शाहू महाराजांनी बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले - गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे

शालेयवृत्त सेवा
0

 



देगाव चाळ येथे 'एक वही - एक पेन' उपक्रमास प्रतिसाद


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण आणि वसतिगृहांच्या माध्यमातून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, नव्हे तर त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले असे प्रतिपादन नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी केले. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अॅड. मायाताई राजभोज, अनिता नरवाडे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कार्याध्यक्ष मारोती कदम, स्तंभलेखक शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, साईनाथ रहाटकर, प्रशांत झिंझाडे, सुनील गोडबोले, संयोजक सुभाष लोखंडे आदींची उपस्थिती होती.


        शहरातील देगावचाळ येथील बँकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहारात आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त देगावचाळ रहिवासी संघाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एक वही - एक पेन' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी बनसोडे म्हणाले की, उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा लागली पाहिजे. शाहू महाराजांचा आदर्श घेऊन कठोर मेहनत आणि जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून नागोराव डोंगरे, मारोती कदम, रणजीत गोणारकर, शंकर गच्चे, प्रज्ञाधर ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. 'एक वही - एक पेन' या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते झाले.  हा कार्यक्रम १२ वाजेपर्यंत चालला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलेश रणवीर, जळबा थोरात, नामदेव दिपके, गंगाधर शिराढोणकर, सिद्धार्थ ढेपे, रंगनाथ कांबळे, अनिकेत नवघडे, रमामाता महिला मंडळाच्या शिल्पा लोखंडे, शोभाबाई गोडबोले, भिमाबाई हाटकर, गयाबाई हाटकर, गिरजाबाई नवघडे, चौत्राबाई चिंतोरे, सुमनबाई वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)