शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार - प्रा. वर्षा गायकवाड

शालेयवृत्त सेवा
0

 



समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : 

शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील प्रकल्प संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, वणवे आदि उपस्थित होते.


समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्याकरता आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.


शालेय वर्ष २०२२-२०२३ करता एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता १ ली ते १२ वीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.


पुणे येथे शिक्षण आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा

पुणे येथील बालभारती भांडारात समग्र शिक्षा अभियान वितरणास राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे आदि उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)