[ विशेष प्रतिनिधी उदय नरे यांचा प्रासंगिक लेख वाचकासाठी देत आहोत - संपादक ]
मी कोकणात इलोय ! माका ट्रेनिंग करूचा असा ! जिलाक लॅपटॉप तयार करुक सांगितलो. बाबल्याक इंटरनेट कनेक्शन लावूक सांगितलो. कधी नव्हे तो समदा व्यवस्थित झाला. दोन वर्षे कोरोनात गेली. गावाक काय येवूक जमला नाय. यंदा लालपरी म्हणजे आमची एसटी डब्यात गेली. कोकण कन्याने कणकवलीक पोहचलो. दोन वर्षाने कोकणातलो शिक्षक गावाक इले होते ते सुध्दा आँनलाईन ट्रेनिंग गावाक येऊन करुन मुंबईक जाणार होते "पण कसले काय आणि फाटक्यात पाय" ? शिरा पडो गावच्या इंटरनेकाक! सर्वर डाउन होईना.
पासवर्ड व लाँगिन आयडी एससीईआरटी ने दिला होता. आमका माहीतच नव्हता आमचोच इमेल आयडी आमचो लाँगिन आयडी हाय तो. पासवर्ड समद्यांचो एक सिरखो. एक तारीख उजाडली तिच लढाईक बसूची. पण खय मासी शिंकली ती कुणाक कळलीच नाही. बाबलो बोलतोय हयसर इंटरनेट बराबर असा. तुमच्या थयसरच काय ता झाला असेल. तोंडात शब्द इलो माय...... तू माका शिकवतस! थयसर प्राब्लेम हय! तुका वाटला? अरे वेड...... जगप्रसिद्ध इन्फोसिसला ट्रेनिंगची जबाबदारी दिली हाय. येर्या गबाळ्याचे काम नव्हे शिक्षकास शिकवूचा हा. दोन हजार रुपये भरलय. पण गावचो कोकणी माणूस काय मागे हटूक बघत नाय. अवलादिवर इलो. तुमका काय जमूचा नाय. असे बोलून बाबल्याक बेबल्यान बोलावला तो पारावर गेलो तो इलोच नाय.
माका एकच पर्याय मुंबई फोन लावलो. विजयसर म्हणजे आयटी मास्टर पण त्याचा पण ट्रेनिंग सुरु नाय. प्रकाशला फोन लावला त्याचा सर्वर डाऊन. जितेंद्र महाजनला फोन लावला तो नाशिकच्या गावातच. हयसर थयसर फोन लावून बघितला पण कोणाचाच ट्रेनिंग सुरू नाय. आमच्या शिक्षणाची पंढरी पुण्यातून एक व्हिडिओ इलो होतो तो दोनदा बघितला. व्हिडीओ चांगलो होतो. सायबानी चांगला सांगितला हुता. पगार वाढ होणार होती म्हणून सर्व शिक्षक तयार होते. 94000 हून अधिक शिक्षकांनी नाव नोंदणी केली होती पण शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा फज्जा उडाला.
शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास अकार्यक्षम असल्याचा आरोप करीत शिक्षकांचे दोन हजार रुपये परत करून प्रशिक्षण ऑफलाईन घ्यावे, असे मत भाजपा शिक्षक आघाडीचे नागपूर विभाग संयोजक अनिल शिवणकर यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षण सुरू होणार असे जाहीर होताच ते म्याच केले असे शिक्षक नेते म्हणू लागले. सर्वच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शेखी मिरवू लागले होते. रवळनाथाच्या आशीर्वादाने मीच ट्रेनिंग सुरू केले अशी अहंमिका लेटरहेडवर नेते मंडळी मारू लागले. पण आता ते खय गेले ते सापडत नाय.
महाराष्ट्रातील वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र एकूण ९४५४१ शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे प्रशिक्षणाकरिता नोंदणी केली होती. त्याकरिता शिक्षकांकडून १८ कोटी ९० लाख ८२ हजार इतकी शुल्काची रक्कम शिक्षण विभागाकडे जमा झालेली आहे. रितसर प्रशिक्षण 15 मे पासून सुरू करीत आहोत अशा बातम्या समाजमाध्यमांवर येत होत्या पण अधिकृत पत्र फारच उशिरा आले व प्रशिक्षण एक जुन पासून होणार आहे अशी घोषणा झाली. अनेक शिक्षक संभ्रमात होते. आँनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यामुळे अनेक शिक्षकांनी सहकुटुंब गावचा रस्ता धरला होता.
प्रशिक्षण घ्या, या मागणीसाठी भाजपा शिक्षक आघाडीने आंदोलन केल्यानंतर अखेर शासनाने १ जूनपासून शिक्षकांसाठी ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू केले, अशी बातमी प्रसार माध्यमांनी दिली होती. शिक्षण विभागाचे ढिसाळ नियोजन समोर आले असून, पासवर्ड लॉग ईन आयडी मिळाली नाही, चुकीचे पासवर्ड, लॉगिन होत नाही, सर्व्हर एरर असे मॅसेजेस येत आहेत. तांत्रिक अडचणी मुळे शिक्षक बेजार झाले. जागतिक पातळीवर नावाजलेल्या इन्फोसिस या कंपनीकडून ट्रेनिंग मिळेल ते दर्जेदारच असेल यात शंकाच नव्हती. परंतु दुर्दैवाने तसे काहीच नाही. राज्य भरातील हजारो शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहिले. गेली अनेक वर्ष हे प्रशिक्षण झाले नव्हते. मुळात एका शाळेतील केवळ विस टक्के शिक्षणकांना वरीष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाचा एका वेळी लाभ होणार आहे. असे असताना सर्व सकट एकाच वेळी इतक्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा घाट कशाला?" प्रशिक्षण म्हणजे चटईवरचे श्राद्ध उरकण्याचा प्रयत्न आहे का?"
आँनलाईन पध्दतीने घेतलेले प्रशिक्षण खरचं फलदायी होणार आहे का? का निधीचा अपव्यय? आता हयसर निधी म्हणजे बाईचा नाव नव्हे! निधी म्हणजे पैसा, वेळ, श्रम या सर्व गोष्टींचा अपव्यय झाला आहे हे समजले पण कोणीही बोलणार नाही. खरी गरज आहे संवादाची. दुर्दैवाने अनेक वँटसअँप ग्रुपमध्ये मी समाविष्ट झालो. तेथील संदेश पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. स्वाध्याय व व उत्तरे ग्रुपमध्ये पोस्ट करा यामुळे आपल्याला (शिक्षकांना) सर्व उत्तरे मिळतील. आपले प्रशिक्षण पुर्ण होईल. खरच अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून शिक्षक घडणार का? आणि जर शिक्षकच घडला नाही तर विद्यार्थी कसा घडणार?
राज्यातील अनेक भागात आजही आँनलाईन प्रशिक्षणाचा व्याप खडतर आहे. केवळ 22 ते 27 टक्के विद्यार्थी आँनलाईन शिक्षणाचा लाभ घेऊ शकले असा सर्वेक्षणाचा अहवाल आहे. या गणितानुसार किती शिक्षक या प्रणालीचा लाभ घेऊ शकतील.
प्रशिक्षण पाहिजेच आहे. पण त्यामधे शिक्षण पाहिजे. प्रमाणपत्रासाठी शिक्षण नको. शिक्षणासाठी विद्यार्थी आहे व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आहे. आणि हे दोन्ही घटक समाजासाठी महत्त्वाचे आहेत. ज्या ठिकाणी शिक्षणाचा फज्जा उडतो त्या ठिकाणी समाज व्यवस्थेचा फज्जा उडतो. कारण शिक्षण, शिक्षक व विद्यार्थी यातूनच देश घडत असतो. मराठीत एक चित्रपट निघाला होता. शिक्षणाच्या आईचा घो. खरच आज तोच शब्द अनेकांच्या तोंडी ईलो शिक्षणाचा आईचा घो. !
- उदय नरे / मुंबई
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .