राज्याच्या शिक्षण संचालकांना पीएचडी प्रदान.. | Dinkar Patil

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

मानवाच्या जीवनात शिक्षण हे महत्वाचे आहे. शिक्षण प्राप्त करण्यासाठी वयाची, पदाची मर्यादा नसते. अव्याहतपणे शिक्षण प्रक्रिया चालूच असते. पण शिक्षण क्षेत्रात उच्च पदस्थ कार्यरत असताना शिक्षण घेणारे विरळाच !  नव्या शैक्षणिक प्रवाहात व शैक्षणिक धोरणात नवनवे प्रयोग करत असताना शिक्षण विभागात वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना  प्रवृत्त केले जात असते. आणि अशा शिक्षकांना आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील. 


पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षणशास्त्रात पीएचडी जाहीर केली आहे. शालेय शिक्षणातील नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरलेल्या व शिक्षकांसाठी अनिवार्य अशा सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी ‘नवबोध सेवांतर्गत प्रशिक्षण प्रतिमान’हे मॉडेल त्यांनी संशोधनातून विकसित केले असून हे संशोधन कार्य त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी शिक्षण विभागास अनोखी भेट ठरणारे आहे.


‘प्राथमिक शिक्षण स्तरावरील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण प्रतिमान विकसन व त्याची परिणामकारकता’ असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी डॉ. मेघा उपलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण व विस्तार विभागात शिक्षणशास्त्रात सर्वेक्षण व प्रायोगिक अशा दोन्ही पद्धतीचा वापर करून हे संशोधन कार्य पूर्ण केले.

 

पाटील यांनी शिक्षकांसाठी सद्यस्थितीत जी प्रशिक्षण व्यवस्था आहे तिचा अभ्यास करून त्या आधारे प्रशिक्षणाचे हे नवीन प्रतिमान विकसित केले आहे, यासाठी त्यांनी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व शिक्षकांची मते जाणून घेतली. मॉडेलची परिणामकारकता त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासली. यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील इयत्ता पहिलीच्या गणित शिकवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 40 शिक्षकांवर हा प्रयोग केला व तो यशस्वी ठरला.नवविकसित प्रतिमानाचा फायदा प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी होणार आहे. प्रशिक्षणाचा खर्च कमी होणार असून वेळेचीही बचत होणार आहेे.


दिनकर पाटील यांनी शिक्षक ते शिक्षण संचालक अशी वाटचाल केली असून राज्य परीक्षा परिषद, प्रौढ व अल्पसंख्यांक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, बालभारती, राज्य मंडळ, राज्य अभ्यासक्रम संशोधन व प्रशिक्षण परिषद(एससीईआरटी) आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय या शालेय शिक्षण विभागाच्या सर्वच संचालनालयात संचालक म्हणून काम केलेले ते एकमेव संचालक आहेत. 


सध्या योजना संचालनालयात ते नियमित संचालक असून प्राथमिक संचालनालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत, येत्या ऑगस्ट अखेरीस ते सेवानिवृत्त होत आहेत.शिक्षण क्षेत्रात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सुखासमाधानाने जीवन जगण्याची स्वप्ने बघणे यात गैर काहीच नाही. पण निवृत्त होत असतानाही आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पीएचडीने एक आदर्श घालून दिला आहे. शिक्षक हा सुद्धा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो असे म्हणतात व शिक्षण अधिकार्याने हे आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने आज शिक्षण क्षेत्रात सकारात्मक चर्चेचा विषय ठरला आहे. 


हे उपयोजित मॉडेल असून त्याची लगेच अंमलबजावणी करता येणे शक्य होणार आहे, सदरचे संशोधन राज्यस्तरावर केले असल्याने राज्य शासनाला प्रशिक्षणाचे धोरण ठरवताना हे निश्चितच उपयोगी ठरेल अशी आशा आहे.”

दिनकर पाटील, शिक्षण संचालक


राज्यातील सरकार मधील स्थित्यंतरानंतर नवनियुक्त भविष्यातील शिक्षण मंत्री आपल्या अधिकारात कोणते बदल घडवतील हे काळच ठरवतील. शिक्षण क्षेत्रात नवनवे सकारात्मक व कृतीशील प्रयोग करणाऱ्या सृजनशील व्यक्तीस आमच्याकडूनही अभिनंदन व शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)