शाळा प्रवेश उत्सव झाला पाहिजे ! |There should be a school entrance ceremony!

शालेयवृत्त सेवा
0

 




सुट्टी संपली, शाळा सुरु झाली.. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा उत्सवाचा ! प्रदीर्घ उन्हाळी सुट्ट्या नंतर आज शाळा.. सगळीकडे नवे नवे.. पहिल्या वर्गात येणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटणारी तर काहींना नकोशी वाटणारी पण शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक फुले आणि चॉकलेट देऊन जेव्हा स्वागत करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून शाळाही खळखळून हसत असेल नाही का !  निरागस बालक जेव्हा शाळेत प्रवेश करतात तेव्हा पहिल्याच दिवशी एखादा सण साजरा करतोय असं वाटावं असा शाळेचा परिसर.. हसतमुख शिक्षकांनी केलेले स्वागत ! गोंडस मुलांना जवळ घेऊन आपुलकिने संवाद साधणारी शिक्षिका.. सगळे कसे वेगळे वाटावे असे.. मुलांना हे जग नवे वाटणारे असले तरी अशा प्रेमळ स्वागताने जग आपलंच वाटणार.. मग काय पहिल्या दिवशी शाळेत मिळणाऱ्या नवे मित्र-मैत्रीण, गप्पा-गोष्टी आणि खेळ.. किती किती मजा नाही का !



कुणाचे वर्ग बदलले, कुणाचे शिक्षक बदलले.. त्यांनाही पहिल्याच दिवशी वेगळं अनुभवायला मिळणार.. त्यांचाही आनंदाचा क्षण !  आज शाळेचा पहिला दिवस उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश घेताना नवीन वर्गखोलीत बसताना मुलांना तर आनंदच.. नव्या वर्गात नव्या जागेवर बसण्याची धडपड नव्या शिक्षकांना बोलतानाचा आनंद खरंच कशात मोजता येईल का ? नाही ना ! हा आनंद विद्यार्थी त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक यांना नक्कीच जाणवतो. सगळं काही नवीन असल्याने मुले भरभरून बोलण्याचा प्रयत्न करतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या वर्गाची पाठ्यपुस्तके हातात पडतात, शैक्षणिक साहित्यही दिल्या जाते. मुलांच्या हाती पुस्तके पडताच त्यावर आपली नावे लिहून पुस्तके पाहण्यात गर्क झालेली विद्यार्थी मी पाहिले.. पुस्तकं नवे, त्यातील चित्र नवे, गणवेश नवा, शूज-बूट नवे.. काय मज्जा..शाळेचा पहिला दिवस आनंद तर वाटणारच ना !



आता तर अनेक शाळेचे रूप बदलले.. सर्वच डिजिटल शाळा वर्गखोल्या रंगरंगोटीने परिपूर्ण.. शाळेचा प्रवेशद्वारावर ही कमान त्यावर शाळेचे नाव, संरक्षक भिंतीवर पाठ्यपुस्तकातली चित्र मराठी-हिंदी-इंग्रजी शब्द, इतिहास-भूगोल व परिसराची माहिती, विज्ञानाचे प्रयोग, गणितीय सूत्र, पाढे..  सर्व पुस्तक भिंतीवर अंथरलेले !  शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष, विविध फुलांच्या वेली, हिरवेगार मनमोहक परिसर असलेली शाळा आज सर्वत्र पाहायला मिळते.. याचे सर्व श्रेय शाळेचे विद्यार्थी-पालक शिक्षक-शिक्षिका मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना जाते. शाळेतच तक्रार पेटी, प्रयोग शाळा, वाचनालय, क्रीडा साहित्य, मध्यान्ह भोजन, पिण्याचे शुद्ध पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने प्रत्येक शाळा नावारूपास येताना दिसत आहे.


नवोपक्रम राबऊप शाळा परिपूर्ण होताना दिसत आहे. उपक्रमशील शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागली आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना शाळा आवडू लागली.. डिजिटल वर्गखोलीत कंप्यूटर व प्रोजेक्टर द्वारे नवनवीन माहिती मिळू लागली. डिजिटल बोर्ड मुळे विद्यार्थ्यांच्या मनावर पाठ्यपुस्तकातील मुद्दे सहज बघता येतात. सहजपणे अध्ययन-अध्यापन होते. आनंददायी व हसत खेळत शिक्षणावर भर असल्याने मुलांनाही आनंद वाटतो व तो शाळेत टिकून राहतो. मुलींची उपस्थिती वाढविण्यासाठी भत्ता दिला जातो. आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते. मध्यान्ह भोजनात पोस्टीक आहार दिला जातो. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश व विविध शासकीय योजनांच्या प्रत्येक मुलापर्यंत होणारा लाभ.. शाळेत होणारे संस्कृती कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, नैसर्गिक सहल, बिनभिंतीची शाळा, क्षेत्रभेट असे विविध उपक्रम राबविणारे कल्पक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत पहावयास मिळतील !


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार शाळा प्रवेश उत्सव सर्व जिल्ह्यात साजरा होतोय. शाळा प्रवेशोत्सव राबवून शंभर टक्के पटनोंदणी, शंभर टक्के उपस्थिती,  शंभर टक्के गुणवत्ता या उद्दिष्टाने काम होणार आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. पालकही जागरूक झालेले आहे वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत दाखल करताना दिसतात. प्राथमिक शिक्षणासाठी जागरूक असल्याने शिक्षक आणि पालकात गुणवत्ता संदर्भात चर्चा होताना दिसते ही सकारात्मक यशाची पायरी आहे !



- रमेश मुनेश्वर / नांदेड

( लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. )

संवाद - 7588424735



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)