टाटा रुग्णालयातील बाल कर्करुग्णांचा राज्यपालांशी संवाद .. समुद्र आणि मोर पाहून लहानगे सुखावले !

शालेयवृत्त सेवा
0


 

            

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

टाटा कर्करोग रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या 40 बाल कर्करुग्णांनी  मंगळवारची सकाळ राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत आनंदात घालवली. राज्यपालांनी यावेळी मुलांशी संवाद साधला, त्यांना खाऊ वाटला तसेच बच्चे कंपनीची राजभवन सैर करवली.

            टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या इम्पॅक्ट फाउंडेशनतर्फे बालरुग्णांच्या राजभवन भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

            आई-वडील आपल्यावर जितके प्रेम करतात तितकेच प्रेम उपचार करणारे डॉक्टर्स देखील करतात असे यावेळी संवाद साधताना राज्यपालांनी मुलांना सांगितले. डॉक्टर्स हे देवाचेच रूप असतात असे सांगून कर्करोगातून लवकर बरे होऊन गरीब आणि गरजू लोकांची सेवा करावी असे राज्यपालांनी मुलांना सांगितले. 


            राजभवन येथे आलेल्या अनेक बाल कर्करुग्णांनी समुद्र आणि मोर प्रथमच पाहिल्यामुळे मुले अत्यंत आनंदी झाल्याचे टाटा रुग्णालयातील निवासी डॉक्टर अनिशा चक्रवर्ती यांनी राज्यपालांना सांगितले.   

            टाटा रुग्णालयात गेल्या वर्षभरात नोंदणी झालेल्या 1 लाख रुग्णांपैकी 1800 बालरुग्ण असल्याचे सांगून मुलांचे लवकर रोगनिदान झाले तर कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण वाढते असे त्यांनी सांगितले.

            यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल इम्पॅक्ट फाउंडेशनच्या जान्हवी सावंत यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली, अनिल त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेश मिश्रा यांनी भजन म्हटले.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)