"कष्टक-यांचा 'अंतःस्थ हुंकार' उजागर करणारी कविता ! ". --- अरुण हरिभाऊ विघ्ने

शालेयवृत्त सेवा
0






मानवी जिवनात अनेक घटना घडत असतात. त्याचे प्रत्यक्ष वाअप्रत्यक्षपणे, बरे -वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात. त्या बदलाचे  परिणाम संवेदनशील मनावर देखील होत असतात . मानवी मनातील अंतःस्थ हुंकार मग विविध कलाकृतीतून साकारल्या जातो . असाच एक प्रयत्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत असलेले तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी म्हणून काम बघत असलेले प्रा.डाँ.शिवाजी नारायणराव शिंदे यांनी आपल्या ' अंतःस्थ हुंकार ' या दुस-या कवितासंग्रहाच्या माध्यमातून केलेला दिसतो. त्यांचा पहिला कवितासंग्रह म्हणजे 'कैवार' . 'कैवार'च्या यशानंतर त्यांनी शोषित समाज मनातील 'अंतःस्थ हुंकार'चा  यशस्वी प्रयोग केलेला दिसतोय . 


हर्मिस प्रकाशनने प्रकाशीत केलेल्या या पुस्तकात एकूण 74 रचना आहेत. यापैकी 12 अभंग रचना आहेत, काही द्विपदी व अष्टाक्षरीच्या जवळपास जाऊ पाहणा-या रचना आहेत. तर 4 गीत स्वरुपाच्या व अधिक संख्येने गद्य स्वरुपातील मुक्तछंदातील रचना आहेत. काही गझलसदृश्य रचनाही आहेत. तसेच 11 रचना या शेती,माती,शेतक-याच्या व्यथा,वेदना अधोरेखीत करणा-या असून 3 कोरोणासंबंधीच्या, 2 आईबाबा गेल्यावर या विषयावर आधारीत आहेत, तर 3 राजकारण विषयाशी संबंधीत आणि 3 मुलगी,स्त्री या विषयाशी संबंधीत आहेत . जेव्हा न कळत एखादं नैसर्गीक संकट येतं, तेव्हा जनजीवन अस्ताव्यस्त होतं . महापूरासारखं संकट जेथे येतं तेथील लोकांचे संसार अचानक उध्वस्त होऊन लोक रस्त्यावर येतात . अशा घटना बघताच कलाकाराच्या, कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकारांच्या मनाची संवेदनशीलता त्याला स्वस्थ बसू देत नाही . आणि मग ते संपूर्ण चित्रच कागदावर साकारल्या जातं. 


" भिजला संसार । सारेच बेहाल

मनी कोलाहल । पावसात ।।


जाहले बेघर । घर सैरभर ।

नयनी हा पूर । आसवांचा ।।


माय लेकराचे । पाहुनिया चित्र ।

मांडू कसे चित्र । निसर्गाचे ।।"

('महापूर ' पृष्ठ क्र. 22)


येथे कवी आपल्याला मनाने हळवा झाल्याचे बघायला मिळतं . याचाच अर्थ त्याला सामाजीक प्रश्नांची, समस्यांची  जाण आहे.


विज्ञानाचे शोध हे अनाठायी नसले तरी निसर्गावर सहजासहजी मात करता येत नाही . निसर्ग एका हाताने देतो तर एखाद प्रसंगी दुस-या हाताने घेऊनही जातो . असंही कधी कधी बघायला मिळतं. शेवटी असा आघात अधिक प्रमाणात शेतकरी व कष्टकरी यांच्यावरच अधिक होतांना दिसतो . त्यांना अशा संकटातून सावरने कठीण जातं. या भावस्पर्शी रचनेतून महापूराचं हृदयस्पर्शी वर्णन कवी शब्दातीत करतो. कविचे नाते हे गावाशी व गावातील लोकांशी जुळले असल्याचे बघायला मिळते. शेतकरी हा, महापूर असो, अवकाळी पाऊस असो, कोरडा वा ओला दुष्काळ असो, याचे चटके तो नेहमीच सहन करीत आला आहे. पण त्याला कुणीतरी मदतीचा प्रामाणीक हात द्यावा, ही माफक अपेक्षा त्याची असते. पण तसं घडतं का ? हा कविला पडलेला रास्त प्रश्न म्हणावा लागेल. हे वास्तव कवी आपल्या रचनेतून पोटतिडकीने मांडताना दिसतोय.


" उंटावरून ते । करी पंचनामे ।

ऐकेल ग-हाणे । पोशिंद्याचे ।।

लाचखाऊ येती । पंचनाम्यासाठी ।

मारावया काठी । कुणब्याला ।।"

( अवकाळी पाऊस, पृष्ठ क्र. 27)


बळी राज्याला अनेक अस्मानी व सुल्तानी संकटांना सामोरे जावे लागते . निसर्गाने तारलं तर व्यापारी, दलाल, आडते ,पडलेला भाव यापासून सुटका नाही . अवकाळी पावसात बुडालेल्या पिकांचे पंचनामे करणारी यंत्रणा खरोखरच जागेवर जाऊन पंचनामे करतात का ? झालेल्या नुकसानीची योग्य नोंद केली जाते का ? त्यातही मिळणारा मोबदला हा त्याचे नुकसान भरून काढू शकतो का ? असे अनेक प्रश्न कवीला पडतात.  शेतक-याची ही अवस्था कवी प्रांजळपणे आपल्या रचनेमधून मांडताना दिसतो . अनेक शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कुटुंब धस्तावलेलं असतं . मुलं त्याला सतत धीर देत असतात . परिस्थितीला कंटाळून आपल्या बाबाने आत्महत्या करू नये ,अशी गळ घालणारी मुलगी त्याला धीर देताना म्हणते ...


" " सर्वजण मिळून संकटाला

आपण तोंड देऊ

आलेल्या परिस्थितीला

खंबीरपणे सामोरे जाऊ !"

( व्यथा कन्येची पृष्ठ क्र. 37)


अतिशय आशयगर्भीत व भावस्पर्शी रचना . कवी यातून आशावाद पेरतो, तो शेतक-याच्या कुटुंबाची व्यथा समजून घेऊन परिस्थितीशी लढ्ण्याचा सल्ला देतो . हल्ली गावातील शिकलेली अनेक मुलं शहरात स्थायीक झालीत पण गावाला विसरत चालली आहेत का ? आई-वडीलांना विसरून आपलं आयुष्य सुखात जगताहेत का? हे शल्य कवी मांडताना दिसतो . कदाचित हे दृश्य अनेकांना ही दिसत असावं .


" हल्ली म्हणं त्याला गावाकडे जाणं जमत नाही

खेड्यातल्या मातीत म्हणे त्याचं मन रमत नाही ! " ( पृष्ठ क्र.39)


अलीकडे कृतघ्नपणाची भावना माणसात बळावत चालली की काय ? असं वाटून जातं . अशा प्रवृत्तीचा कवी खरपूस समाचार घेताना दिसतो . हे वास्तवाचं भान कविची कविता जपताना दिसते. ती अशा लोकांना त्यांच्या स्वभावाचा आरसा दाखविते . अवकाळी पाऊस, वाटणी, हल्ली गावाकडे जाणं जमत नाही, बळीराजाची नशिबाने थट्टा केली, जगणं शेतक-याचं, पोशिंद्याचं स्वप्न, कुणब्याची पोरं, व्यवस्थेचे बळी, बळीराजाचे आनंदाश्रू, बळीराजाचा घात, पोशिंदा इत्यादी रचना शेतक-यांची व्यथा, वेदना, समस्या, संकटावर उभं असलेलं आयुष्य याविषयी भाष्य करताना दिसते . 


एखाद्या विवाहीत मुलीचे आई-वडील मृत्यू पावल्यावर तीचं माहेर तुटून जाते . भाऊ असून नसल्यासारखेच असतात. जिव्हाळ्याची नाती अशी एकाकी का तुटतात? का एकमेकापासून दुरावतात ? ही तिच्या मनातील सल तिला सतत या गोष्टीची आठवण करून देत असते. खरच का रक्ताची नाती इतकी नाजूक असतात ? आता ती केवळ व्यवहारापूर्तीच शिल्लक राहीली असावी का ? असा भाऊबंधाविषयीचा प्रसंग उपरोधीकपणे कवितेतून प्रकट झालेला दिसतो . परंतु असा अनुभव सर्वच कुटुंबाविषयीची असेलच, असेही नाही . पण अशा काही उदाहरणांचं प्रतिनिधीत्व करणारी ही रचना वाचकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहातं नाही . 


" अगं पुढच्या महिन्यात येईल तुला घ्यायला

हिस्सा वाटणीच्या कागदावर सहीसाठी

तिनं मान हलवत डोळ्यातील अश्रू पुसले !"

( 'आई-वडील गेल्यावर' पृष्ठ क्र. 95)


माणूस आणि त्याचं जगणं हा विषय शिंदे यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः शेतकरी,कष्टकरी,शोषित, पिडीत या वर्गातील माणसाबद्दल ते भरभरून व पोटतिडकीने लिहितांना दिसतात . ही त्यांच्या कवितेची जमेची बाजू आहे . जड शब्दांचा कवितेला मोह नसून ती साध्या शब्दात सर्वसाधारण माणसाचं जगणं अधोरेखीत करते . अभंगासारख्या कमीत कमी शब्दातून ती भरपूर आशय मांडते . कवी ज्या वातावरणात जगला कदाचित तेथील माणसाची व्यथा ही जवळून अनुभवली व भोगली असावी . किंवा नसेलही पण  ह्या बाबी साहित्तिकांच्या साहित्यातून पाझरायला पाहिजेत . 


वास्तव मांडण्याचं धाडस साहित्तिकांच्या लेखनीत असलं पाहिजे. तरच ते साहित्य वाचक, रसीकांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकते . गावातील कुनब्याची पोरं ही बापाला त्याच्या कामात हातभार लावीत असतात . गावातील सर्वच लोक मिळून-मिसळून राहतात. तसेच लहान बालकं गुरंढंर चारताना ती एकोप्याने, खेळतात,बागळतात, कांदा भाकरी खातात आणि एवढंच नव्हे तर आलेल्या संकटावर सर्व मिळून मातही करतात . त्यांचं मन हे निर्मळ असतं, द्वेश, मत्सर, भेदभाव या बाबींशी त्यांच्या मनाचा ताबा घेतलेला नसतो. ते समता,बंधुत्व प्रेमाचं मूल्य जपतात . एकमेकांच्या मदतीला धाऊन जाताना ते मैत्रीचं नातंही जपताना दिसतात. संत, महापुरूष यांची शिकवण बालमनावर प्रभाव करून जाते. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना कदाचित हे भावत नसावं आणि मग तीच मुलं वयाने मोठी झाली की तेथे राजकारण येतं. मनं दुभंगली,कलूसीत झाली की , हेच लोक एकमेकांच्या विरोधात ठाकतात . याचाही समाचार कविने ' सामाजिक विदारकता' या रचनेतून घेतलेला दिसतो . 


" येत नाही चीड

दिवसाढवळ्या होणा-या अन्याय- अत्याचाराची

कोणीच बोलण्यास धजत नाही,

बोथड झाल्या आहेत सा-यांच्याच संवेदना"

(पृष्ठ क्र.50 )


             सद्या समाजातील हे वास्तव आहे. या गोष्टीला कुणाचा वरदहस्त असावा ? समाजमनाचं स्वास्थ्य बिघडवून सौख्य हिरावून घेणा-या प्रवृत्तीत वाढ का होत आहे ? संविधानीक मूल्यांची प्रतारणा होत आहे का ? माणसापासून माणूस दूर चालला आहे का ?  माणसातील माणुसकीचा -हास होत चालला आहे का ? असे अनेक प्रश्न कविच्या मनात निर्माण होताना दिसतात . या बाबी कवितेचा विषय होणे महत्वाचे आहे . त्याला वाचा फोडणे अगत्याचे आहे . तरच समाज गुण्यागोविंदाने नांदेल . सलोखा वाढेल, बंधुभाव वाढेल, समता नांदेल . आपल्या घरच्या स्त्रीयाप्रमाणेच दुस-या स्त्रीकडेही आदराणाने बघितले पाहिजे. तीचं समाजातील स्थान हे महत्वाचंच आहे. ती ही या व्यवस्थेचा एक भाग आहे. आज तीने स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करते आहे . तीचाही देशाच्या उत्कर्षात सिंहाचा वाटा आहे . ती सर्व भूमीका योग्य पद्धतीने पार पाडते आहे. तिचं महत्व अधोरेखीत करताना कवी म्हणतात...


" संसारूपी समुद्राचा किनारा गाठण्याची ती होडी

तिच्या असण्याशिवाय संसाराला येत नाही गोडी !" ( पृष्ठ क्र. 67 )


स्त्रीचं संसारातील अनन्यसाधारण महत्व कविने यात रेखाटून तिचा सन्मान केला आहे . शिंदे यांची कविता समाजातील सर्व घटकांना समान न्याय प्रदान करण्याचा प्रयत्न करते आहे . ते शोषित, पिडीत, वंचीत, कष्टकरी,स्त्री, मुलगी, आई-वडील,शेतकरी या सर्व प्रतीकांचा योग्य सन्मान करताना दिसते. त्यांची कविता ही सर्वसमावेशक वाटते . त्यांनी अनेक प्रतिमांचेही खुबीने उपयोजन केले आहे. संसाररूपी समुद्राचा किनारा गाठणारी होडी, नातलगांची खोगीरभरती,गुणवंत येथे काडीमोल, दुःखाचा सारा भवताल, अशा कितीतरी प्रतीमा,प्रतीकांच्या अलंकाराने अलंकृत झालेली कविता आहे . 


शिंदे यांची कविता कुठे हळवी होते तर कुठे हक्काने व्यवस्थेला प्रश्न विचारते . कुठे संवेदनशील मनाने कष्टक-यांच्या व्यथा मांडते तर कुठे असं खपवून घेतलं जाणार नसल्याचं ठणकाऊन सांगते.  कुठे मुलां-मुलींच्या तोंडून आशावादही पेरते . कधी पिडीतांचे सांत्वनही करते ,तर कधी ती विधात्याकडे प्रार्थनाही करते . कुठे मुलांच्या यशाने हुरळून गेलेला बाप दिसतो तर कुठे आई-वडीलांच्या प्रेमाला मुकलेली मुलगी दिसते . कुठे अन्याय- अत्याचाराचे बळी ठरलेले लोक भेटतात तर कुठे कोरोणामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबासाठी पांडुरंगाला विणवनी करणारा भक्तही दिसतो . कुठे बोलीचा लह्यजा लाभलेली रचना सुद्धा बघायला मिळते  तर कुठे सोलापुरकरांचं वेगळं रुपही आपल्याला अनुभवायला मिळतं . अनेक सामाजीक विषयावरील रचनांचा यात अंतर्भाव झालेला दिसतो. जनसेवक, आई-वडील गेल्यावर, संप एस टीचा, पोशिंदा, वृद्धाश्रम बोलतोय, मतदान जागृती, शिक्षक, आक्रंदन मातेचं, शोध माणुसकीचा, राजकारण, विध्वंस महापूराचा, वाटणी, कोरोणाची महामारी. यासह अनेक विषय, जे माणसाच्या आयुष्यावर बरे-वाईट प्रभाव करून जातात . या सर्व स्तरातील मानवी मनातील हुंकार कविने अधोरेखीत करून त्याला वाचक, रसीकांसमोर ठेऊन सामाजीक दायित्व निभावण्याचं काम केलेलं आहे. 


        एकूणच शिंदे यांच्या कवितेचा केंद्रबिंदू हा आर्थिक परिस्थितीने अव्यक्त असलेला माणूस आहे , गावातील कष्टकरी माणसाचं जगणं, त्याची होणारी परवड , व्यवस्थेचे त्याचेकडे होणारे दुर्लक्ष, शेती, नैसर्गीक संकटाने त्याची होत असलेली दुरावस्था, त्याच्या जिवनमानात सुधारणा घडून आणणारा आशावाद कविने मौलीक शब्दात अधोरेखीत केला आहे . या सकल विषयाची कारणमिमांसा त्यांनी अभ्यासपूर्ण व चिंतनशीलतेतून केली आहे. त्यांच्या कवितेत कुठलाही आक्रस्ताळेपणा नसून ती सयंतपणे व्यक्त होताना दिसते. ती समाजमनाचं गा-हानं , ठणक सक्षमपणे वाचकासमोर मांडते .ही त्यांच्या कवितेची जमेची बाजू वाटते . या साहित्यकृतीत ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंबं उमटलेलं दिसतंय. कविने ग्रामीण भागाशी आपली नाळ अजूनही जोडून ठेवलेली दिसते. या सत्कार्यासाठी त्यांनी आपली लेखनी झिजविली ,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ! 


- अरुण हरिभाऊ विघ्ने

   ( रोहणा,आर्वी, वर्धा )


◾️कवितासंग्रहाचे नाव: अंतःस्थ हुंकार

◾️कवीचे नाव : शिवाजी नारायणराव शिंदे

◾️प्रकाशन : हर्मिश प्रकाशन, पुणे

◾️प्रकाशन दि.27/2/2022

◾️पृष्ठसंख्या : 112

◾️स्वागतमूल्य : 140/-₹

◾️मुखपृष्ठ : संतोष घोंगडे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)