कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी नियमित प्रशिक्षण गरजेचे – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर | CEO Yogesh Kumbhejkar

शालेयवृत्त सेवा
0

 



नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

प्रशासकीय कामकाज अचूक आणि गतिमान होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत होवून त्याचा लाभ कार्यालयासोबतच नागरिकांनाही होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी येथे केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.


माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नागपूर सुधार प्रन्यासचे मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, अपर कोषागार अधिकारी प्रशांत गोसेवाडे, तज्ज्ञ प्रशिक्षक रवींद्र भालेराव, प्रदीप देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर आदी यावेळी उपस्थित होते.


कार्यक्षमता वृद्धीसाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्वाचे असतानाही अनेकदा प्रशासकीय विभाग प्रमुखांकडून त्याबाबत पुरेसा गांभिर्याने कार्यवाही केली जात नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे प्रशिक्षणाचे आयोजन करीत असल्याबद्दल श्री. कुंभेजकर यांनी समाधान व्यक्त केले.




आस्थापना, लेखाविषयक बाबींचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याविषयीचे ज्ञान नसेल अथवा अपुरे ज्ञान असेल तर संबंधित कार्यालय प्रमुखाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच प्रशासकीय कामकाजात चुका होतात. अशा चुका टाळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देवून त्या प्रशिक्षणाचा वापर कार्यालयीन कामकाजात व्हावा, यासाठी कार्यालय प्रमुखांनी आग्रही असले पाहिजे. लेखा परीक्षण अहवालामध्ये येणाऱ्या परिच्छेदातून आपल्याला यापूर्वी झालेल्या चुकांची माहिती मिळते, त्या चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण व सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे श्री. कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले.


व्यक्तिमत्वाचा विकास करताना चांगले गुण वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक ज्ञान मिळविण्यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. छोटे अथवा मोठे काम असो, ते सारख्याच निष्ठेने व चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा दृष्टीकोन सदैव अंगी बाळगावा. कार्यालयीन कामकाजात लेखा आणि आस्थापनाविषयक बाबींना अतिशय महत्व असून त्याविषयी सजग राहणे गरजेचे असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागातील आस्थापना व लेखा विषयक कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणारे आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग आपल्या कार्यालयीन कामकाजात करून आपली कार्यक्षमता वाढवावी. तसेच आस्थापना आणि लेखाविषयक कामकाज अचूक करण्यासोबतच कार्यालयीन कामकाजाचे व्यवस्थापन, विविध रजिस्टर, रोखवही, सेवापुस्तके अद्ययावत ठेवावीत. यापुढेही आवश्यकतेनुसार नियमितपणे अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल, असे श्री. बागुल यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक संचालक अपर्णा यावलकर यांनी केले, जिल्हा माहिती अधिकारी श्री. टाके यांनी आभार मानले. त्यानंतर दिवसभरात विविध सत्रात आमंत्रित तज्ज्ञ प्रशिक्षकांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)