कवी आपल्या भेटीला : कवी अनिल मनोहर

शालेयवृत्त सेवा
0

 



⬛ कोणते आकाश पेरू नव्याने..


कोणते आकाश पेरू नव्याने डोळ्यात माणसांच्या

उगवला नाही सूर्य अजुनी मळ्यात माणसांच्या


वळवून पाहिले ढगांना वाटेवरी शिवारांच्या 

भिजवाया आलेच नाही कधी अंगणी माणसांच्या


बहाणे चंद्राचे ठावूक आहे उघड्या झोपड्यांना

दावलाच नाही कधी वाटेत प्रकाश माणसांच्या


पेरतो स्वप्न खोटे तरी वाटते सत्य पाखरांना

उतरल्याच ना कधी चांदण्या झोळीत पामरांच्या


-अनिल मनोहर / नाशिक

______________________________________


⬛ पाऊस : तुझ्या माझ्या जगण्याचा !


पाऊस तुलाही हवा 

पाऊस मलाही हवा

जगण्याच्या वाटेवर 

खळाळणारा प्रवाह हवा

पाऊस हवा पाखरांच्या पंखांना

बहरणाऱ्या झाडांना

उमलणाऱ्या कळ्या फुलांना

पाऊस मातीला हवा 

पाऊस शेतीला हवा

डोलनाऱ्या उभ्या पिकाला हवा

पाऊस तापलेल्या जीवाला हवा

पाऊस पडल्यावर रानाचा रंग खुलतो

मातीचा सुगंध दरवळतो

पाऊस रानाला पालवतो

नव्याने मातीची कुस उजवतो

पाऊस शेतीची मशागत करतो

बियानाची तिफणीने पेरणी करतो

बळीराजाच्या अंगणात

रास मोत्याची मांडतो

पाऊस माणसांना पळवतो

आडोशाला नेवून लपवतो

प्रेमाच्या नव्या अंकुराला

हिरव्या बागेत भिजवतो

पाऊस माणसाला शिकवतो जिणे

पावसाविना माणूसही उणे

पिकांना असते ओढ पावसाची

तशी त्यालाही असते निसर्गाची

पाऊस माणसांना माणसात आणतो

जगण्याचे शिवार फुलवतो

माणसं कधी फुलवणार मानवतेच्या अंगणात

माणसांचा मळा?


-अनिल मनोहर / नाशिक


_____________________________________


असे मी म्हणणार नाही..


थांबून घे पावसा मी म्हणणार नाही

लांबलेली पेरणी उरकून घेऊ दे....


उन्हात गाळून घाम केली मशागत

भिजलेल्या मातीस या वारानी येऊ दे.....


वाढते बहरते हाताशी पीक येता

येऊ नकोस तेव्हा रास घरी फुलू दे.....


आसेवरी तुझ्याच फुलतो संसार माझा

मुखात लेकरांच्या आनंद बहरू दे.....


डोईवरी कर्ज वाढते रे जगण्याचे

पिकलेल्या धान्यास रास्त भाव मिळू दे.....


बांधावरी शेतात हे झाड सावलीचे

बहरू देत फांद्या अन् फास टळू दे.....


दावू नकोस स्वप्न मिष्ठान्न भोजनाचे

संपली नाही भूक क्रांती गीत गाऊ दे....


-अनिल मनोहर / नाशिक

___________________________________


पहिला पाऊस !


आला पहिला पाऊस

गेली मोहरुन माती

तिच्या उदरात सारी

आली उमलून नाती....

मेघ दाटले आभाळी

बळीराजा सुखावला

पेरणीची मशागत

देह घामात भिजला....

पक्षी आभाळी उडाले

वेली पालावून आल्या

भीजलेल्या रानामंदी

कळ्या नाचून दमल्या.....

सारा निसर्ग हिरवा

झाले हिरवे शिवार

जगण्याच्या वाटेवर

उभी पावसाची सर......

माणसाने चिंब व्हावे

पावसाचे गुण घ्यावे

फुलणाऱ्या शिवाराला

समतेचे दान द्यावे.....


-अनिल मनोहर / नाशिक

___________________________________


कवितेने माणूस व्हावे !


कविता पावसाची असो

प्रेमाची असो नाहीतर निसर्गाची असो

कविता वेदनेची असो 

भाकरीची किंवा असो विद्रोहाची

कविता पंढरीची असो, वारीची असो

तिने प्रकाशाची गाणी गावे

अंधारावर उजेड पेरावा

माणसं माणसं उजळत यावे

वेशीवरचा अंधार नष्ट करावा

कवितेने माणसाचं शिवार फुलवावे

अन्यायावर पेटून उठावे

हक्कासाठी रस्त्यावर उतरावे

परिवर्तनाची कास धरावी

सूर्याची सोनेरी किरणे भूमीवर शिंपडत

कवितेने फक्त माणूस व्हावे.


-अनिल मनोहर / नाशिक

___________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)