वाडीपुयड नवीन शाळेत बाल वारकऱ्यांचा भक्तिसोहळा

शालेयवृत्त सेवा
0

 



वाडीपुयड नवीन शाळेत बाल वारकऱ्यांचा भक्तिसोहळा

पंढरपूरची वारी अनुभवली विद्यार्थ्यांनी !



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. 
त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीपुयड नवीन येथे छोट्या वारकऱ्यांनी आषाढी उत्साहात साजरी केली.


 चिमुकल्या हातातील टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा अन् माऊली… माऊली… च्या गजरात रिंगण केले.  छोट्या छोट्या  वारकऱ्यांनी गळ्यात टाळ घेऊन पांडुरंग हरी …., ज्ञानेश्वर माऊली.., विठ्ठल विठ्ठल विठ्ठला.. अशी भक्ती गीते व भजन गात वातावरण भक्तिमय केले. यावेळी विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत वारीत सहभागी झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता कदम, सहशिक्षिका सौ. साधना बेंद्रे यांच्या नियोजनातून एरवी शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले आणि मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारी साडी घालून आली होती.


 विठ्ठल नामाचा गजर यावेळी या चिमुकल्यांनी केला. अवघी शाळाच दिंडी सोहळ्यात भक्तिरसात तल्लीन झाल्याची पाहायला मिळाली.
खरं तर मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे आषाढी वारीचा सण शाळेत साजरा झाला नाही. पण यावर्षी मोठ्या उत्साहात हा सण चिमुकल्यांनी साजरा केला. यातील काही चिमुकल्या मंडळींनी तर पहिल्यांदा शाळा आणि दिंडी अनुभवली आहे.
या विशेष उपक्रमाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव जाधव यांनी शाळेचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)