शैक्षणिक वर्ष २०२२-२३ सुरू झाले आहे .दोन वर्षापासून शाळेची घंटा नियमितपणे खणखणली नाही ना मुलांचा किलबिलाट शाळेच्या प्रांगणात दिसला नाही. यावर्षी शाळा वेळेवर सुरू झाल्या आहेत. सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले नाते पुन्हा दृढ होऊ लागले आहे. सर्व स्तरावर पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. दरवर्षी वाटप केले जात असलेले पाठ्यपुस्तक व या वर्षीचे हे पाठ्यपुस्तक यात आकार व रचनेत बराच बदल झालेला आहे. हे विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेच्या पहिल्या दिवशीच समजले.
सन २०२०-२१ पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली आहे .गेल्या वर्षी राज्यातील ४८८आदर्श शाळा व ३८८ मराठी माध्यमाच्या शाळांत एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करून पथदर्शी उपक्रमाची सुरुवात केली गेली. त्याच्या फलनिष्पत्ती व विधायक अभिप्रायानंतर या शैक्षणिक वर्षात म्हणजे२o२२-२३पासून राज्यभरातील शाळांसाठी ही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
एकात्मिक पाठ्यपुस्तके म्हणजे कशी?
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करणे हे या पथदर्शी उपक्रमाचे प्रथम उद्दिष्ट आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षाचे असते. पाठ्यपुस्तके, वह्या, जेवणाचा डब्बा, पाण्याची बॉटल, कंपास पेटी अशा प्रकारचे ओझे वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेत न्यावे लागते. इयत्ता परत्वे हे वजन वाढत जाते . याचा परिणाम मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर व पर्यायाने शिक्षणावर होतो यासाठी पुस्तकाचे ओझे कमी व्हावे म्हणून शासनाने सर्व विषयाचे एकच पुस्तक तयार करून त्याचे तीन भाग केले आहेत. त्यापैकी एकच भाग ज्याचा पाठ्यक्रम चालू आहे तेच पुस्तक विद्यार्थ्याने शाळेत नेणे आवश्यक आहे. यामुळे साहजिकच दप्तराचे ओझे कमी होणार आहे.इयत्ता पहिली व दुसरीसाठी भाषा ,माय इंग्लिश बुक, गणित व खेळू करू शिकू अशा चार पुस्तकाचे एकत्रीकरण केले आहे. तिसरीसाठी भाषा ,माय इंग्लिश बुक ,गणित , परिसर अभ्यास व खेळू करू शिकू अशा पाच विषयाचे तर चौथीसाठी पाच (परिसरअभ्यास एक व दोन ) पाचवीसाठी माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास, एक परिसर अभ्यास दोन व हिंदी सुलभभारती ह्या विषयाचा समावेश एकात्मिक पुस्तकात केला आहे. इयत्ता सहावी व सातवी साठी भाषा ,माय इंग्लिश बुक ,हिंदी सुलभभारती, गणित , विज्ञान, इतिहास ,भूगोल अशा सात विषयाचा समावेश असलेले एकात्मिक पाठ्यपुस्तक बनविण्यात आले आहे.
द्विभाषिक पाठ्यपुस्तक का म्हटले आहे?
इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचा समावेश पूर्वीपासूनच आहे. गणितीय व वैज्ञानिक संकल्पना त्याचे अर्थ ,त्याच्या संबंधित वस्तू ,घटक, संबोधाचे नाव इंग्रजीतून कळावे यासाठी गणित ,परिसर अभ्यास व विज्ञान विषयाच्या एकात्मिक पुस्तकामध्ये प्रत्येक ठिकाणी कंसा मध्ये इंग्रजी शब्द देण्यात आलेले आहेत .आकलन, प्रभावी व उपयुक्त करण्यास द्विभाषिक आशयाची निर्मिती केली आहे. यामुळे भविष्यात सेमी वा इंग्रजी माध्यमात शिकणे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुलभ जाईल . द्विभाषिक पुस्तके म्हणजे मराठी व सेमी माध्यमातील एक प्रकारचा दुवाच होय.
खेळू,करू व शिकू
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कला कार्यानुभव व शारीरिक शिक्षण हे विषय महत्वपूर्ण ठरतात. अशा विषयानी युक्त असे शिक्षण आनंददायी ठरते. नवीन शैक्षणिक धोरणाधारित द्विभाषा दृष्टिकोन व एकात्मिक कला व क्रीडा दृष्टिकोन यावर आधारित पाठ्यपुस्तक निर्मिती होत असताना पहिली ली ते तिसरी साठी खेळू ,करू, शिकू अर्थात लर्निंग बाय प्लेईंग, लर्निंग बाय ड्रॉइंग, अँड लर्निंग बाय आर्ट या तत्वाचा समावेश केलेला आहे .त्यामुळे कृती ,खेळ ,चित्रांकण, गायन, आदी कृती भाषा व गणित तथा परिसर अभ्यासाशी समवाय साधतील अशा अपेक्षेने आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यानुभव व कला शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे .खेळू करू शिकू या विषया द्वारे पहिली ते तिसरी च्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास हे पुरक वातावरण निर्माण करू शकतात.
पाठ्यपुस्तकाच्या रचनेत अशा प्रकारचा बदल २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून झालेला आहे . शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली तरी आणखी चालु वर्गाच्या पाठ्यांशाचे अध्यापन करणे शाळेवर सुरू झाले नाही .इयत्ता दुसरी पासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने विद्यार्थ्यांच्या मागील ईयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी व पुढील अभ्यासक्रमाची पूर्वतयारी व्हावी यासाठी 30 दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळेत सद्या सेतु अभ्यास ( ब्रीज कोर्स) चालू आहे. हा सेतू अभ्यास पूर्ण झाल्यावर खऱ्या अर्थाने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाचा लाभ होईल अशी आशा वाटते.
- मिलिंद जाधव
(विषय शिक्षक /जि.प.कन्या शाळा भोकर / नांदेड)
मो. क्र.९४२३९०२४५४
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .