अचूक शुद्धलेखनासाठी व्यंकटेश चौधरी यांच्याकडून पुस्तक भेट..

शालेयवृत्त सेवा
0

 



अक्षर परिवारातील सर्व शिक्षकांना मराठी शुद्धलेखन पुस्तिका मोफत वाटप...


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नेहमीच शिक्षकांना प्रेरणा देणारे, शिक्षकांतील सर्वोत्तम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, शिक्षकांच्या शैक्षणिक कौशल्यांचा विकास साधावा, एकंदरीत शिक्षकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास होऊन तो विद्यार्थ्यांत उतरावा यासाठी प्रयत्नशील असणारे वाजेगाव बीटचे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी, साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी अक्षर परिवारातील सर्व शिक्षकांना मराठी शुद्धलेखन हे पुस्तक मोफत भेट दिले आहे. 


शिक्षकांच्या अनावधानाने होणाऱ्या शुद्धलेखनाच्या चुकांचे विद्यार्थ्यांनी अनुकरण करू नये यासाठी शिक्षकांनीच अतिशय बिनचूक शुद्धलेखनाच्या नियमांचा वापर आपल्या लेखनात करावा ह्या हेतूने अक्षर परिवार या नावाने सुपरिचित असलेल्या वाजेगाव बीटमधील संपूर्ण शिक्षक शिक्षिकांना हे पुस्तक भेट दिले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात 'बालभारती' येथील मराठी विभागाचे माजी विशेषाधिकारी, प्रसिद्ध लेखक माधव राजगुरू यांनी हे 'मराठी शुद्धलेखन' पुस्तक लिहिले आहे.



 नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांनी ह्या पुस्तिकेत दिलेले लेखनविषयक १८ नियम आणि लिहिताना हमखास चुकणारे शब्द यासंदर्भात सोप्या भाषेत जी स्पष्टीकरणे दिली आहेत त्यांचा वापर करावा आणि विद्यार्थ्यांचे लेखन अचूक आणि शुद्ध राहील याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहनही व्यंकटेश चौधरी यांनी केले.


शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या नियमांचे लेखनात अचूक पालन करणे. शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व, दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. प्रत्येकास आपल्या भाषेची लिपी, तिचे उच्चार, लेखन यासंबंधीचे किमान प्राथमिक स्वरूपाचे तरी ज्ञान असले पाहिजे. हे ज्ञान नसेल, तर भाषेतील शब्दांचे उच्चारण व लेखन यात चुका होतात. आपण जे लिहितो ते शुद्ध आणि बिनचूक असावे याबद्दल काही नियम या पुस्तकामध्ये घालून दिलेले आहेत.




मराठी शुद्धलेखनाच्या बाबतीत आलेल्या अनुभवावरून, आधी शिक्षकांचेच लेखन अचूक असले तर ते विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचेल या भावनेने हे पुस्तक मुद्दामहून भेट दिले आहे. त्याचा डोळसपणे उपयोग व्हावा एवढीच अपेक्षा आहे.

- व्यंकटेश चौधरी (शिक्षण विस्तार अधिकारी , नांदेड )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)