[ १ ऑगस्ट : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त साहित्यीक विजय वाठोरे यांचा लेख देत आहोत - संपादक ]
"जग बदल घालून घाव
मज सांगून गेले भीमराव"
अश्या शब्दात बाबासाहेबांची शिकवण सांगत परखड आणि प्रभावीपणे लेखन करणारे,जातिभेदामुळे शिक्षणापासून,समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व,वैयक्तिक दुःखाचा ज्यांनी कधी विचार केला नाही. " पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तोलली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे."अशी विज्ञानवादी भूमिका मांडणारे,महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व पीडित,दलित,शोषित, कष्टकरी यांचे शोषण संपविण्यासाठी आयुष्यभर लढा देणारे व्यक्तिमत्त्व,समाज परिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक, आपल्या कलेतून ,लिखाणातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे लोकशाहीर,साहित्यसम्राट म्हणजेच अण्णा भाऊ साठे.
त्याकाळी जातीभेद आणि वर्णभेदावरून हिंदू लोकांनी काही दलित जातींना गावाबाहेर ठेवले होते.यांच्याकडून सनातन हिंदूंनी स्वच्छतेची कामे करून घेतली मात्र त्यांना कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत खितपत ठेवले.अश्याच एका कुटुंबात १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे अण्णांचा जन्म झाला.अण्णांची आई वालुबाई व घरातील इतर लोक दोर वळण्याच्या कामाला जात.अण्णांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे हे लेकराबाळांच्या पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत.अण्णांचे वडील हे माळी आणि शेतीतज्ज्ञ होते.अण्णांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते.घरातली सर्व मोठी माणसे कामासाठी बाहेर जात यामुळे घरातील लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी अण्णांची होती.
अण्णांना पदोपदी जातीभेद आणि शिवाशिवी यामुळे खूप काही सहन करावे लागले.खालच्या जातीतील लोक म्हणून गावातील कुणाला शिवायचे नाही किंवा हातात हात मिळवायचा नाही नाहीतर त्यांचा विटाळ होतो म्हणे.अण्णांनी हे सर्व लहानपणीच पाहिले व अनुभवले.अण्णांना खूप प्रश्न पडायचे.त्यांचेवडील गावाकडे आले की ते त्यांना विचारायचे.मुंबईत पण शिवाशिव आहे का हो ? अण्णांचे वडील त्यांना सांगायचे ,तिथं आपलीच माणसं सारी पण शिवाशिव आहे तिथंही.खालच्या जातीतील लोकांसाठी हाटेलात चहा पिण्यासाठी फुटक्या कप बश्या ठेवतात अन त्यातच त्यांनी चहा पियायची.पण मी जिथं माळीकामाला जातो तिथं कोणतीच शिवाशिव नाही,तिथले इंग्रज साहेब त्यांच्याच कपात चहा देतात.कोणतीही शिवाशिव नाही.सगळ्याना समान वागणूक दिली जाते.पण हे आपलेच लोक आडगी आहेत.यामुळेच इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत.आपण एका देशातले असूनही एकमेकांना शिवून घेत नाही.
मुंबईत राहून भाऊराव यांना शिक्षणाचे महत्व कळले होते.यामुळे आपलेही मुलंबाळं शिक्षण घ्यावेत अशी त्यांची मनोमन इच्छा होती.त्यांच्या आग्रहामुळेच अण्णांना वयाच्या १४ व्या वर्षी शाळेत टाकण्यात आले.अण्णा एक दिवस शकत गेले.दुसऱ्या दिवशी शिक्षकाने त्यांना अक्षर गिरविण्यावरून अण्णांना शिवीगाळ आणि जबर मारहाण केली .अण्णांना ते पटलं नाही.अण्णा तडक ते शाळा सोडून घरी गेले ते कायमचे.नंतर त्यांनी कधी शाळा शिकलीच नाही.कुठल्याही शाळेत न जाता ते आपल्या स्वतःच्या क्षमतेवर शिकले.
लहानपणापासूनच अण्णांचे छंद वेगळेच होते.भटकंती करणे,मध गोळा करणे,शिकार करणे हे छंद त्यांना जडले होते.मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरायला कोणी नव्हते.मोठे होत होत ऱ्यांच्या आवडीत व छंदात वाढ होत गेली.गावोगाव च्या जत्रा फिरणे ,निरीक्षण करणे हे त्यांचं आवडीचं काम झालं होतं.यानंतर त्यांना पाठांतराची भर पडत गेली.त्यांनी अनेक पोवाडे,लोकगीते ,लावण्या मुकपाठ केल्या होत्या.आणि हे सर्व ते मोठ्या आत्मीयतेने सर्वांना म्हणून दाखवत यामुळे त्यांच्या आसपास मित्रांचा गोतावळा जमायचा.
मुंबईत पोटापाण्यासाठी भटकत असताना त्यांनी बूट पॉलिश करणे,घरकाम,शिपाई,हमाली,कोळशे वाहक,मुलांना खेळविणारा,कुत्र्याला सांभाळणारा,ड्रेसिंगबॉय, उधारी वसूल करणारा,खाण कामगार अशी अनेक कामे त्यांनी केली .यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची कल्पना येते.एका जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले आणि ते भाषण त्यांना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेलं.स्वातंत्र्य चळवळीत वेगवेगळ्या विचारधारेचे कार्यकर्ते होते.पण त्या सर्वांचा एकच उद्देश होता तो म्हणजे इंग्रज्यांच्या तावडीतून भारताची सुटका करणे.अण्णा कम्युनिस्ट विचारसरणीचे अनुयायी बनले.पक्षांच्या सभेचे आयोजन करणे,हॅण्डबिल्ले वाटणे,छोट्या मोठया सभेसमोर गोष्टी सांगणे,वालपेंटिंग करणे,मोर्चे काढणे,पोवाडे,लोकगीत म्हणून दाखविणे यामुळे ते कम्युनिस्ट मध्ये सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्त्व झाले होते.त्याचवेळेस त्यांचे तुकाराम चे अण्णा या नावात रूपांतर झाले.
महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच.तमाश्यात वारणेचा वाघ प्रथमच पहायला मिळाला.अण्णांनी तमाशा सारख्या कलेला अधिक प्रसिद्धी,प्रतिष्ठा आणि समृद्धी मिळवुन दिली.त्यांचे प्रत्येक पत्र,नाटक ,वगनाट्य हे अगदी ओघवत्या शैलीत असायचे.त्यांच्या प्रत्येक पात्राचे आकलन सर्वाना सहजच व्हायचे.अण्णांना बरेच वाद्य वाजवता येत असत.याचा वापर त्यांनी तमाशात केला,अण्णां बहुरंगी व्यक्तिमत्त्व तमाश्यात खुलून दिसायचं.त्यांचे पाठांतरही उत्तम होते आणि यामुळेच तमाशाच्या कलेला त्यांनी लोकनाट्यात रूपांतरित केले.या लोकनाट्यातुन त्यांनी वेळोवेळी समाजात जाणीव जागृती व प्रबोधन करण्याचे काम केले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी प्रचंड जनजागृतीचे काम केले.चले जावं आंदोलनात ते सहभागी झाले होते.यामुळे त्यांच्याबद्दल वारंट देखील निघाले होते.,परिणामी त्यांनी घर सोडले.कम्युनिस्ट पक्षाच्या कामासाठी पूर्णवेळ देऊ लागले.हे कार्य करत असताना त्यांनी १९४४ मध्ये ' लाल बावटा ' कला पथकाची स्थापना केली.
अण्णांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणजे फकिरा.ही कादंबरी त्यांनी त्यांच्या मामा फकिरा यांच्यावर लिहिली होती.ही कादंबरी अण्णांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेली आहे.तसेच वारणेचा खोऱ्यात या कादंबरीत स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.अण्णांनी माकडीचा माळ, वैजयंता,चिखलातील कमळ,वारणेचा वाघ,फकिरा,रूपा, चित्रा,आवडी अश्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या.३०० च्या वर कथा लिहिल्या.त्यांच्या बरबाद्या करांजी,कृष्णाकाठच्या कथा असे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.त्यांचा मुंबईचा कामगार,महाराष्ट्राची परंपरा, स्टोलीनग्राड चा पोवाडा असे पोवाडेही लिहिले.दोन अडीचशे गाणी,लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत.अकलेची गोष्ट ,दुःकाळात तेरावा,घोटाळे अशी प्रसिद्ध वगनाट्यही लिहिली आहेत.शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर व अण्णांनी मिळून १९४१-१९४२ मध्ये मुंबईवर अधिराज्य गाजविले होते.
अण्णांची ' स्मशानातंल सोनं ' ही कथा खूप प्रसिद्ध आहे.त्यांचे " माझी मैना गावावर राहिली " हे छकड साऱ्या महाराष्ट्रात सर्वांना हवीहवीशी वाटते,आजही सर्वांच्या तोंडात आहे.पण जशी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याची त्या काळात जशी उपेक्षा झाली तशीच उपेक्षा अण्णा भाऊ साठे यांची झाली.पण मराठी साहित्य विश्वात अण्णा भाऊ साठे यांचे उल्लेखनीय योगदान आहे.त्यांच्या कादंबऱ्या ,कथा,वगनाट्य मराठी साहित्याला समृद्ध करतात.अण्णा भाऊ यांच्या साहित्यिक योगदानास कुणीही नाकारू शकत नाही,तसेच त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत ही उल्लेखनीय योगदान आहे.अश्या या महापुरुषाच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम..!
- विजय वाठोरे / नांदेड
( 9975593359 )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .