' प्रश्नांची मातृभाषा ' हा बेंगलुरुस्थित डाँ. युवराज सोनटक्के यांचा कवितासंग्रह . यापुर्वी त्यांचे ' अग्निशाळा ' , ' अग्निध्वजा ' , ' Outbreak ' हे कवितासंग्रह प्रकाशीत आहेत. ' ग.मा.मुक्तीबोध के काव्य में सामाजिक चिंतन ' हा (शोधप्रबंध), 'सिद्धार्थ बुद्ध: धम्म एवं दर्शन ' (तत्वज्ञान), 'कविता बापाच्या ' (संपादित) कवितासंग्रह, 'क्रिया-प्रतिक्रिया (समीक्षा), ' रमाई:मराठी कविता में (संपादित), यास्तव कवी व लेखकांच्या तेरा पुस्तकांचा हिंदी अनुवादही त्यांनी केलेला आहे .अनेक पुस्तकांची त्यांनी प्रस्तावना लिहीली व पाठराखण केली आहे .ते पदार्थविज्ञानाचे विद्यार्थी असून अनुसंधाता म्हणून कार्य करताहेत .
'प्रश्नांची मातृभाषा' हा सर्वच बाबतीत उजवा असलेला कवितासंग्रह . ' प्रश्नांची मातृभाषा म्हणजे काय? तर जशी प्रत्येक व्यक्तिलाच स्वतःची मातृभाषा असते ,म्हणजे जी इतर कोणत्याही भाषेच्या आधी त्याची आई त्याला शिकवित असते ती . तशीच प्रश्नांनाही मातृभाषाही असते . याविषयी प्रस्तावनाकार प्रसिद्ध आंबेडकरी साहित्तिक डाँ.यशवंत मनोहर यांनी कवितेच्या शीर्षकाचा समर्पक व सविस्तर उकल करताना प्रश्नांच्या मातृभाषेविषयी म्हणतात..." ज्या मनातून प्रश्न निर्माण होतात ते मन या प्रश्नांची आईच झालेले असते. त्या मनांची भूमिकाच या प्रश्नांची भाषा झालेली असते. मन म्हणजे भूमीका ! भूमिकेची भाषा ही प्रश्नांची मातृभाषाच असते . ही मातृभाषा एवढी सर्वसमावेशक तेवढी तिच्यातून जन्माला येणा-या प्रश्नांची व्याप्ती ठरत असते. जेव्हा मनांची भूमिका विश्वाला कवेत घेते तेव्हा प्रश्नही वैश्विकच होतात . सर्वांच्या समहितासाठी निर्माण होणा-या प्रश्नांची मातृभाषा वैश्विक माणुसकीचीच मातृभाषा होते ." डाँ. मनोहर सरांनी प्रश्नांच्या मातृभाषेची जी परिभाषा केलेली आहे . ती अतिशय समर्पक आहे .
डाँ.युवराज सोनटक्के यांची कविता वैश्विक विचार घेऊन आलेली आहे , ती वैज्ञानीक दृष्टीकोणही जपते . ती कधी सयंत स्वरूपात तर कधी विद्रोहाच्या रुपात वाचकास भेटते .तिची एक स्वतंत्र शैली आणि भाषा आहे. ती सामाजिक भान जपत, मनात उद्भवलेल्या प्रश्नांना वाट मोकळी करून देते . ती भुतकाळाचा हात वर्तमानाच्या हाती ठेवत पुढे जाते. ती भगवान बुद्ध, सम्राट अशोक, बाबासाहेब आंबेडकरांपासून उजेडप्रवाहीत होत जातांना दिसते . अनेक प्रतिमांचं उपयोजन कविने प्रभाविरीत्या केलेलं दिसते . तिच्या अंतरंगातील विविधांगी भाव शब्दातून प्रकट करीत वाचकासमोर येते . तिला चौफेर दृष्टी लाभलेली आहे . ती अंगार गीत गाते, ती समतामूलक समाजव्यवस्थेचे स्वप्न बघते, तीची आग दुर्बलांच्या विवशतेचे दंश विझवायला पुढे सरसावते, तीचा आवाका फार मोठा आहे, तीला अनेक प्रश्न पडतात , मानवाची अन्यायी वृत्ती, अहंकारी प्रवृती सभ्य विचारांना का पोखरत जाते? अत्याचारग्रस्त, अन्यग्रस्तांचा , शोषीतांचा आवाज , का कुणाला ऐकू येत नाही ? असह्य मौनाला वाचा फोडून नवा पारदर्शक विवेकी विचार का मनात जागृत होत नाही ? इत्यादी प्रश्न कविला प्रश्नांच्या मातृभाषेतून मांडायचे आहेत . हे प्रश्न केवळ कवीचे नाहीत , तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या सर्वच प्रश्नांचा गराडा सर्वसामान्य माणसाच्या भोवती असतो .
प्रत्येक माणसाचं दुखणं हे वेगवेगळं असू शकतं. कधी शारीरिक तर कधी मानसीकही असतं . अलीकडे संवेदना बोथड व बधीर होत चाललेल्या आहेत की काय माणसाच्या ? याकडे ही कविता अंगुलीनिर्देश करते . वास्तवाच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत कविने? त्यांच्या कवितेत निरागस भाव आहेत, तिच्या शब्दात मृदूता आहे, सामाजीक भान आहे . कवी कवितेच्या माध्यमातून इतरांनाही सुचवू पाहतात. हे प्रश्न प्रत्येकाच्या कवितेचे विषय झाले पाहिजे . प्रत्येकाचीच भूमीका अशी असायला पाहिजे ,असे कविला वाटते. कविला सत्याच्या आतलं सत्य मांडायचं आहे. असा रास्त विचार सहजतेने आपल्या कवितेतून मांडताना दिसतात.
कवी जेव्हा 'माय' कवितेतून आपल्या शब्दात आईशी संवाद साधतात, तेव्हा ते मनाने हळवे व भावनीक होताना दिसतात . त्यांच्यासाठी आईने विषमतेचा दाह सहन केला, स्वेच्छाशक्तीला मुठमाती देऊन स्वतः मात्र अगनीत जखमांना कुरवाळत राहीली, डोळ्यातील प्रकाश हरवला तरी अंधारात राहून आपल्या डोळ्यात मुलाच्या उजेडाचे स्वप्न पांघरून जगत होती .एकांतात रडून स्वतःचे आसवं पित होती, मनात अग्नीज्वाला पेलत होती,निराशेच्या अग्नीत होरपळत राहिली पण मुलाला यापासून दूर ठेवत गेली, मुलाचे दुःख पीत राहीली, विषमतेच्या सागरात गटांगळ्या खात असतांना मुलाला बघत होती. तरीही ती दुःखाचे घोट प्राषण करीत मुक होऊन जगत होती . परंतु तिच्या अखेरच्या क्षणी तो दूरस्थ असल्याने पाण्याचे दोन घोटही तीला पाजू शकला नसल्याची काळीज कप्प्यात रुतून बसलेली सल मात्र आपल्या शब्दातून व्यक्त करतो .जीवन सुंदर आहे म्हणतात पण तिला ते जीवन जगताच आले नसल्याची खंतही कवी व्यक्त करतो. परंतु त्याचे हे शब्द आता तिच्यापर्यंत पोहचण्यास असमर्थ ठरतात .
सोनटक्केंच्या कवितेचा पोत शब्दयोजन शैलीमुळे वाचकांच्या मनात भरणारा असल्याचे जाणवते. 'स्त्रीत्वा'च्या बाबतीत ते व्यक्त होताना ते म्हणतात. पण स्त्री ही आता गुलाम राहिलेली नाही ,अबला नाही ती सबला आहे. तिला संविधानानुसार समान दर्जा प्राप्त झाला आहे. तरी कवीला पुरुषी संस्कृतीचा अतिरेक होऊ नये , असे वाटते .
"पुरुष लावतो विवाहाचा अर्थ
त्याच्यि इच्छा-रुचीची दास बनावे तिने
आपले माहेर,जन्मस्थान विसरून
परंपरेला जावे शरण .
आणि पुरुष ?
परंपरेच्या बेड्यात अडकवून स्त्रीला
देतो स्वातंत्र्याचे ऊन,चटके !"(स्त्री पृष्ठ39)
सामाजिक संरचना निर्धारीत करणारे कोण आहेत ? कुटुंबाची परिकल्पना साकारणारे घटक दोन. स्त्री आणि पुरुष . संविधानाने स्त्री -परुषाला समान अधिकार दिलेले आहे . तिला सन्मान मिळायला पाहिजे .आजपर्यंत तिने खुपकाही सहन केले आहे. असे कवी 'स्री ' या रचनेतून पुरुषप्रधान संस्कृतीला ठणकावून सांगतात . येथे कवी मनातील सामाजीक जान अधोरेखीत होतांना दिसते. 'स्त्री', 'स्त्रीत्व' , 'माय' , 'सहचरी' 'दीनम्मा' या रचना स्त्री जातीची कारुण्यमयी व्यथा,वेदना कष्ट ,दुःख मांडण्याच्या हेतूने साकारल्या गेल्याचे जाणवते . कधी कधी मुलीच्या संसारात आईच्या हस्तक्षेपाचा अतिरेक होतो.तेव्हा तिचा संसार अस्ताव्यस्त व्हायला वेळ लागत नाही . हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी पुरकही असू शकतात .
सावित्रीमाई फुले यांनी स्त्री/मुलींच्या शिक्षणासाठी लढा उभारला आणि मुलींची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचा पाया घातला . त्यामुळे मुली शिकायला लागल्यात, आज स्त्री सर्वच क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करताना दिसते . सावित्रीमाईंने जर स्त्रीच्या जीवनात अप्रत्यक्षपणे का होईना ? दखल दिली नसती तर समस्त स्त्री समाजाला आजच्या उजेडाच्या दिवसांची अनुभूती घेता आली नसती . स्त्रीमनातील भय आता दूर होऊ लागले आहे. संविधान नावाचा सूर्य तिच्या आयुष्यात उजेड घेऊन आला आहे .ती संविधानाचा आधार घेत स्वतःची लढाई स्वतः लढण्यास सक्षम झालेली दिसते . अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे 'दीनम्मा' कविने साकारलेली आहे .
" मी दीनम्मा उग्रप्पा नाग
भारतीय संविधानावर हात ठेवून
शपथ घेते की
जे काही सांगेन,सत्य सांगेन
असत्याला वेशीवर टांगेन !" (दीनम्मा 46)
आजची स्त्री अशी विद्रोही भूमीका मांडणारी आहे . दीनम्मा ही आजच्या युगाची स्त्री आहे. आजपर्यंत तिने खुप अन्याय,अत्याचार सोसले आहे. तिच्या शोषिकतेच्या गाथा आपण वाचल्या आहेत. ती आपली व्यथा परखड शब्दात मांडते. तिचं आजपर्यंतचं आयुष्य हे मिठागर झालेलं आहे .त्यामुळे ती कोणत्याही आजाराला, धमकीला, संकटाला,दबावाला बळी न पडता आपली फिर्याद स्पष्ट शब्दात मांडताना दिसते . ती कोणत्या धर्मग्रंथापेक्षा संविधानाचीच शपथ घेऊन सत्य बोलण्याचे वचन देते. याचाच अर्थ ती संविधानाचं महत्व जाणते आहे. तिला तिचे अधिकार कळले आहे, ती सजग झाली आहे .
सोनटक्के यांची कविता प्रज्ञावंत आणि कारुण्यमयीही आहे . तीला मानवी मनातील भावना जाणता व जपता येतात. त्यागमूर्ती 'रमाई' माता एक विशाल हृदय बाळगणारी पत्नी,आई, घराची करती स्त्री होती .वादळातील दीपस्तंभ , इतरांना उजेड देण्यासाठी अविरत जळणारी एका दिव्याची वात होती रमाई.
" रमाई!
वेदनांच्या चिखलात रमलीस
अन् संसाराचा कडूपणा प्यालीस
आगीच्या वर्तुळातून
तावून-सुलाखून निघालीस
उत्कट होती जगण्याची तुझी तहान अन् तीव्रता , परंतु तू प्राशली नाहीस
जीवनाच्या वसंत ऋतुची सुंदरता !"
( 'रमाई ' पृष्ठ 35)
अगनीत संकटांना तोंड देत फाटक्या संसाराला कष्टाच्या धाग्याने ठिगळ लावीत, एका दीव्याला जपत होती. पण मनात असूनही कधी हौस मौज न करता, पै पै गोळा करून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पाठवित होती . वेदनेचा चिखल,संसाराचा कडूपणा,आगीच्या वर्तूळातून, जगण्याची तहान , जीवनाच्या वसंत ऋतुची सुंदरता. हे शब्द ,या प्रतिमा कवितेचे भाषासौंदर्य वाढविणारे आहे. हीच आंबेडकरी कवितेतील सौंदर्यस्थळे म्हणावी लागतील . आंबेडकरी कवितेचं सौंदर्य याच शब्दातून व्यक्त व्हायला पाहिजे . शब्द समृद्धीचा अलंकार लाभलेली सोनटक्के यांची कविता आहे . ज्यांचेकडे शब्दांची श्रीमंती असते त्या कविची रचना वाचकांवर गारूड करून जाते. या संग्रहात विविध स्वभावाच्या, प्रकारातील 52 सकस रचना आहेत .बहुतांश मुक्तछंदातील तर काही द्विपदीतील आहेत.
' वैश्विक समाज ' च्या निमित्ताने कवी विविध प्रकृतीच्या लोकांचं जगणं मांडतात . कामगारांच्या टोळ्या कामाच्या शोधात तुरपाई उसवलेले मळके कपडे घालून किंवा फाटकी बनियन घातलेले, घमेले-फावडे हाती असलेले, बिडी फुकत चौका-चौकात उभे असतात. तर दुसरीकडे पहाटे पहाटे खात्या-पित्या घरचे अनेक संभ्रमित चेहरे, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राँल आदी व्याधीने ग्रासलेले लोक मैदानावर चालतात व धावताना दिसतात . तर काही कच-याच्या ढिका-यातून प्लँस्टीकच्या पिशव्या गोळा करीत ,त्या विकून आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालवितात . दोन माणसांच्या जगण्यातला विरोधाभास कवी येथे मांडताना दिसतात . दोन्ही प्रकारातील माणसे परिस्थितीशी झगडताना दिसतात. पण दोहोंच्या झगडण्यातील फरक मात्र जमीन- अस्मानाचा जाणवतो . एक अन्न कमविण्यासाठी तर दुसरा अन्न पचविण्यासाठी धावत असतो. या विषमतेवर कवी आपलं सुक्ष्म आकलन मांडताना दिसतात.
कवीची वैचारीक जडण घडण ही भगवान बुद्ध व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विज्ञानवादी व परिवर्तनशील विचारातून झालेली दिसते . या विचाराने प्रेरीत होऊन ,या प्रेरणांविषयी कविने अधिक मांडणी केलेली दिसते .जसे शिखरपुरुष-1, शिखरपुरुष-2, तथागत बुद्ध, विज्ञानमातृक बुद्ध, रमाई, दीक्षाभूमी, नामांतर, बुद्धीबळ इत्यादी . या सर्व रचनांमधून उजेडप्रवाह हे एक साम्य जाणवते . दीक्षाभूमी ही युद्धशाळा आहे . ती क्रांतीची कार्यशाळा आहे . जेथून बौद्ध अनुयायी प्रेरणा घेऊन जातात आणि आपलं आयुष्य सुकर करतात . अस्पृश्यतेच्या, जातीभेदाच्या अंधारात खितपत पडलेल्या लोकांसाठी दीक्षाभूमी ही प्रेरणास्थान झालेली आहे. कवी 'सेमीनार' या कवितेत बुद्धाला विणवणी करतात की, तू एकदा बाबासाहेबांशी एक सेमीनार आयोजीत कर .ज्यामुळे अग्रणी लोक सामान्य माणसाची पिळवणूक थांबवतील . यात रस्ता सोडून चालणा-यांना तू धम्माचे सम्यक विचार द्यावेत .जेणेकरून मुजोर व भ्रमीत लोकांचा मेंदू ताळ्यावर येईल . आम्लीक आसवं, कोंदट पुढारी, विकलांग आरोळ्या, वाळलेले घाव, गारगोटीचे मन या प्रतिमांचे उपयोजन कविने मोठ्या खुबीने केले आहे .
आजची पृथ्वीवरील भयग्रस्त परिस्थिती बघता, आई आपल्या गर्भाला जन्म देण्यासाठी धस्तावलेली दिसते .या 'संवादा'त अर्भक आईला वचन देते की, तू न घाबरता मला जन्माला घाल. वास्तवतेच्या रणांगणावर मला येण्यापासून थांबवू नकोस .मी तुझे ऋण फेडील . हा 'संवाद' फारच भावस्पर्शी आहे . कवी बाबासाहेबांना शिखरपुरुषाची उपमा देतात .त्यांचं स्थान या विश्वात अत्युच्च असल्याचे सांगतात .त्यांच्या विद्वत्तेपुढे अनेकांचे पांडीत्य गळून पडले आहे . पण अलीकडे लोक, बाबासाहेबांचे नाव केवळ आपली राजकारणातील पोळी भाजण्याकरीताच वापरताना दिसतात. ज्यांनी बाबासाहेबांना सोबत घेतले त्यांनी राजपथाची आपली पोळी शेकून घेतली आहे. परंतु वंचितांच्या घरी मात्र आजही अंधारच आहे. साधी चुलही पेटत नाही. ही खंत कवी येथे व्यक्त करतात . तसेच सर्वसामान्य लोकांनी झोपून न राहता जागे होण्याचा सल्लाही कवितेतून देताना दिसतात.
" झोपून झाले शतकानुशतके उठा,
विझू नका, जागे व्हा,
माप द्या आपल्या छातीचे,आंबेडकरी सैन्यात सामील व्हा
डोळ्यावरून काढा पट्ट्या, जू काढून फेका खांद्यावरून
काळोखातून निघा,आंबेडकरी बाणा परिधान करून !" ( शिखर पुरुष-2, पृष्ठ 62)
कवीची कविता काही अंशी संवादात्मक स्वरुपाची आहे, काही प्रश्नकर्ती तर काही वर्णनात्मक स्वरुपाची आढळते .
कवी बाबासाहेबांशी शब्दरुपाने संवाद करीत येथील शोषित समाजाची सर्व परिस्थीती कथन करतो . आणि समाजातील लोकांनी जागं होऊन बाबासाहेबांच्या चळवळीत, कार्यात संमीलीत व्हावं अशी कळकळीची विनंती करतो . येथे मला कवितेत थोडा विद्रोह जाणवतो . तसा विद्रोह हा आंबेडकरी कविता मुळ पाया आहे. तसेच ती पुर्वीपासून कष्टक-यांची वेदना, व्यथा, अन्याय, अत्याचार , आक्रोश मांडत आली आहे .
येथे कवी एका सजग साहित्तिकाची व कार्यकर्त्याची भूमीका निभावताना दिसतात . 'तथागत बुद्ध' या रचनेत वैज्ञानीक भाषेतून बुद्ध समजावून सांगतात. वृक्षमित्र बुद्धास बोधीवृक्षाने भरपूर आँक्सिजन अर्पीत केल्याचं सांगतात. वैशाख पोर्णिमेला बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाले . म्हणूनच या पोर्णिमेला त्रिगुणी पोर्णिमा असेही संबोधतात. बुद्धाच्या जिवनात या पोर्णिमेचं महत्व अनन्यसाधारण आहे . कवी बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं , त्याच्या वैज्ञानीक विचाराचं व महापरिनिर्वाणाचं सुंदर शब्दात वर्णन करताना दिसतात.
" राती वैशाख पूर्णिमेच्या संबोधी झाले बोधिसत्व
समस्त सत्याचे दर्शन घेत संचारले बुद्धत्व !
आर्य अष्टांगिकमार्गात सामील प्रज्ञा,शील,समाधी
लोककल्याण तत्वज्ञान देतो बुद्ध पुरुषार्थवादी !
बुद्धाच्या विज्ञानवादाचा गाभा प्रतीत्यसमुत्पाद
आधार कर्सिद्धांताचे अनात्म-अनित्यतावाद"
( तथागत बुद्ध पृष्ठ 65)
वरील ओळीत कवी बुद्धाचा कर्मसिद्धांत, मानवी जीवनाचं सत्य, विज्ञानवाद, बुद्धास संबोधी कशी प्राप्त झाली याविषयीचा वृत्तांत अगदी व्दिपदीतून अल्पाक्षरात मांडतात . बुद्धाचं तत्वज्ञान मानवा-मानवात प्रेम निर्माण करणारं आहे, पशु, पक्ष्यांवर, करुणा भाकायला शिकवितं. जगा आणि जगू द्या हा सिद्धांत मांडतो . मानवाला सम्यक आचार-विचार शिकवितो . बुद्धाने कोणतीच बाब आपल्या हातात राखून न ठेवता, ती संपूर्ण मानवाच्या स्वाधीन केली आहे . 'अत्त दीप भव' म्हणत तो अनुयायांवर सर्व सोपवून मोकळा होतो. तो धम्म स्विकारण्याबाबत लोकांना बाध्य करीत नसून तुम्ही विज्ञानाच्या कसोटीवर धम्म पारखून बघा, नंतरच तो स्विकारायचा की नाही ते ठरवा , असं सांगतो. कर्मावर आधारीत हा धम्म आहे. म्हणूनच बुद्धाने मानवाला रुढीवादाच्या, देव-देवता, दैववादाच्या , अंधश्रद्धेच्या चिखलातून मुक्त करण्यासाठी बौद्ध धम्म प्रदान केला आहे . आज परिवर्तन होत असले तरी , काही लोक बुद्धीबळाचा डाव खेळताना दिसतात . म्हणूनच भेदाभेद करणा-यांना कवी रचनेतून ठणकाऊन सांगायलाही मागेपुढे बघत नाही .
"तुम्हास अवगत आहे जरी बुद्धीबळाचा खेळ
समजून स्वतःला 'राजा' का करता प्यादांचा छळ ?
मान्य आम्ही 'प्यादे' पण का मनी जातीची जळजळ ?
नाही तुमच्यात करुणा अथवा सामाजिक बळ !"
बाबासाहेबांनी संविधानातही धम्माचे बीज पेरून भारतीय नागरिकांना समता,स्वांतत्र्य, बंधुता, न्याय ही जीवनमूल्ये प्रदान केली आहेत . संविधानात लोकशाही शासनव्यवस्थेच्या माध्यमातून समान हक्क, अधिकार, कर्तव्य बहाल केले आहे . आज सर्वसामान्य लोकांचे उत्थान होत आहे . समान मताधिकारानुसार सर्वांना एका रांगेत उभे केले आहे. बरेच लोक करुणाकाराच्या विचारांचे वारस व वाहक आहेत . परंतु हेच काही मुठभर लोकांच्या डोळ्यात सलू लागले आहे . म्हणूनच कवीला शंका वाटते की, कदाचित बेइमानी- अन्यायाची धार आमचे अधिकार कापण्याची शक्यता नाकारता येत नाही . पण कवी हार मानेल तो कसला?
तो आपल्या 'शब्दां'ना धारदार बणवितो आणि लेखनीसह अन्यायावर प्रहार करण्यास्तव सज्ज होतो .
" लेखनीने तीव्र करीन वैचारिक ऊर्जेची धार
बौद्धिक तेजोवलयाचे होईल स्वरूप साकार
दाहक शब्द संघर्षाचे घेतले मी सखे उधार
क्रांतीच्या हस्तांदोलनाने ठेवले मला उबदार"
( 'शब्द ' पृष्ठ क्र.90)
हे धारदार शब्द कवीच्या मुळ विचारातले नसले तरी ते संघर्षातून त्याचेकडे आलेले आहेत आणि त्या भरवश्यावर क्रांतीची भाषा बोलत स्वतःला नेहमी उबदार ठेऊ इच्छितो .
स्वतःला व इतरांना लेखनीने जागं करून तो समाज उत्थानाचं स्वप्न साकार करू इच्छितो.
दुष्काळग्रस्त प्रदेशातून फेरफटका मारताना कुणालाही वाटतं पाऊस पडावा. माणूस पावसासाठी विनंतीही करतो . तेव्हा निसर्ग म्हणतो की, तू विज्ञानाचा अनुसंधाता आहेस ना ? मग पाण्यासाठी प्रयोग कर आणि पाडून घे पाऊस . झाडेही त्याचेशी बोलताना नाराजीचाच सूर आवळतात. याचे कारण मानवाने केलेला अतिरेक असावा. तो पर्यावरणाचे संतुलन राखण्यात अयशस्वी होत आहे . हा निसर्गाचा अप्रत्यक्ष सल्ला त्याने लक्षात घेण्याची आज ख-या अर्थाने गरज आहे. कधी देशातील काही 'हटवादी' लोकांना कवी यथेच्छ फटकारताना दिसतात, तर कधी 'भारमातेचे कुपुत्र ' म्हणून सनातनी दंगलखोरांना हिनविताना दिसतात . तर 'सहचरी' मधून आपल्या प्रेयशीच्या भेटीविषयी व मनातील रीतेपणाविषयी भरभरून व्यक्त होताना दिसतात.
यथार्थमूल्य, अनामिक, चिंतन, जळजळ, जाणीव, संवेदना, प्रियतमा लेखणी माझी,जहरी क्षितिजावर,दुःखातील सौंदर्य,प्रस्तूत कवितेची उष्मा, वर्तमान, दीक्षाभूमी, इत्यादी रचनाही लक्षवेधी आहेत . प्रत्येक रचनेची ठणक ही वेगवेगळी आहे . 'बाजारवाद' या रचनेत पुंजीवादी विरुद्ध श्रमीक, वंचीत,शोषित, गरीब असा हा नित्याचाच असलेला विषमतामुलक वाद कविने शब्दबद्ध केलेला आहे . कवी एकीकडे आपल्या कवितेला लाडाने प्रियतमा म्हणून गोंजारताना दिसतो तर दुसरीकडे 'कवी' या रचनेतून इतर कविच्या आलेल्या अमर्याद पिकाला व त्यांच्या रचनेवर सडकून टिका करताना दिसतो.
"नाहीच वाण कवितांना,पिक कवींचे आले फार
कविवर्य असेही जे ना, रचती वाक्ये शुद्ध चार
मिरवतात मूलगामी प्रतिभाच कवी प्रखर !"
कवी याबाबत हल्लीचं वास्तव मांडताना दिसतो. ब-याच कविंनी आपल्यात सुधारणा घडवून आणण्याची गरज कवी प्रतिपादीत करतो. कारण कविता लिहिणा-यांपेक्षा कविता पाडणा-याची संख्याच अधिक दिसते. पण हा प्रत्येकाच्या विचारसरणीचा व अधिकाराचा भाग आहे . कुणी कसं व काय लिहावं ? हा ज्याचा त्याचा भाग आहे. कारण नवोदितांना मार्गदर्शन करणारे कमी आणि टिका करणारेच अधिक दिसतात. काही विशीष्ट लोकांनी आपापले समूह तयार करून घेतलेले दिसतात .साहित्य विश्वातही हेवेदावे, आणि कंपूशाही दिसून येते. याविषयी अधिक न बोललेलंच बर .
एकूणच डाँ. युवराज सोनटक्के यांची कविता ही मानवाला न्याय देणारी आहे . शोषणव्यवस्थेचा समाचार घेणारी आहे .ती उजेडाची दिशादर्शक आहे . उजेडप्रवाही होऊन विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करू इच्छिते . आंबेडकरी जाणीवा जपते, ती या विचाराचं वहन करते, सदैव मानवतेसाठी झगडताना दिसते . ती कुठेकुठे भावनाप्रधान स्वर आवळते, तर कुठे विद्रोह मांडते. कुठे समंजसपणाने आपला विचार मांडते तर ,कुठे लेखनी पाजवून दोन हात करण्यासाठी सज्ज असते. ती आंबेडकरी चळवळचा विचारही मांडते तर कुठे पर्यावरण रक्षणाचाही अप्रत्यक्ष सल्ला देते . तिच्या गर्भात अनेक प्रश्न जन्म घेतात . ते प्रश्नांच्या मातृभाषेतून मांडता यावेत, असा मनोदयही बाळगते . मानवी मूल्यांचा होत चालेला -हास कविला अस्वस्थ करते . त्यांस लिहीण्यास बाध्य करते . येथील बाजारवादाने समाज पुरता ढवळून निघालेला आहे, हा बाजारवाद संपविण्यासाठी आपली लेखनी झिजविताना दिसतो . तद्वतच बुद्धाचा विज्ञानवाद समाजास देण्यात कसलीही कसर ठेवताना दिसत नाही . सर्व रचना चिंतनशीलतेतून प्रसविल्या गेल्या आहेत .पुस्तकाचा अंतर्बाह्य पोत छान आहे .त्यांच्या या सत्कार्यास व यशासाठी हार्दिक सदिच्छा !
समिक्षक : अरुण हरिभाऊ विघ्ने / वर्धा
◾️कवितासंग्रह: प्रश्नांची मातृभाषा
◾️कवी : डाँ.युवराज सोनटक्के
◾️प्रकाशन : स्मिता पब्लिकेशन,गुहागर
◾️प्रस्तावना : डाँ.यशवंत मनोहर,नागपूर
◾️पृष्ठसंख्या : 120
◾️मूल्य : 180/-₹
◾️प्रथमावृत्ती : 1 जानेवारी 2022
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .