शिक्षण-प्रशिक्षण, कुशल मनुष्यबळाची देवाण-घेवाण यासाठी ऑस्ट्रेलियासमवेत संबंध अधिक वृद्धिंगत करणार – प्रधान सचिव मनिषा वर्मा | Manisha Warma

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई  : कुशल मनुष्यबळाची निर्मिती, आयटीआयमध्ये पायाभूत सुविधा तसेच प्रशिक्षण सुविधांचा विकास, स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियामध्ये देवाण-घेवाण वाढविण्यात येईल, दोहोंमध्ये संबंध अधिक वृद्धिंगत  करण्यात येईल, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.


ऑस्ट्रेलियातील शिष्टमंडळाने मंत्रालयात त्यांची भेट घेऊन कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिष्टमंडळात साऊथ मेट्रोपॉलिटन टीएएफई संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक टेरी डुरांट, नॉर्थ मेट्रोपॉलिटन टीएएफई संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक मिशेल होड, फिनिक्स अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाठक, स्टेनली कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक अल्बर्टो टसॉन, एआयसीएसचे संचालक पेरसीस श्रॉफ, एआयसी अकॅडमीचे संचालक शिजू मॅथ्युज, ऑटोमोटीव्ह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ व्यवस्थापक मेल ग्रीनहो, या संस्थेचे सीआयओ टोनी कॉली, साऊथ रिजनल टीएएफईच्या दार्शी गणेशन यांचा समावेश होता. महाराष्ट्राबरोबरचे संबंध अधिक वृद्धिंगत  करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील या विविध संस्थांकडून व्यापक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली.


याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव नामदेव भोसले, नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यातील आयटीआयचे सक्षमीकरण करणे, आयटीआयमध्ये उद्योगांच्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार तसेच जागतिक पातळीवर मागणी असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण अंतर्भुत करणे, राज्यातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणे, कुशल मनुष्यबळाची देवाण-घेवाण करणे, कुशल तरुणांना ऑस्ट्रेलियामध्ये रोजगाराची संधी देणे अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. जागतिक पातळीवर आवश्यक असलेल्या अत्याधुनिक दर्जाच्या विविध कौशल्यांचा आयटीआयच्या प्रशिक्षणात तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये समावेश करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.


प्रधान सचिव श्रीमती वर्मा म्हणाल्या की, राज्यातील सुमारे १ हजार शासकीय तसेच खाजगी आयटीआयमार्फत मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. उद्योगांच्या बदलत्या मागणीनुसार आयटीआयचे प्रशिक्षणही वेळोवेळी अद्ययावत करण्यात येत आहे. कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेसाठी राज्यात कायदा करण्यात आला आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलियातील विविध संस्थांनी राज्यात शिक्षण-प्रशिक्षण, कुशल मनुष्यबळाची देवाण-घेवाण यामध्ये भागिदारी करावी. राज्य शासनामार्फत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


कौशल्य विकास आयुक्त श्री. कुशवाह म्हणाले की, राज्यात सेंटर ऑफ एक्सलन्ससारख्या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासात भागीदारी, शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण-प्रशिक्षणामध्ये भागीदारी, स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियामध्ये संबंध विकसित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ जगामध्ये विविध ठिकाणी सेवा देत आहे. महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियामध्येही कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी स्किल गॅप भरुन काढण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी ग्वाही ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)