नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय - उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे यांचे प्रतिपादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( प्रतिनिधी गोपाल गावीत ) :

अध्यापन कार्यात नवनवीन संकल्पनांचा वापर करून नवोपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार उपजिल्हाधिकारी (ससप्र) श्रीमती कल्पना ठुबे यांनी काढले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. 


शालेय अध्ययन अध्यापन कार्यात शिक्षकांनी विविध नवीन उपक्रमांचा सहभाग करून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरते, ही बाब लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत अंगणवाडी सेविक/ अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासाठी एक गट तर प्राथमिक शिक्षक/ मुख्याध्यापक यांच्यासाठी दुसरा गट व माध्यमिक शिक्षक/ मुख्याध्यापक यांच्यासाठी तिसरा गट अशा तीन गटात या स्पर्धेचे आयोजन केले जाते.


 जिल्हाभरातील सर्व शाळांचे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोना कालावधीमध्ये ज्या स्पर्धेचे बक्षीस वितरण झालेले नव्हते. त्यामुळे आज उपजिल्हाधिकारी(ससप्र) श्रीमती कल्पना ठुबे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक श्री पंढरीनाथ जाधव, अधिव्याख्याता डॉ. संदिप मुळे,  श्री सुभाष वसावे, विषय सहाय्यक श्री देवेंद्र बोरसे, श्री अनिल सोनवणे, श्री युजवेंद्र देवरे यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.


 यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य केल्यास ते नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांनी शिक्षकांनी नवोपक्रमाची कास धरून विद्यार्थ्यांना नवनवीन अध्ययन अनुभव दिले, तर अध्यापन कार्य प्रभावी होईल, असे मत मांडले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांनी नवोपक्रम स्पर्धेची पार्श्वभूमी स्पष्ट करून जिल्हाभरातील शिक्षकांनी नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. 


उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना ठुबे यांनी उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यापूर्वी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. आपण सर्व विद्यार्थी घडविण्याचे अर्थातच देश घडवण्याचे काम करीत आहात, आपले ऋण विसरता येणे शक्य नाही, असे सांगतानाच प्रत्येक व्यक्तीने जीवनात नवनवीन उपक्रमांचा उपयोग केल्यास जीवन यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत मांडले.


 यावेळी नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी कोरोना काळात आपण राबवलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. त्यात श्रीमती कामीनी पवार, श्रीमती बबीता पाडवी, रवींद्र गुरव, रवी एकलारे,दशरथ करांडे, नितीन महाजन, चेतन पाटील यांनी आपापल्या उपक्रमांची माहिती दिली.


 सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील नवोपक्रम स्पर्धेतील प्राथमिक शिक्षक गटातून रुपेश दिगंबर नागलगावे जिल्हा परिषद शाळा कालेखेतपाडा ता. धडगाव यांना प्रथम क्रमांक तर कामिनी रामदास पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ९ ता. तळोदा यांना द्वितीय क्रमांक व दशरथ रामभाऊ करांडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलवाई तालुका तळोदा यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक गटातून रवींद्र अरुण गुरव नेमसुशील विद्यामंदिर तळोदा यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.


 सन२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला. त्यात अंगणवाडी सेविका/ कार्यकर्ती गटातून बबीता रोशनराज पाडवी डोंगरपाडा (लोय) ता. नंदुरबार यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तर प्राथमिक शिक्षक/ मुख्याध्यापक गटातून रवी रामराव एकलारे, जिल्हा परिषद शाळा धुळीपाडा ता. नवापूर यांना प्रथम क्रमांक, दशरथ रामभाऊ करांडे जिल्हा परिषद शाळा शेलवाई ता. तळोद कामिनी रामदास पवार जिल्हा परिषद शाळा नंबर ९ तळोदा या दोघांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . 


नितीन बन्सीलाल महाजन जिल्हा परिषद शाळा, दलेलपुर ता. तळोदा यांना तृतीय उज्वला राजेंद्र भामरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागसरी ता  नंदुरबार यांना चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक/ मुख्याध्यापक गटातून रवींद्र अरुण गुरव नेमसुशील विद्यामंदिर, तळोदा यांना प्रथम तर चेतन रमेश पाटील श्री सातपुडा वैभव विद्यालय वाण्याविहीर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन पंढरीनाथ जाधव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)