वृक्षारोपण लोक चळवळ व्हावी | Plantation should be a people's movement

शालेयवृत्त सेवा
0

 



[ दूरदृष्टी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे तर सांगत नाही ना ! या विषयावर रमेश मुनेश्वर यांचा लेख देत आहोत - संपादक ]



ग्लोबल वार्मिंग च्या संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड संगोपन संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे वृक्ष लागवडीने वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासन अभियान राबवत असले तरी जोपर्यंत वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ होणार नाही तोपर्यंत या अभियानात यशस्विता नाही. शासन सांगते म्हणून आपण करणे यापेक्षा वृक्ष नसेल तर त्याची किती वाईट परिणाम होतील किंवा होत आहे हे जर प्रत्येकास समजले तर नक्कीच वृक्षारोपण आणि संवर्धन ही लोक चळवळ होईल !


"आरमारास तख्ते, सोट डोलाच्या काठ्या आदीकरून थोर लाकूड असावे लागते,  ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जे लागेल ते परमूलकीहून खरेदी करून आण्वित जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आधी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू न द्यावा. काये म्हणोन की ही झाडे वर्षा दो वर्षांनी होतात ऐसै नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडलीयावरील त्यांचे दुःखास पारावार काये ? येकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारास हित स्वल्पकाळेच बुडोन नाहीसेच होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापिढणाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे त्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. "


दूरदृष्टी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आज्ञापत्र वृक्षारोपण काळाची गरज असल्याची तर सांगत नाही ! शिवाजी महाराजांच्या ज्या काळात होऊन गेले त्या काळात तर वनसंपदा महाराष्ट्रात अमाप होती. डोंगर दर्या घनदाट जंगल नद्या हीच महाराजांच्या स्वराज्य उभारणीस मोलाचे ठरले. एवढे जंगल असतानाही महाराज वृक्षारोपण वृक्ष संरक्षणासाठी स्वतंत्र आज्ञापत्र काढतात म्हणजे रयतेला जागृत करण्यासाठी त्यांची दूरदृष्टी आजही किती उपयुक्त ठरते. वनसंपदा मानवास किती लाभदायक आहे त्यांचा वापर कसा करावा त्यांची काळजी कशी घ्यावी हे महाराजांनी सोळाव्या शतकात आज्ञापत्राने पटवून दिले अशा या लोकराज्यांच्या विचारांचे स्मरण आज आवर्जून होते.


फार पूर्वी घनदाट अरण्य होती सूर्याची किरणे सुद्धा जमिनीवर पोहोचत नसेल एवढी दाट पण माणसाने आपल्या हव्यासापोटी काय केले प्रथम जीवनाची निगडीची गरज म्हणून निवाऱ्यासाठी नंतर सरपणासाठी आणि नंतर आपल्या स्वार्थासाठी हळूहळू जंगले उजाड केलेत. त्यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडला आणि पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ पाणीटंचाई अशा जीव घेण्यास समस्या निर्माण झाल्या याला जबाबदार कोण ? शहरीकरणाच्या नावाने जंगल तोडून सिमेंटची जंगले उभी राहिली दळणवळणासाठी रस्ते तयार झाली. मोठ मोठी झाडे तोडून मोठे मोठे रस्ते तयार झाले. रस्त्याच्या दुतर्फा लावलेले झाडे आता दिसेनासे झाले. झाडे लावावे दुसऱ्यांनी आणि त्याचा आसरा घ्यायचा आपण असे सर्वांनी ठरवलं तर कसे होईल ?


भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या नोंदीनुसार 2009 ते 2011 या कालावधीत देशात एकंदर 667 चौरस किलोमीटर जंगलाचा भाग आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी 1.5 ते 2.7 या वेगाने घटक चालले आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत तर दुसरा बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करीत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहे. सन 2000 पासून जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यापैकी 60% च्या वर मृत्यू आशियात होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दरवर्षी 3.2 दशलक्ष मृत्यू प्रदूषणाचे निगडित आजाराने होत आहे. 


वृक्षांचे फायदे अनेक आहेत तेही मानव विसरले की काय असे वाटते. औषधी वनस्पती फळे फुले इंधन फर्निचर बांधकामास उपयोगी तर आहेत पण मानवास जगण्यासाठी लागणारा प्राणवायू सुद्धा मिळतोय ! ऑक्सिजन मिळण्यासाठी तरी झाड लावूया त्याला जगू या.. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी हे अत्यावश्यक आहे ही जाणीव होणे गरजेचे आहे.


शालेय जीवनापासूनच वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्त्व समजायला हवे. शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी होते आहे पण पाण्याच्या समस्येमुळे दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यामुळे वर्षांची देखभाल होत नाही. यामुळे ती वाळतात नष्ट होताना दिसतात अशावेळी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. दरवर्षी शासन स्तरावर कोणत्या वृक्षाचे रोपण होते पण किती टक्के त्याची संवर्धन होते. वृक्ष लावताना त्याची मोजमाप होते पण तीच लावलेली वृक्ष किती प्रमाणात जगली याचा भांग पत्ता लागत नाही. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून ती जगवली पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे.



आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्रामध्ये 33 टक्के वृक्षात आच्छादन आवश्यक आहे. या तुलनेत राज्यात आवरणाचे प्रमाण 20% एवढेच आहे. त्यामुळे पर्यावरणाचे असंतुलन असमतोल वाढते. प्रदूषण अशा गंभीर बदलांना सामोरे जावे लागत आहे या बाबीची तीव्रता व परिणामकता कमी करण्यासाठी शासन स्तरावरून गेल्या अनेक वर्षापासून वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या हाकेला ओ देऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी 'वन महोत्सव ' साजरा करूया.. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी उगीच सांगून गेले नाही " वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! "



- रमेश मुनेश्वर , स्तंभलेखक / नांदेड

( लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत )



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)