनेतील पोळा हा सण तसा कृषी संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा सण आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह काही भागात हा सण श्रावण अमावास्येला पश्चिम महाराष्ट्रात हा सण भाद्रपद अमावास्येला साजरा करतात. 


आदिवासी भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.महाराष्ट्रातली मंडळी ही उत्सवप्रिय आहे. मुळात बैल हा प्राणी अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, मालकाप्रती निष्ठा ठेवणारा, तसेच मायाळू व संवेदनक्षम असल्यामुळे त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठीच हा सण आपण साजरा करतो. पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी खांदेमळण असते. बैलाच्या खांद्याला तूप आणि हळद लावली जाते. इथून पुढे खऱ्याअर्थाने शेतीची कामे गतिमान होत असतात  म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे अत्यंत महत्व आहे.खांदेमळण करताना म्हटले जाते. आज आमंत्रण उद्या जेवायला असे म्हणून कासर्‍याने परातीवर वाजवले जाते. बैलांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते.


त्याच्या कानात काहीतरी सांगितल्या जाते. पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे बैलांना शेतात चरण्यासाठी सोडले जाते. भरपेट चारा खाल्ल्यानंतर मग त्यांना नदीवर नाहीतर विहिरीजवळच्या हौदावर स्वच्छ पाण्याने अंघोळ घातल्यानंतर त्यांच्या शिंगांना वेगवेगळा रंग लावला जातो. याविषयी कवी यशवंत म्हणतो शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार. काही शेतकरी भगवा, पिवळा, निळा, लाल, हिरवा व केशरी रंगही बैलाच्या शिंगांना लावतात. बैल हा कृषीसंस्कृतीतील अत्यंत महत्वाचा प्राणी. तो माणसापेक्षा जास्त निष्ठावान व मायाळू असतो. बैलाच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाच्या कापडी झुली घातल्या जातात. झुली घातल्यानंतर तर बैलांचा रुबाब हा अधिकच वाढतो. तो दिसायलाही छान धिप्पाड व रुबाबदार दिसतो. 


बैलाला घुंगरमाळा, बाशिंग, म्होरके, कान्ह्या, गोंडे अशा साज-शृंगाराने सजवले जाते.  वर्षातला हा सण बैलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही अत्यंत महत्वाचा असतो. शेतकरी राजा या दिवशी खूप आनंदात असतो. गावातील सगळ्या बैलांना ओळीने, जोडीने गावातील वेशीजवळ आणल्या जाते. एका मागून एक अशा बैलजोड्या रांगेत उभ्या असतात. अनेक हौशी शेतकरी आपल्या बैलांसमोर वाद्य वाजवून बैलांच्या अंगामध्ये संचार घडवून आणत असतात. वाजंत्र्याच्या जोशामुळे बैलामध्येही तो जोश यायला लागतो. सर्वच शेतकरी, बैलमालक नव्या कोऱ्या कपड्याने सजलेले असतात. त्यांच्याही आयुष्यातील बैलपोळा हा सण अतिशय महत्वाचा असतो. शेती आणि बैलामुळे स्वत:च्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची जाणीवही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर झळकत असते. ते बैलांचा कासरा आपल्या हातात धरून बैलपोळा सुटण्याची वाट पाहत असतात. पोळा ऐन रंगात येतो. मारुतीच्या पाराजवळ सर्व बैलांचं लग्न लावले जाते. लग्न लागल्यानंतर मानकऱ्याची बैलं प्रथम वेशीमधून गावात प्रवेश करतात. अन मग हळूहळू बाकीच्या सर्वांच्या बैल जोड्या देखिल वेशीतून आपापल्या घराकडे जातात. थोडक्यात पोळा फुटतो. शेतकरी आपल्या जवळचे नारळ वेशीला फोडतात मग  शर्यत लागावी तशी बैलं, गायी, माणसं नुसती एका मागून एक दुसऱ्याच्या मागे धावतात, पळतात, पडतात. परंतु यातील आनंद अवर्णनीय आहे. घरून बैलजोडी धरून पुन्हा मारुतीच्या मंदिराकडे दर्शनासाठी बैलांना आणल्या जाते. आणि मग त्यांना धोतराच्या आड झाकून ठेवलेले “जू” लाकडी बाजावर असते ते जू एका दिवसासाठी का होईना लपवून ठेवलेले असते. 


बैलाची उत्सुकता असते की, या बाजेवर काय असेल? तर तिथे जू आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो. शेतकऱ्याची पत्नी बैलाच्या पायावर पाणी टाकून तसेच कपाळाला हळदी कुंकू लावून बैल जोडीला ओवाळते. त्यांची पूजा करते. बैलाच्या बरोबरच शेतकरी राजा व लहान मोठी मुले यांनाही ओवाळले जाते. नंतर बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. यावेळी गाय, कालवड, गोरा यांचीही पूजा करतात. भारतीय संस्कृतीत बैलास अनन्य साधारण असे महत्व आहे. अनेक संदर्भाने नटलेला पोळा हा सण महारष्ट्रात वेगवेगळ्या रूढी, प्रथा, परंपरांनी पहावयास मिळतो. बैलाच्या कष्टाविषयी एक लोकगीत असे..


बैल ईश्वराची कृपा

बैल अल्लाची नमाज,

बैल इसा आणि येशू

पाळू जुनाच रिवाज.


बैल ईश्वराची कृपा आहे. ईश्वराचे अस्तित्व आहे. तसेच तो मुस्लिमांची नमाज आहे. बैल हिंदू-मुस्लीमच नव्हे तर इतर धर्मानेही त्याचे अस्तिव मान्य केलेले आहे. बैल माणूस आहे, देवदूत आहे व ईश्वरही आहे. आणि म्हणूनच त्याची पूजा करण्याची खूप जुनी असलेली विचारधारा आम्ही ती रूढी, प्रथा, परंपरा, रिती कायम ठेवतो.


बैल माय आणि बाप

धान्य देणारी माऊली,

कसा धीर देतो राजा

जन्मभराची सावली.


बैल आई आहे तसाच तो पोसणारा बापही आहेच. या शिवाय वर्षभर पुरून उरेल असं धान्य देणारी ती माय-माउलीच आहे. हा धीरोदात्तपणा आपल्याला अडी-अडचणीला मदत करणारा धीर देणारा “राजा”च आहे. तसेच बैल म्हणजे जन्मभराची थंडगार सावली देणारं झाडही आहे. बैलाशिवाय कुणबीक होऊच शकत नाही. 

बैल गोठ्यातला श्वास 

महादेवाचा निवास,

कसे उपकार फेडू

बैल पोटातला घास.


बैल शेतातील गोठ्यातला श्वाश आहे, हुंकार आहे. भगवान शंकराचा त्या गोठ्यात म्हणूनच निवास असतो. बैलाचे उपकार अनंत आहेत. ते फिटतच नाहीत. कारण तो मानवाच्या पोटातील अन्नाचा कण आहे. बैलामुळेच शेतकऱ्याची मुले पोटभर अन्नाचा आस्वाद घेतात. बैल भरण-पोषण करणारा निसर्गाचा अग्रदूत आहे. 

बैल घराची विनंती

बैल मनाची श्रीमंती,

माझ्या बापासारखीच

त्याची रानात भ्रमंती.


घरादारातील माणसं जसा एकमेकांचा शब्द पाळतात. तो शिरसावंद्य मानून कामाला लागतात. तशाच पद्धतीने बैल जेव्हा वाटेल तेव्हा काम करायला तयार असतो. त्याला ना रात्र असते ना दिवस. तो आपली विनंती मान्यच करतो. ज्याच्या घरी बैल आहे त्या माणसांची  आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरीही ती मनाने “श्रीमंत” असतात.


बैल नांगराचा फाळ

बैल हत्तीचही बळ,

असा कसा आला काळ ?

बैल बाजाराचा तळ.


बैल नांगरांचा फाळ आहे नांगर बलरामाचा आहे. खालची माती वर करणारा व वरची माती खाली नेणारा हा नांगर. अंतर्बाह्य बदल घडवणारा बैलच होय. दारिद्र्यातून भरभराटीकडे नेणारा बैलच आहे. तो हत्तीच बळ आहे. एका हत्तीचच नव्हे तर हजार हत्तीचही बळ आपल्यात घेऊन वावरणारा हा बैल ईश्वराचीच देणगी  आहे. त्याचाच प्रसाद आहे. परंतु आज मात्र असा भयंकर काळ आलेला आहे की, आख्ख्या गावात बोटावर मोजण्याइतक्या माणसांच्या दारीच बैलाची दावण आहे. बैल बाजारात विकण्यासाठी आलेला असतो, बैल बाजाराच्या तळात दिसतो. प्रत्येक शेतकऱ्यांना बैल सांभाळणे परवडत नसल्यामुळे तो बाजारात त्याला विकायला घेऊन जातो. शेतकऱ्याला तो बैल विकावासा वाटत नाही. परंतु खाण्याची आबाळ, निसर्गाचा लहरीपणा, अपुरा पाऊस, वैरणपाण्याचा प्रश्न, सांभाळण्याची कट-कट, त्याचं आरोग्य अशी एक ना अनेक कारणं त्यामुळे बैल बाजाराच्या तळात दिसतो.


बैल मातीतला मोती

कसं तुझं हे जगणं ?

किती यंत्र आले तरी

तुला नाही रे मरण !


बैल हा मातीमधील सोनं, चांदी आहे. नव्हे नव्हे बैल हा मातीतला “मोती” आहे. परंतु त्याच जगणं कसं आहे. हे जर आपण पाहिलं तर अंगावर शहारा येतो. तरी पण बैल माणसासारखा कण्हत नाही, कुथत नाही. दिलेलं काम मोठ्या निष्ठेने चोखपणे बजावतो. म्हणूनच या शेती व्यवसायात कितीही आधुनिकता आली, कितीही यंत्रे आली तरी कष्ट करणाऱ्या माणसाला, मातीला, शेतीला आणि बैलाला मरण नाही. हेच यावरून लक्षात येते. यापुढेही बैलाचे महत्त्व राहणारच आहे. त्यामुळे काल बैलाला जे महत्व होतं ते आज, उद्या व परवाही राहणारच आहे. 


बैलपोळ्या निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 


लेखक- शंकर नामदेव गच्‍चे नांदेड

मोबाइल नंबर -८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)