शेतकऱ्याच्या पोराची संघर्षमय गाथा: काटेरी पायवाट

शालेयवृत्त सेवा
0






अलिकडे आत्मचरित्र फारसे कुणी लिहिताना दिसत नाहीत परंतु मराठी सारस्वताच्या मांदियाळीत स्वतंत्र स्थान निर्माण करून आपल्या विदर्भबोलीने लिहिलेल्या "काटेरी पायवाट " या डॉ. अनंता सूर यांच्या आत्मपर लेखनाने स्वतःभोवतालचा भोवताल व संघर्ष अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खरेपणाच्या पातळीवर व्यक्त केलेला जाहीरनामा ठरला आहे. हे आत्मकथन जरी डाॅ.अनंता सूर यांचे असले तरी ती महाराष्ट्रातील लाखो बेकार व उपासमार होत असलेल्या व संघर्ष करत असलेल्या तासिका तत्त्वावर नोकरी करणाऱ्या तरुण प्राध्यापकाचीच कहाणी आहे हे निश्चित !


 स्वतःच्या कवितेतून सामान्यांची दुःख उजागर करणारा कवी, ग्रामीण मातीची नाळ जपत व्यक्त होणारा कादंबरीकार ,उत्तम समीक्षक ,उत्कृष्ट संपादक ,भोगवाट साकारून वाताहतिची कैफियत मांडणारा कथाकार म्हणून अनंता सूर हे सर्वदूर परिचित आहेत.जगण्याचा ध्येयवाद आणि समग्र मानवी जीवनाचा पट "काटेरी पायवाट" मधून उलगडलेला आहे.


"काटेरी पायवाट "या शब्दाचा अर्थच जीवनाच्या पायवाटेवरून चालताना रक्ताळलेला तळवा आणि रिकामे पोट घेऊन सुळ्या काट्यावरुन अंधार कापत तुडवीत निघालेला दीपस्तंभाकडचा प्रवास होय. अशा अंधकारमय निबिड  काळोखस्थितीत अनंता सूर यांचा जन्म झोला या गावी झाला पण तोही आई-वडिलांच्या नाराजीनेच ! अनंता हे आई-वडिलांचं अकरावा अपत्य! ते होऊ नये म्हणून आईने गोळ्या खाल्ल्या होत्या. याचं प्रत्ययकारी व आसू उभा करणारं वास्तव चित्रण त्यांनी केलं आहे. रामदास, अरविंद, निर्मला, दोन जुळ्या पोरी जन्मल्याबरोबर मेल्या ,रमेश, विनोद ,सुरेखा, प्रकाश, सुनिल आणि मग स्वतः लेखक अनंता ही त्यांची भावंडाची नामावली परंतु प्रत्येकाचं चित्रण वाचताना डोळ्याला धारा लागतात. करारी बाप असूनही मुलांना शाळा शिकवण्याकडे त्यांच्या कल होता .हे लेखकाने वर्णन केलेल्या खालील प्रसंगावरून दिसून येते- बाप वणीवरून बाजार करून आला .दुपारचा एक -दीडचा सुमार असावा. बापानं," मुर्खा ,कदड्या येकटा खेळत हाये, चाल, शाळेमंदी" म्हणून हात पकडून शाळेपर्यंत आणलं. शाळेत रस्त्यानं येतांना बाप एक सारखा माझ्या नावानं शिव्या देत होता आणि मी जोरजोराने ओरडत -रडत होतो .मागंमागं एखाद्या मालकानं जबरदस्तीनं कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून ओढत न्यावं तसा बाप मला शाळेत नेत होता. बापानं हात धरून कोटनाके हेडमास्तरांच्या स्वाधीन केलं आणि टेबलाच्या बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून बाप एक सारखा चवताळलेल्या कुत्र्यासम माझ्याकडे पाहू लागला .


"पृष्ठ क्रमांक 14"

खरंतर शेती आपल्या पाचवीला पुजलेलीच आहे परंतु मुलगा शिकून मोठा व्हावा, निदान पोटापाण्याचा प्रश्न त्याला स्वतः सोडवता यावा, ही भावना इतरांच्या बापाकडून जशी असते तशी लेखकाच्या बापाचीही होती. योगायोगाने लेखकांला त्यांचा मावसभाऊ  दत्तू हाच शिकवायला होता. कितीही चांगल्या गुणांनी पास झालं तरी पुन्हा परिपक्व होण्यासाठी एक वर्षे त्याच वर्गात टाकणे त्याच्या या पूर्वनियोजित शिक्षेला आम्ही सगळेच भावंड बळी पडलो.


 लेखकाने केलेले वर्णन आत्मप्रौढी नसून प्रांजळ अनुभव कथन आहे. शेतातली काम, गुरंढोरं राखत, बापाला मदत करत, कापसाच्या गाडीसोबत उपाशी राहून प्रवास करत, शेवटी बाप आणि मास्तर आदर्शाचे प्रतिक मानणाऱ्या एका सच्चा व प्रामाणिक मुलांचे हे आत्मकथन आहे.


हे लेखन करताना अत्यंत बारकावे लेखकाने टिपले आहेत. बालूभाऊ भुनकाला चपराशी, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत धाड् धाड् उड्या टाकणारी ढिवरांची पोरं ,वर्गात मध्येमध्ये दप्तरात फुगे म्हणून कंडोम आणणारा विलास , गि-हाईकाच्या अंगाचे मोजमाप न घेता केवळ एकदा शरीराकडे पाहिले की दुसर्‍या दिवशी कपडे शिवून देणारा जगन्नाथ शिंपी ,नानाजी वडगाववाला, आणि वासुदेव चिखलगावला आपल्या कुटुंबासह कायमचे निघून जाणारे याचं सुक्ष्म वर्णन लेखकाने अत्यंत ताकदीने केलं असून सहज शब्दचमत्कृती साधत आत्मकथन रेखाटलं आहे. सामान्यतः आपणाला वाटतं की कुणब्याच्या पोराला ,घरी शेती ,बैलजोडी घेऊन शेतात राबणाऱ्या माणसाला निदान पोटापुरतं मिळतं परंतु ही आत्मकथा वाचल्यानंतर खरी परिस्थिती उलगडते म्हणून तर लेखक म्हणतो ज्वारीची भाकरी ,कण्या, तुरीच्या डाळीचे पाणी खाऊन कंटाळा यायचा सणासुदीआणि पाहुणा हे दोन शब्द सुखावून जायचे.


पोहणं ,माशाचं कालवण करणं,वाटा मिळवणं, ससं धरणं ही सर्व कामे लेखकाने केली आहेत .ढिवराच्या पोरायसंग हिंडते म्हणून गावातली कुणब्याची पोरं थट्टा करायची पण लेखकाने त्याकडे दुर्लक्ष केलं. पोहताना पाण्यात बुडून लेखक मरता -मरता वाचला ही ढिवराच्या पोरांची आपल्यावरची पुण्याई लेखक मानतो .त्यांच्या ठिकाणी सर्वधर्मसमभाव आजही कायम आहे .बोर्डाची परीक्षा ,एसटीत बसून जाणं, नापास होणं ,काबाडकष्ट करणं हे सर्व लेखकानं भोगलं आहे. काम केलेले पैसे आईजवळ देताना मोठं सुंदर वर्णन लेखकाने केलं आहे. 

"माय हीच त्यावेळी शाश्‍वत बँक वाटायची लगेच पैसे तिच्याकडे द्यायचो "

(पेज नंबर 41)


 वर्धा नदीच्या पात्रातून दिवसभर वाळू आणताना पुरेपूर दमछाक व्हायची , अंगातोंडावरून घामाच्या धारा वाहायच्या, परंतू शामराव पाटील हाताक जेव्हां सायंकाळी कुडवाला पंचवीस पैसे याप्रमाणे जेंव्हा ठेवायचा तेंव्हा डोकं हलकं व्हायचं. वाळू पात्रातून आणण्याचे काम,डांगर ,काकड्या आणि ढेमसं तोडून एकाजागी करण्याचे काम ,हे करताना आजच्या तरुण युवकांना लेखक चांगल्या कामासाठी कुणाचे शिव्याशाप पचवावे लागले तरी चालतील हा नियम सांगतो. लेखकाने करदोडा कमरेला बांधणच सोडून दिला याचा एक मजेदार किस्सा त्यांनी या आत्मकथनात सांगितलायं .


सर्रर्रदिशी एक मोठी घोरपड बाहेर येऊन बांधाकडे धावू लागली. आम्ही तिघे काठ्या घेऊन तिच्या मागे धावलो. परंतु ती पुन्हा एका जवळच्याच मोठ्या खड्ड्यात घुसली. परत काट्या खोलात टाकून हलवीताच भड्कन बाहेर येऊन जिवाच्या आकांतानं जिकडे वाट मिळेल तिकडे धावू लागली. तोच एका कुत्र्यानं झडप घालून तिची मान तोंडात पकडली. तिला बाजूला करून लगेच आम्ही तिच्या तोंडावर काठीचे आठ-दहा रट्टे भदाभदा हाणले. काठीच्या मारानं ती जागेवरच अर्धमेली झाली.चार-साडेचार किलोची घोरपड हातात कशी आणायची? म्हणून मी कमरेचा करदोडा तोडला आणि तिला काठीला बांधून आणली. संध्याकाळी दिलीपच्या घरी कापून तिचे तीन समान भाग केले. रात्री भाजीचा वेगळाच गंध सभोवताल दरवळत होता.बिमारीनं घरी बसलेल्या काकाला माहित झालं. त्यांनीही थोडी भाजी मागितली. मात्र त्या दिवसापासून मी कंबरेला करदोडा बांधणं सोडून दिलं.


लेखकाच्या आत्मचरित्रात असे अनेक मजेदार व डोळ्यातआसवं आणणारे प्रसंग आहेत .त्यांची लेखनशैली सहज असून प्रसंग उभे करण्याची हातोटी त्यांच्याकडे विलक्षण आहे.

 सोनबा नावाच्या व्यसनाधीन झालेल्या माणसाला मोठ्या पोरांनी आणि त्याच्या बायकोनी मिळून घरात गळा दाबला. आणि सोनबा तडफडून मेल्याचं वर्णन ,त्याच्या मुलांनी सोडलेला गाव हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा आहे .(पेज नंबर 52)


या आत्मचरित्रात स्वयंस्पष्टता तसेच कांहीच लपवून न ठेवता अतिशय स्पष्टपणे आपल्या आयुष्यातील अनुभव रेखाटण्याचं काम लेखक डॉ. अनंता सूर यांनी इमानदारीच्या पातळीवर केलेलं आहे. जलपंडू होऊन मेलेला मामा, चोरून आणलेला फुटबॉल हे सर्व खरं खरं सांगितल्या मुळे हे आत्मकथन खऱ्या पातळीवर मांडलेली कर्मकहाणी ठरली आहे. भावांनं खूप जीव लावला. कुटुंबाला भावानचं उभ केलं हे सांगताना स्वतःचं प्रेम प्रकरणही तितक्याच तळमळीने हा लेखक सांगतो -

दहावीच्या सार्‍या पुस्तकांच्या पानोपानी तिचं नाव लिहिण्याची सवय मला लागली.

( पेज नंबर 61 ) 

आणि परिणाम लेखक नापास झाला.

"कुळाले कलंक लावला .आजपर्यंत आपल्या घराण्यात कोणीही नापास झालं नाही ,हा पराक्रम करून दाखवला " हे भावाचे शब्द कानावर पडल्यावर डॉ. अनंता सूर व्यथित झाले. आपल्या अनिल नावाच्या मित्राकडे ते गेले .तो चार विषयात नापास झाला होता. त्याला विचारताच तो म्हणाला," हे बघ, साऱ्यांनीच पास व्हावं तर मग नापास कोणं व्हायचं"


 त्याच्या या उत्तरानं लेखक चक्रावून गेला. असे अनेक छोटे-मोठे प्रसंग लेखकाने या आत्मचरित्रात टिपले आहेत. पंगतीतून हाकलून देण्याचा प्रसंग, गपागप हॉटेलातले खाल्लेले आलू बोंडे, मुसलमान दुकानदाराच्या पन्नास रुपयाचा उधारीचा मजेदार प्रसंग ,बापूराव ढिवराला पाण लागल्याचा प्रसंग ,मायला गर्भाचा कॅन्सर झाल्यावर झालेली घालमेल ,शंकर मामा जग सोडून जाताना दोन महिन्यांनी मह्यासंग यायचं तुला हे मायला सांगून गेल्याचं वर्णन हे या आत्मचरित्रातील सुखदु:ख सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याचे वाटते .

हे आत्मचरित्र समस्त कष्टकरी वर्गाचे आहे. बहुजन समाजातील सामान्य कुंटूबाचे प्रतिक आहे असे वाटते. या चरित्रात सहनशील, सोशिक, सभ्य ,सुसंस्कृत आणि शिक्षण घेताना खस्ता खाव्या लागणा-यांचे मार्मिक विवेचन आले आहे.


छळांनी वेडसर झालेली चंदा आणि जावयाच्या जातीनं नंग नाचलं तरी चालते आणि आम्ही अन्यायाचं घोंगड पांघरून चोरावानी जगायचं सारं जीवनच नासवून टाकलं भडविच्यान ! हा चंदाच्या वडिलांचा उग्र भाव हा प्रसंग विदीर्ण करणारा आहे. कोण्याही वाचकाच्या मनात कालवाकालव होणारा हा प्रसंग मोठ्या कौशल्याने दुःख गिळत डॉ. अनंता सूर यांनी ही कर्मकहाणी लिहिली आहे .लेखकाला मिळालेल्या पुरस्काराच्या गमती जमती ,एम. ए.करत असताना शिकवणारे प्रभावी प्राध्यापक, अश्विनी आणि भूषणची सातत्याने येणारी पत्रे ,तासिका तत्वावर नोकरी करताना होणारी ससेहोलपट ,पी.एचडी करताना टायपिंग चा मनोरंजक प्रसंग आणि शेवटी 25 ऑगस्ट 2004 ला मराठीचा पूर्णकालीन प्राध्यापक म्हणून रुजू झाल्याचा आनंद, शेवटी विनोद भाऊ गेल्याचं कळल्यावर आपोआप डोळ्यातून वाहणाऱ्या धारा इत्यादी घटनाचे वास्तव चित्रण "काटेरी पायवाट " या आत्मकथनात दिसते. यात घडणारे परिस्थितीचे सरळमार्गी दर्शन हे या आत्मकथनाची जमेची बाजू आहे .


काटेरी पायवाटेच्या मलपृष्ठावर अशोक पवार यांनी म्हटल्याप्रमाणे ,हे कुण्या दलित ,भटक्या, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंतीत वाढलेल्या युवकाचे आत्मकथन नाही तर सामान्य शेतकऱ्याच्या पोराची संघर्षगाथा आहे. घटना ,प्रसंग क्रमवारीत मागे पुढे झाले असले तरी तटस्थपणे ,ऊरबडवेपणा न करता अतिशय प्रांजळपणे पारदर्शी लेखनशैली वापरून डॉ. अनंता सूर यांनी "काटेरी पायवाट "मराठी साहित्यात लखलखीत केली आहे.


समिक्षक : वीरभद्र मिरेवाड 

नायगाव जि. नांदेड 

9158681302


- काटेरी पायवाट 

(आत्मकथन)

लेखक : अनंता सूर 

अथर्व पब्लिकेशन्स् 

पृष्ठे :180 मूल्य :350

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)