प्रत्येकाच्या रक्ताचा रंग एकच | Everyone's blood color is the same

शालेयवृत्त सेवा
0

 




रक्तसंक्रमणासाठी सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत ऐच्छिक आणि कोणताही मोबदला न घेता रक्तदान करणाऱ्यांचे महत्व यानिमित्ताने अधोरेखित करण्यात येते. राष्ट्रीय रक्तसंक्रमण सेवा, रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत संस्था आणि स्थानिक उपक्रमांना प्रोत्साहीत करताना ऐच्छिक रक्तदानाच्या चळवळीला गती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करयात येतो. यवर्षी ‘रक्तदान हे ऐक्याचे कार्य : सहभागी व्हा आणि जीव वाचवा’ ही संकल्पना घेऊन जागतिक पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


कोरोना कालावधीत रक्तदानाचे महत्व लक्षात आले आहे. रक्तदानाद्वारे आपल्याला एखाद्याचे प्राण वाचविता येतात. रुग्णाला गरजेच्यावेळी विशिष्ट गटाचे रक्त मिळणे त्याचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे असते. अशावेळी रक्तपेढीत विविध गटाचे रक्त उपलब्ध असल्यास त्याला तात्काळ मदत करता येते. ऐच्छिक रक्तदाऱ्यांनी केलेल्या रक्तदानातून रक्ताचा साठा रक्तपेढीत तयार होत असतो. त्यामुळे रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.


एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. प्रसवकाळात रक्तस्त्रावाने पीडित महिलांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी रक्त आणि रक्ताचे घटक आवश्यक असतात. मलेरिया आणि कुपोषाणामुळे अशक्त मुले, रक्त विकार असणारे रुग्ण, हिमोग्लोबिनची कमतरता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, अपघात आणि वैद्यकीय शस्त्रक्रीयेच्यावेळी रक्ताची गरज भासते.  रक्ताची गरज सार्वत्रिक असताना उपलब्धता मात्र मर्यादीत आहे. त्यामुळे रक्तदाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे.


रक्ताची गरज असलेल्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी नियमित रक्तदान करणारे ऐच्छिक रक्तदाते प्रत्येक देशासाठी महत्वाचे आहेत. कोणतेही संकट नसताना रक्तदानाद्वारे रक्तसाठा उपलब्ध झाल्यास आपत्तीच्यावेळी रक्ताची मागणी वाढल्यास त्याचा योग्य उपयोग करणे शक्य होते. शिवाय रक्तदानाच्या माध्यमातून एकप्रकारचे सामाजिक संबध आणि जाणिव निर्माण होत असल्याने समाजाच्या ऐक्यासाठीदेखील ते महत्वाचे ठरते.


जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने रक्तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना अशा रक्तदानाच्या चळवळीला गती देण्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत. ऐच्छिक रक्तदानाबद्दल व्यापक जागृती निर्माण झाल्यास आणि विशेषत: तरुण वर्गात या विषयाचे महत्व पोहोचविल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. रक्तदानाचे उपक्रम वर्षभर सुरू रहावेत यासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहित करणे  अत्यंत महत्वाचे आहे. असे केल्यास रक्तसंकलनाचे प्रमाण वाढून गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध होऊ शकेल.


जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने आपणही आपल्यापरिने योगदान देऊ शकतो. शासकीय रुग्णालयात रक्तदान करणे, परिसरात ऐच्छिक रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करणे, रक्तदान करू इच्छिणाऱ्यांची यादी तयार करणे, रुग्णालयाशी समन्वय साधून त्यांना रक्तदात्यांची माहिती पुरविणे आदी माध्यमातून हा दिवस साजरा करता येईल. विशेषत: सामाजिक संस्थांनी रक्तदान हा आपल्या नेहमीच्या उपक्रमाचा भाग केल्यास रक्तदानाच्या चळवळीसाठी मोठे योगदान लाभेल. हा दिवस अशाच प्रकारचे ऐक्य दाखविण्यासाठी आहे. कारण, शेवटी प्रत्येकाच्या रक्ताचा रंग एकच....


जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील  ७९ देशातील रक्तपुरवठ्यापैकी ९० टक्के रक्तपुरवठा ऐच्छिक रक्तदात्यांकडून होतो. तर ५४ देशात हे प्रमाण ५० टक्के आहे. इतर रक्तपुरवठा कुटुंबातील व्यक्ती किंवा पैसे मोजून इतर व्यक्तींकडून रक्ताची गरज भागवली जाते. जगातील एकूण रक्तदात्यांपैकी ३३ टक्के महिला आहेत. एकूण रक्त संकलनापैकी ४० टक्के श्रीमंत राष्ट्रात संकलीत केले जाते.


मागील तीन महिन्यापासून रक्तदान न केलेले १८ ते ६५ वयोगटातील कोणीही रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्याचे वजन साधारण ४८ किलोपेक्षा अधिक असायला हवे. प्रसुतीनंतर ६ महिन्यांनी स्त्रीया रक्तदान करू शकतात. क्षयरोग, हिपाटायटीस, मधुमेह, मलेरियासारखे आजाराने पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात. दररोज आपल्या शरीरात नवे रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी ३५० मिली रक्तच घेतले जाते. परवाना असलेली रक्तपेढी किंवा शासकीय रुग्णालयात रक्तदान करता येते. रक्तदान केल्यानंतर १२ महिन्यापर्यंत रक्तदाता किंवा त्याच्या कुटुंबियातील व्यक्तीस रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त देण्यात येते.


-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)