नंदुरबार, (शालेय वृत्तसेवा):
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमाणसात रुजावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याबाबत विविध सूचना दिल्या आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत अमृत महोत्सवानिमित्त ‘ स्वराज्य महोत्सव’ उपक्रम जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर राबविण्यात बाबत कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेले सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादीपासून तयार केलेल्या कापडाचा असावा. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त भाव धान्य दुकान, सहकारी संस्थांनी देखील हा उपक्रम राबवावा, हा उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .