[ माहूर पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी 'संतोष शेटकार' यांच्याशी माहूर येथे आमचे विशेष प्रतिनिधी एस.एस. पाटील यांनी संवाद साधला. ते वाचकासाठी देत आहोत - संपादक ]
मागील दोन वर्षे ही कोरोना महामारीने पछाडलेली ठरली. या काळात वेळोवेळी सावधगिरी म्हणून शासनाच्या सुचनेनुसार संपूर्ण देशात लाॅकडाऊन सारख्या प्रसंगांना आपण सामोरे गेलो.संपूर्ण जग या महामारीने प्रचंड मेटाकुटीला आले.त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय सुद्धा बंदच होती.या बंद असलेल्या शैक्षणिक संकुलांमुळे विद्यार्थी आणि शिक्षण याची कमालीची पिछेहाट झाली हे म्हणणे वावगे ठरणार नाही.पण परत एकदा या नव्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्या आहेत आणि तब्बल दोन वर्षांपासून सरळ दोन वर्ग पुढे येत विद्यार्थी शाळेत पोचले आहेत.
आता प्रश्न हा होता की, मागील झालेल्या शैक्षणिक क्षतीसाठी काय करता येईल?
तेव्हा नुकतेच माहूर पंचायत समिती ला लाभलेले नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी 'संतोष शेटकार' यांच्याशी माहूर येथे संवाद साधला तेव्हा ते म्हणाले,कोरोना काळात डायट व जि.प.नांदेड ने राबविलेल्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपक्रमांना ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद होता पण 100% उद्देश सफल झाला नाही. अडचणी अनेक आहेत पण शिक्षकांनी उत्तम प्रयत्न केले.तरीही विद्यार्थी अभ्यासात मागे पडले आहेत हे मान्य करावे लागेल.तेव्हा या नव्या शैक्षणिक वर्षात त्या मागे पडलेल्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी भरपूर मेहनत घ्यावी लागेल.
त्यासाठी सेतू अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी,आणि वैयक्तिक लक्ष तसेच क्षमतांवर विशेष काम करण्याची गरज आहे.ग्रामीण भाग तसेच विपरीत भौगोलिक परिस्थिती असूनही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना पोचावं यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
मी नुकतेच गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार हाती घेताच माता रेणुकेचे दर्शन घेतले आहे आणि मातेचरणी मस्तक टेकत येणाऱ्या शैक्षणिक वर्षात माझ्या हातून विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक क्षती भरून काढण्यासाठी आशिर्वाद मातेला मागीतले आहेत.माहूर ही पुण्यभूमी आहे.इथे आल्यावर प्रचंड उर्जा मिळते,त्याची प्रचीती रुजू होताच आली आहे.
माझ्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व अध्यापकांचे काम चांगले असून त्याला पैलू पाडण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे.विद्यार्थ्यांचे दोन वर्षांत झालेल्या विस्मरण आणि पिछेहाटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, की होय,निश्चितच आम्ही ही दरी भरून काढण्यासाठी तयार आहोत.त्यासाठी आम्ही गुणवत्तावृद्धीचा संकल्प केला आहे. असे ते म्हणाले.
गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार रुजू होताच योगदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतासह माहूर मध्ये प्रभावी योगदिन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे 100%वृक्षारोपण,100%पटनोंदणी आणि प्रवेश या बाबींना त्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे.त्याचबरोबर शैक्षणिक धोरण आणि RTE च्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत आजचा विद्यार्थी कसा शारीरिक,मानसिक आणि बौद्धिकरित्या सक्षम निपजेल याकडे मी आणि माझी यंत्रणा बारकाईने लक्ष देईल असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
शब्दाकंन : एस.एस.पाटील / माहूर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .