वाजेगाव बीटची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षिलेल्या मूलभूत वाचन आणि संख्याज्ञान क्षमता विद्यार्थ्यांत विकसित करण्यासाठी सर्व शिक्षकांनी नवीन शैक्षणिक वर्षात नव्या ऊर्जेने सज्ज होऊन विद्यार्थ्यांना विविध प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देऊन समृद्ध करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांनी केले. त्या ज्ञानमाता विद्याविहार येथे आयोजित वाजेगाव बीटमधील मराठी माध्यमाच्या सर्व शिक्षकांच्या बीटस्तरीय शिक्षण परिषदेत बोलत होत्या. याप्रसंगी नांदेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, ज्ञानमाता शाळेचे मुख्याध्यापक फादर शिजुमन एम. ई. हे उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, मराठी माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांची स्पर्धा सध्या कार्पोरेट व्यवस्थापन असणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी आहे. त्यामुळे शिक्षकांनी अतिरिक्त मेहनत घेऊन प्रत्येक विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती समृद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय काटक आणि मेहनती असतात, त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेऊन ते पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रवृत्त करावे, असे मत व्यक्त केले. प्रारंभी शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांनी सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन स्वागत केले.
गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी मुख्याध्यापकांसहित, सर्वच शिक्षकांनी विद्यार्थी हा अंतिम लाभार्थी आणि गुणवत्ता हे अंतिम लक्ष्य ठेऊन कार्य करावे, ही अपेक्षा व्यक्त करत शिक्षकांना सेतू अभ्यास, निपुण भारत, नवीन शैक्षणिक धोरण यांची सखोल माहिती घेण्यास प्रेरित केले. वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी शाळेत येणारे प्रत्येक मूल हे टवटवीत फूल असते, त्या फुलाला अजून फुलवायचे की कोमेजवयाचे हे शिक्षकांच्या हातात असते. त्यामुळे आपल्या प्रसन्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वाची छाप विद्यार्थ्यांवर पाडत, शैक्षणिक कर्तव्याला अग्रक्रमी ठेऊन कार्यमग्न होण्याची प्रेरणा त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना दिली.
यावेळी वाजेगाव बीटचे केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीराम मोगले, सीमा देवरे, रूपाली गोजवडकर, रूपाली पांपटवार ह्यांनी विषयवार सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कमलाकर भद्रे, तंत्रस्नेही शिक्षक गणपत मुंडकर, अक्षय ढोके यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .