आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.आज देशभरात योग दिन साजरा करण्यात येत आहे. 


आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त र ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्रीची आवश्यकता नसते. सहज, सोपा कुठेही, कधीही करता येण्याजोगा व्यायाम म्हणजे योगा होय. योग साधनेमुळे शरीर व मन स्वास्थ्य लाभते यामुळेच आज जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे.


आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व साधून  नौदल छात्रसेनेच्यावतीने देशभरात योग दिवस साजरा करण्यात आला. देशभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत आयोजित केलेल्या योग शिबिरात योग शिक्षक विजय अवसरमोल सरांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. योगाद्वारे आपण आपले शरीर, मन यावर ताबा ठेवू शकतो व जीवन सुखकारक करू शकतो असा संदेश दिला. 


शाळेचे मुख्यध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन सर यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना अध्ययन व अध्यापन प्रक्रियेतही योग साधना कशी महत्त्वाची असते याचे महत्त्व या कार्यक्रमात समजावून सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)