' डिळी ' कादंबरीत गावखेडे आणि निमशहरी जगण्याची प्रगल्भ मांडणी -रंगनाथ पठारे

शालेयवृत्त सेवा
0

 



पुस्तकवारीत शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ यांच्या कादंबरीचे प्रकाशन संपन्न !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

गावखेड्यातील जगण्याचे प्रश्न, तिथला जातिधर्मापल्याड जाणारा एकोपा, मतपेटीच्या राजकारणाने तिथे झालेली सामान्य माणसांच्या जगण्याची परवड हे एकीकडे आणि तिथेच मुळे असलेल्या पण उच्च शिक्षणाच्या आधारे शहरात स्थिर झालेल्या माणसांच्या जगण्यातील प्राथमिक संघर्षाच्या पार असलेल्या समस्यांची मांडणी लेखिकेने फार प्रगल्भतेने केलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. श्रीरामपूर येथे शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या प्रसिद्ध कवयित्री-लेखिका शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ यांच्या डिळी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशक ज्येष्ठ कवयित्री-साहित्यिक सुमती लांडे, व्यवस्थापक सुमित लांडे उपस्थित होते.


सुचिता खल्लाळ या आजच्या महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांनी लिहिलेली ही कादंबरी बहुकेंद्री आहे. तरीही तिची मांडणी स्थूलमानाने दोन केंद्रात करणे शक्य आहे. तिचे एक केंद्र अधम स्तरावर जगणाऱ्या गावखेड्यात आहे तर दुसरे सधन आणि उच्च मध्यम स्तरावर जगणाऱ्या निमशहरी स्थानात आहे. ही दोन्ही जगे या ना त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत. पण त्यांच्यातले नाते क्षीण झालेले किंवा होत चाललेले असे आहे. या दोन्ही स्तरावरील दुनिया; त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न, आशा-आकांक्षा, विचार, भाषा या सगळ्या पातळ्यांवर लेखिकेने ते फार सक्षम सहजतेने हाताळले आहे. 


या सगळ्यात वाचक म्हणून माझ्या मनात उरते ती गोदू नावाची गावखेड्यातील एक आई. हीच 'डिळी' आहे. डिळी म्हणजे खांब किंवा मेढ. आपली मुले, आपला प्रपंच टिकविण्यासाठी ती अखेर आपली गर्भपिशवी काढून टाकत उसतोडणीच्या कामाला जायच्या निर्णयाला येते. हे वास्तव मनाला ढवळून टाकणारे आहे. जगण्याच्या संघर्षात अगदी कड्यावर उभी असतानाही हार न मानण्यातील तिची जिजीविषा असामान्य आणि अत्यंत करुण अशी आहे. वाचक म्हणून आपल्याला खडबडून जागे करणारी अशी कादंबरी सुचिता खल्लाळ यांनी लिहिली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असेही श्री पठारे यावेळी म्हणाले.


सुचिता खल्लाळ यांचे यापूर्वी पायपोळ, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप हे तीन कवितासंग्रह, स्त्री कवितेचे भान: काल आणि आज हे समीक्षा ग्रंथ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील विविध वाङ्मयीन नियतकालिके, हिंदी नियतकालिक वागर्थ, सदानिरा आणि बेबाक या उर्दू नियतकालिकातून त्यांच्या सुनीता डागा यांनी अनुवादित केलेल्या हिंदी आणि साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी अस्लम मिर्झा यांनी उर्दू अनुवादित केलेल्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. हाकारा या इंटरनेट नियतकालिकातून मराठीत कविता प्रकाशित झाल्या असून, पुढील आवृत्तीत राही डहाके यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या कविता प्रकाशित होणार आहेत. त्यांच्या कवितेस महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, दक्षिण मराठी साहित्य परिषद आणि विविध मानांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


डिळी कादंबरीस सुप्रसिद्ध चित्रकार लेखक चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ असून, मांडणी व मुद्रितशोधन साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी केले आहे, तर विजय चित्तरवाड यांनी सुबक अक्षरजुळणी व सजावट केली आहे. कादंबरी प्रकाशनासाठी ज्येष्ठ साहित्यिक निळकंठ कदम, आशुतोष पोतदार, कविता ननवरे, डॉ. पृथ्वीराज तौर, योगिनी सातारकर, स्नेहलता स्वामी आदी मान्यवरांनी सुचिता खल्लाळ यांचे अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)