कविता : मना - मनातल्या.. कवी प्रा. विलास गायकवाड

शालेयवृत्त सेवा
0

 



कर पेरणी हर्षाची !


गर्द रात्र काळोखाची,

आस त्यातही उद्याची.

दु:खे अनंत जीवनी,

सत्व परिक्षा दैवाची .


क्षण सुखांचे तोटके,

शल्य हृदयी बोचते.

स्वप्न उद्याचे सोनेरी,

रित्या अंगणी हसते.


ओसरून गेला काळ,

रंग स्वार्थाचे भरले .

मद,मोह,गर्व,स्वार्थ,

मना अंतरी रूजले .


झाली अबोल माणसे,

प्रेमांकूर कोमेजले .

दुभंगली नातीगोती ,

दिस कालचे सरले .


गर्द रात्र काळोखाची,

आस त्यातही उद्याची.

धीर ठेवूनी जीवनी ,

कर पेरणी हर्षाची .


- प्रा.गायकवाड विलास / लातूर

_________________________________


⬛ श्रावण सरी


मृतिका गंध,

दरवळे दिशांत,

रानावनात.


श्रावण सरी,

दवबिंदू सोनेरी,

भासे रूपेरी.


इंद्रधनुष,

निळ्या नभावरती

रंग संगती.


निर्झर वाहे,

दऱ्या कपारीतूनी,

मंजूळ गाणी.


मयूर नाचे,

पिसारा फुलवूनी,

दंग होवूनी.


रम्य सोहळा,

सृष्टीचे वरदान,

करा जतन.


श्रावण सरी,

जाता त्या बरसूनी,

हर्ष अंगणी .


- प्रा.गायकवाड विलास / लातूर

_______________________________


⬛ प्रकाश भाग्याचा !


पूर आसवांचा,

लोचनी दाटला.

प्रकाश भाग्याचा,

कुठे तो लोपला?


श्रमाचे फलित,

कधी ना मिळाले.

जीवनाचे गाणे,

आसवांत न्हाले.


हर्ष देई मना,

आस ती उद्याची.

नित्य विवंचना,

सोनेरी क्षणांची.


कुठे हरवले?

सुख अंगणीचे.

सरेल कधी हे,

छत्र तिमिराचे.


करूनी श्रम ते,

करपली काया.

निरपेक्ष आस,

बदलेल छाया.


पूर आसवांचा,

लोचनी दाटला.

प्रकाश भाग्याचा,

कुठे तो लोपला?


- प्रा.गायकवाड विलास / लातूर

________________________________


⬛ गत वैभव काळाचचे


तृण हिरवे हिरवे,

तरू अवती भवती.

रम्य निसर्ग कुशीत,

होती तुझीच संगती.


रूप सुंदर देखणे,

प्रेममय तुझी काया.

गंध फुलांचा अंगणी,

ओसंडूनी वाहे माया.


गत वैभव काळाचे,

नव युगात सरले .

रंग स्वार्थाचे ते न्यारे,

इथे अंतरी भरले .


तुझे अस्तित्व कालचे,

जगी ओसाड भासते.

सखा निसर्ग सोबती,

सय हृदयी दाटते .


न्यारी सृष्टीची महिमा,

मोल मानवा कळेना .

दीप पेटले ज्ञानाचे ,

मात्र प्रकाश दिसेना.


- प्रा.गायकवाड विलास / लातूर

___________________________________


⬛ कुठे प्रकाश लोपला ?


अंधारले विश्व सारे,तम दिशात दाटला.

ढग विरहाचे नभी,कुठे प्रकाश लोपला?


मृगजळ विनाशाचे,चोहिकडे पसरले.

युग नवे विज्ञानाचे,कसे बहरूनी आले.


सिद्ध करण्या वर्चस्व, विश्व अवघे उठले.

जाती निष्पापांचे जीव,झरे मायेचे आटले.


नको मानवा विसरू,काळाहूनी श्रेष्ठ कोण?

सोड आतातरी गर्व,सारे इथे व्यर्थ गौण.


नाही कळणार तुला,गुढ निसर्ग सृष्टीचे.

कोण जाणिले भविष्य?नव्या उद्याच्या क्षणांचे.


अंधारले विश्व सारे,तम दिशात दाटला.

ढग विरहाचे नभी,कुठे प्रकाश लोपला?


- प्रा.गायकवाड विलास / लातूर

  ( संवाद - 9730661640 )

मिलिंद महाविद्यालय लातूर / महाराष्ट्र

_________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)