नंदुरबार दि.२ ( प्रतिनिधी गोपाल गावित) :
तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थ्यांचे पालकत्व नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकांनी स्विकारले असून या विद्यार्थ्यांचा दहावीचा पर्यंतचा शिक्षणाचा खर्च, पुस्तके, वहया, कपडे व इतर साहित्याचा खर्च अधिकारी करणार आहेत.
तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय शाळेस नाशिक येथील शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण, नाशिक विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे, औरंगाबाद शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, अमरावती विभागाचे सहसंचालक रवींद्र वाणी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंन्द्र कदम यांच्या पथकाने भेट दिली.
याप्रसंगी सर्व अधिकार्यांनी मुलांशी हितगुज केले. प्रबोधन केले. आई वडील नसलेल्या ४ मुलांचे पालकत्व स्विकारले. शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण यांनी सदर विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतचा शिक्षणाचा खर्च अधिकारी उचलणार असून पुस्तके, वह्या, कपडे व साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत. या शाळेच्या निवासी हॉस्टेलला भेट देण्यात आली. तेथील आहाराची गुणवत्ता चांगली ठेवावी, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी, विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करावी यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घ्यावेत, असे आवाहन करत विद्यार्थ्यांचे आई वडील पालक तुम्हीच आहेत म्हणून शिक्षकांना जबाबदारीची जाणीव करून दिली.
शाळेला तात्काळ मान्यता इंडेक्स देण्याचे आश्वासन बोर्डाचे सचिव राजेंद्र आहिरे यांनी दिले. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंन्द्र कदम यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुधीर पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .