राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू | President of India Draupadi Murmu

शालेयवृत्त सेवा
0

 



आदिवासी राजकीय नेत्या, माजी राज्यपाल व आणि भारताच्या 15 व्या राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण जीवन चरित्र तसेच त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारताला पहिल्या आदिवासी राष्ट्रपती मिळाल्या.


64 वर्षीय द्रौपदी श्यामचरण मुर्मू (जन्म 20 जून 1958) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अधिकृत उमेदवार म्हणून लढल्या, आणि विजयी झाल्या.


त्यांनी यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्या ओडिशा राज्यातील आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या आहेत.


त्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतीपदी अनुसूचित जमातीची (ST) स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेला नाही.


◼️वैयक्तिक जीवन :

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंच होते.


1976 मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मूशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली. तथापि, त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मण मुर्मू याचे निधन 2009 मध्ये तर लहान मुलगा सिप्पुन मुर्मू याचे निधन 2013 मध्ये झाले.


त्यानंतर पुढच्या वर्षी 2014 मध्ये त्यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचे देखील निधन झाले. अशा दुर्दैवी घटना त्यांच्या आयुष्यात एकानंतर एक घडल्या. आता त्यांच्या कुटुंबात मुलगी, नातू आणि जावई आहेत.



द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण – ऊपरबेडा गावाच्या मध्यभागी असलेल्या उत्क्रमित माध्यमिक शाळेत द्रौपदी मुर्मू यांनी शालेय शिक्षण घेतले. द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बीए केले.


द्रौपदी मुर्मू यांना सहावी-सातवीत शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महंतो (वय 82 वर्ष) सांगतात की, द्रौपदी लहानपणापासूनच हुशार होत्या आणि फावल्या वेळेत महापुरुषांची चरित्रं वाचायच्या.


प्रेरणास्थान – द्रोपदी मुर्मू ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या तीन महापुरुषांना खूप पसंत करतात आणि त्यांना आपला आदर्श मानतात.


◼️राजकीय कारकीर्द :

राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री, व राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.


त्या 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले.


द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार राहिल्या आहेत.


ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.


त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.


द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, आणि त्यांचा कार्यकाळ 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत होता. एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या देखील होत्या.


द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या. यापूर्वी केवळ प्रतिभा देवीसिंह पाटील ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती होत्या.


 


सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती :


द्रौपदी मुर्मू यांचा 25 जुलै 2022 रोजी राष्ट्रपतीपदाचा शपथविधी होईल, त्या दिवशी त्यांचे वय 64 वर्षे 35 दिवस असेल. तेव्हा त्या देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनतील. आतापर्यंत सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे, 2 महिने, 6 दिवस होते.


◼️भूषवलेली महत्त्वाची पदे :

-झारखंडच्या 9वे राज्यपाल : 18 मे 2015 ते 12 जुलै 2021

-ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004)

-ओडिशा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004)

-ओडिशा विधानसभेच्या सदस्या – आमदार : (2000 ते 2009)

-अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा

- नगरसेविका.

                                           



      ( संकलन )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)