मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
भविष्य निर्वाह निधीधारक राज्य शासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सन 2021-22 या वर्षातील खात्याचे वार्षिक विवरणपत्र (स्लिप्स) प्रधान महालेखापाल कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भविष्य निर्वाह निधीधारकांनी हे वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळवावे, असे आवाहन उपमहालेखापाल (निधी) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील भविष्य निर्वाह निधीधारक सन 2021-22 या वर्षाचे वार्षिक विवरणपत्र पाहण्यासाठी/ डाऊनलोड करण्यासाठी/ प्रिंटिंगसाठी सेवार्थ प्रणालीच्या संकेतस्थळास भेट देऊ शकतात. राज्य शासनाने वर्ष 2019-20 पासून मूळ प्रती देणे बंद केले आहे. जीपीएफ खात्यासंदर्भात विवरणपत्रामध्ये विसंगती अथवा त्रुटी आढळल्यास उप महालेखापाल आणि प्रधान महालेखापाल कार्यालयाशी संपर्क साधावा.
जमा आणि वजावटीतील तफावत, जन्म दिनांक आणि नियुक्तीची तारीख विवरणपत्रावर छापील नसल्यास या नोंदीच्या पडताळणी आणि अद्ययावतीकरणासाठी प्रधान महालेखापाल यांच्या कार्यालयात पाठवाव्यात. तसेच agaeMaharashtra1@cag.gov.in हा ईमेल पत्ताही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी 2 रा मजला, प्रतिष्ठा भवन, न्यु मरीन लाईन्स, १०१, महर्षि कर्वे मार्ग मुंबई ४०० ०२० या पत्त्यावर तसेच, 022-22039680 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
( श्रद्धा मेश्राम / उपसंपादक )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .