विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टिकोन वृद्धिंगत करावा - जेष्ठ पत्रकार जयदेव डोळे

शालेयवृत्त सेवा
0

 




औरंगाबाद (जिमाका) :  

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाच्या या योजनांची पडताळणी करत स्वत:चा चिकित्सक दृष्टीकोन वृद्धींगत करण्यावर भर देण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत जयदेव डोळे यांनी विद्यार्थ्यांना केले.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्र प्रदर्शनात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात श्री. डोळे बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक हेमराज बागूल, सकाळचे मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे डॉ. उत्तम अंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक वंदना थोरात, माहिती अधिकारी मीरा ढास यांची उपस्थिती होती.



श्री. डोळे म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शासनांच्या अशा प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा. या माहितीचे चिकित्सक पद्धतीने अवलोकन करावे. चिकित्सक दृष्टीकोनातून लेखन करावे. लोकहिताचे कार्य करण्यासाठी कटीबद्ध रहावे. चारित्र्य, निष्ठा, विचार, गुणवत्ता याची काळजी घ्यावी. भाषेवर प्रभुत्व मिळवावे. उत्तम वाचन, वाचनातून उत्तम भाषा आणि विचार प्रगटतात, त्यामुळे सातत्याने वाचन करत रहावे. विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, कथा, कांदबरी, नाटके वाचावीत. यातूनच सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास होऊन उत्तम अधिकारी व्हावे.


भारतासारख्या गरीब देशात दुर्बल, वंचित,पिडितांसाठी शासन अनेक योजना राबवत असते. त्यांचा योग्य लाभार्थ्यांना लाभ पोहोचल्याची खातरजमा करून पत्रकारांनी काम करणे अपेक्षित असते. शासनाच्या योजनांची माहिती शासन देत असतेच. परंतु वाचक, पत्रकार, नागरिक, लाभार्थ्यांनीही याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक असल्याचेही श्री. डोळे म्हणाले.



संपादक माने यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे चित्र प्रदर्शन सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती याठिकाणी पहावयास, वाचावयास मिळतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडणारी अशी माहिती या प्रदर्शनात असल्याने या प्रदर्शनाचा लाभ घ्यायलाच हवा, असेही श्री.माने म्हणाले.


सामाजिक लोकशाही, लोककल्याणकारी राज्यासाठी प्रत्येकाने निरपेक्ष भूमिकेतून कृती करणे आवश्यक असल्याचे डॉ. अंभोरे म्हणाले. समाजातील चित्रणाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी तरूणाईने पुढे येण्याची आवश्यकता आहे. तसेच आजच्या डिजिटल युगात भाषा महत्त्वाची असून ती बदलत आहे. परंतु प्रमाण भाषेचा वापर प्रत्येकाने करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बागूल यांनी केले. यामध्ये त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती चित्र प्रदर्शनातून जनतेसमोर मांडण्यात आली आहे, असे सांगितले. तसेच या चित्र प्रदर्शनास जनतेने भरपूर व उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहायक संजिवनी जाधव यांनी केले.


चित्र प्रदर्शनाचा समारोप


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाच्या चित्र प्रदर्शनाचा समारोप कवी, साहित्यिक दासू वैद्य, साहित्यिक वीरा राठोड, संचालक हेमराज बागूल, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी, जालन्याचे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, बीडचे प्र. जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ यांच्या उपस्थितीत झाला. या प्रदर्शनाचे कौतुक श्री. वैद्य, श्री. राठोड यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)