कवयित्री आपल्या भेटीला : अर्चना गरुड / नांदेड

शालेयवृत्त सेवा
0

 



श्रावण 


आला श्रावण 

हरपले भान

गीत गुणगान

मन पावन


हसरी धरा

हिरवी पालवी

घरटी डोलवी

आनंदी चरा


पाऊसधारा

नद्या खळखळ

पाने सळसळ

उनाड वारा


ही वसुंधरा

मनास भावते

रूपडे दावते

सृष्टी सुंदरा


पवित्र मास

धार्मिक जागृती 

आणते प्रकृती 

मनी उल्हास


- अर्चना गरूड / किनवट 

__________________________________


⚫ " शेत "


शेत शिवारी

देह झीजवितो

मळे फुलवितो

बळी कैवारी


काळी ही आई

पोशिंदा विश्वाची

जोडी वृषभाची

श्रमात न्हाई 


दातृत्वभाव

उदार हृदय

जीव भाग्योदय

वल्हवी नाव


सौंदर्य रूप 

सर्वांना हर्षिते

वर्षा वर्षविते

सुखावे खूप 


देई आधार 

पशुपक्ष्या चारा

पोसते पसारा

सृष्टी उद्धार 


व्हा संरक्षक 

सेंद्रिय वापर 

करूया जागर

खते तक्षक


कृषी अस्तित्व 

फुलेल संसार

अन्यथा संहार

जीव अस्तित्व 


- अर्चना गरूड / किनवट

_________________________________


रानफुले


तप्त कडक उन्हात 

फुले रानी रानफूल

रूप साजिरे गोजिरे

तन मना पाडी भूल 


रंग केशर पिऊन 

उभा निष्पर्ण पळस

ऊर्मी चैतन्य संचारी

दूर घालवी आळस


डोंगराळ माथ्यावर 

काटेशेवरी फुलली

मधु पराग पिऊन 

पक्षी फांदीत झुलली


धवल वर्णी कदंब

ठेवी खिळून नजर 

गोलाकार रम्य पुष्प

करी काळजात घर


पिवळाजर्द बहावा

देई मनस्वी उमंग

नानाविध रानफुले

फुलवती अंतरंग 


देई निसर्ग संदेश 

जगा फुलून आनंदी

अंगी बाणून संयम

वृत्ती ठेवावी स्वच्छंदी


- अर्चना गरुड / किनवट

________________________________


 ⚫ आई


आई असते

मांगल्याचे प्रतिक

मन रांगोळीतील

शुभ स्वास्तिक


आई असते 

वृंदावनातील तुळस 

सहवासात गाठतो

प्रगतीचा कळस


आई असते 

शितल सावली 

प्रेमगारवा देणारी 

एकमेव माऊली 


आई असते 

मायेची घागर 

प्रेमनीरा प्राशता

सुखावते आगर


आई असते 

भावनेचे नाव

घेते काळजाचा

अचूक ठाव


आई असते 

लेकराची हिंमत 

शौर्य - धैर्याची

अमूल्य किंमत 


आई असते 

प्रितीचा झरा

अखंड पिऊन 

साठवावे उरा


आई असते 

देहातला प्राण

बाळहिता करी

आयुष्याचे रान


आई असते 

वात्सल्याच्या राशी

दूरवर असूनही 

चित्त पिलापाशी


- अर्चना गरूड / किनवट

__________________________________


अथांग सागर


आवडतो मज खूप 

निळा अथांग सागर 

भरती ओहोटी रूपी

सुख दुःखाचे आगर


येती जीवनी प्रत्यय

क्षणिक सुखाच्या लाटा

खवळता हा सागर 

येई अंगावर काटा


सागरी गर्भात वास

रम्य मौलिक खजिना 

शुभ्र तेज मोती माळा

आवडता स्त्री दागिना


कोळी बांधवाचा प्रिय 

नारळी पौर्णिमा सण

करी अंतर्मनी घर

प्रातः सूर्योदय क्षण


नमो सागरी देवता

करावे विशाल मन

कृपा दृष्टी सृष्टीवर

व्हावे सुखद जीवन


 - श्रीमती अर्चना दिगंबर गरूड

 'संस्कृती निवास' Svm कॉलनी, ओम शांती सेंटर जवळ, किनवट,ता.किनवट, जि.नांदेड

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)