नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
गेल्या अनेक वर्षांपासून विषयशिक्षकाचे पद रिक्तच असून ते भरले जात नसल्यामुळे विषयशिक्षकांना नियुक्ती देऊन रिक्तपद भरण्यात यावे अशी मागणी जवळावासियांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. विज्ञान गणित विषयासाठी होऊ घातलेल्या विषयशिक्षकांच्या बदल्यात किंवा समुपदेशन पद्धतीने देण्यात येणाऱ्या नियुक्त्यांमध्ये जवळा देशमुख येथील रिक्त पद दर्शवून सदरील पद भरण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जवळा देशमुख येथे चार पदे मान्य असून गेली काही वर्षे या ना त्या कारणाने शिक्षकांच्या पदस्थापना केल्या जात नसत. विषय शिक्षक नियुक्तीवेळी समानीकरणाच्या नावाखाली लोहा तालुका लवकरच बंद करण्यात आला. आता समुपदेशन किंवा आॅनलाईन पद्धतीने होणाऱ्या बदल्यात जवळा देशमुख येथील विज्ञान विषयाचे सदरील पद रिक्त दाखवावे.
शाळेत मागासवर्गीय तथा गोरगरीब पालक मजुरदारांचीच अधिकतम पाल्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक होईल याकडे आपण लक्ष द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर किशन गच्चे, चांदू झिंझाडे, प्रतिभा गोडबोले, संतोष मठपती, मनिषा गच्चे, प्रियंका शिखरे, आनंद गोडबोले, बाबुमियाँ शेख, वंदना शिखरे, सखुबाई चक्रधर, मिनाताई पांचाळ, शोभाताई गोडबोले, डॉ. सुजाता गोडबोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .