वरिष्ठ निवड प्रशिक्षण ऑनलाइन न घेता ऑफलाईन घ्यावे.. १ जून पासून ऑनलाईन सुरू झालेले प्रशिक्षण पडले बंद !

शालेयवृत्त सेवा
0

 



 पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे निवेदन !


नांदेड ( ग. नू. जाधव ) :

राज्यातील विविध शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांच्या वरीष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण करिता शासनाने या वर्षी ऑनलाइन पद्धत सुरू केली. परंतु हे ऑनलाइन प्रशिक्षण पहिल्या दिवशी सुरू होताच बंद पडले याचा राज्यातील हजारो शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागला. करिता सदर प्रशिक्षण जिल्हास्तरावर व ऑफलाईन घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.


       प्रायोगिक तत्वाचा विचार न करता, ऑनलाईन च्या समस्यांचा अभ्यास न करता वरिष्ठ पातळीवरून अश्या प्रशिक्षणाचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती ने नाराजी व्यक्त केली आहे.


          एकीकडे जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था विदयार्थ्यांऐवजी ओस पडलेल्या आहेत, अनेक प्राध्यापक व विषयतज्ञ तिथे उपलब्ध असतांना ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण न घेता, शिक्षकांकडून २०००₹ घेऊन अँप वर प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ०१जून २०२२पासून सुरू करण्यात आलेल्या या  प्रशिक्षणाचे सर्व्हर पहिल्याच दिवशी डाउन झाल्याने हजारो शिक्षक तासनतास प्रयत्न करूनही लॉगिन करून ट्रेनिंग घेऊ शकले नाही. क्वचित लॉगिन झाले तर प्रशिक्षणास सुरुवात करू शकले नाही. आज तिसऱ्या दिवशी सुद्धा हीच परिस्थिती कायम आहे.


        महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती ने या आधीच शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण निशुल्क द्यावे अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. शिक्षकांना होणारा हा नाहक त्रास पाहता सदर प्रशिक्षण हे जिल्हास्तरावर व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावे अश्या आशयाचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व प्रशिक्षण संचालक यांना संघटनेच्या वतीने आज पाठवण्यात आले. 


राज्य नेते विजय भोगेकर, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, संघटक भुपेश वाघ, राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे,महिला पदाधिकारी अल्का ठाकरे, शारदा वाडकर, सुनंदा कल्यानकस्तुरे, रुखमा पाटील यांनी याबाबत त्वरित निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.अशी माहिती जिल्हा नेते ग.नु.जाधव,जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, कविता गरुडकर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस पल्लवी नरंगले यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)