" सोशीत, पिडीत, वंचितांचे अश्रू पुसणारी गझलरुपी 'दस्ती' !" -- अरुण ह. विघ्ने

शालेयवृत्त सेवा
0



          

 महाराष्ट्रात मराठी गझलेचं बीज रुजविण्याचं  काम सुरेश भट साहेबांनी केलं, हे सर्वश्रूत आहे . अलीकडच्या काळात गझलेला चांगले दिवस यायला लागलेत . मुशायरे होऊ लागलेत, संमेलन होऊ लागलेत, मराठी साहित्य संमेलनातही तिला हक्काचं दालन प्राप्त होत आहे , गझलगायनाचेही स्वतंत्र कार्यक्रम होत आहेत . ती कात टाकते आहे . मराठी गझल प्रचार आणि प्रसारात गझलकाराप्रमाणेच गझल गायकांचाही सिंहाचा वाटा आहे. गझल ही नव्या पिढीच्या कविचं आकर्षणाचं केंद्र बणलेली दिसते. तंत्र अवगत करून गझल मोठ्या प्रमाणात झडताना दिसते . ही गझलेच्या भवितव्याच्या दृष्टीने आनंदाची व कौतुकाची बाब आहे .गझल ही एक साधना आहे . ज्याला छंदातील उत्तम कविता लिहिता येते, त्याला चांगली गझल लिहिता येवू शकते .असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यासाठी व्याकरण, शब्दसाठा आणि गझलेच्या तंत्राचा सुक्ष्म अभ्यास लागतो . शब्दांच्या यथोचीत जागा सांभाळणे आणि आशय योग्य शब्दात पकडणे हे ही महत्वाचे आहे. अन्यथा गझल प्रभावी न ठरता ती निरस वाटते . गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असते ,असं म्हणतात . त्यासाठी शेरही तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो. प्रत्येक शेर हा वाचकाच्या तोंडातून वाह ! काढणारा असला तरच ती गझल प्रभावी व जनमान्य ठरते . अन्यथा निलेश कवडेंच्या खालील मतल्यात म्हटल्याप्रमाणे व्हायचं . 


" टोक द्वेषाचे कधी कोमल असू शकते

  वाहवा सुद्धा छुपी टिंगल असू शकते .."

              (पृष्ठ क्र. 41)


वास्तविक पाहता गझल हा कवितेचाच एक भाग समजला जातो . पण पुर्वी आणि थोड्याफार प्रमाणात आजही गझलकार आणि कवींमध्ये थोडं अंतर जाणवते. गझल, मुशायरा आणि कवी संमेलन दोन्ही मंचावर वावरते. परंतु कवितेला मुशाय-यात स्थान दिसत नाही. त्याची कारणमिमांसा मी येथे करणार नाही . गझलकारांनी व तिच्या जाणकारांनी आपल्या मनाचा आवाका वाढविला तर गझलेला अधिक चांगले दिवस येतील .काही लोक हे कार्य आवर्जून करताना दिसतातही . गझलकार आणि कवींचं हातात हात घालून चालणं एका दृष्टीने कौतुकास्पद असेल. मी येथे गझलेच्या तंत्राविषयी बोलणार नाही. तसाही तो माझा प्रांत नाही . पण गझलेने काँमन मँनच्या आयुष्याची गोळा-बेरीज मांडांवी असे आवर्जून वाटते. ती अलीकडे मांडायला लागली आहे . त्याबद्दल स्वागत आहे .



" सामान्य माणसांचे आयुष्य मांडतांना

   मांडू कशाकशाची बेरीज कागदावर !" 

असं म्हणणारा अकोला येथील युवा गझलकार निलेश श्रीकृष्ण कवडे यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान प्राप्त 'दस्ती' हा पहिला गझलसंग्रह नुकताच प्रकाशीत झाला . तो पायगुण प्रकाशन,अमरावती यांनी प्रकाशीत केला . दस्ती हा शब्द व-हाडी बोलीतही रुढ होता . या दस्तीच्या (रुमाल) घडीत काय दडलय ? ते आपण बघुया . महाराष्ट्र हे राज्य परिवर्तनशील विचारधारेचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून ओळखल्या जाते . या राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले,सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मयोगी संत गाडगेबाबा, डाँ.पंजाबराव देशमुख अशा अनेक विचारवंतांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे . हाच वारसा बहु अंशी नवी पिढी  पुढे नेण्याचं काम नेटाने करते आहे. याचा प्रत्यय कवडे यांची गझल वाचताना येतो. त्यांची गझल काही रास्त जुन्या विचारांची नव्या विचारांशी सांगड घालीत सामाजीक जाणीवेतून माणूस केंद्रस्थानी ठेऊन संवैधानीक जीवनमूल्यांचा व वैज्ञानीक विचारधारेचा अंगीकार करताना दिसते . अनेक अनिष्ट गोष्टींना बगल देत ती परिवर्तनवाद स्विकारते . त्यांच्या गझलेत विचारप्रवाहाचा साचलेपणा आढळत नाही.  ती सामाजीक भान जपत वास्तव मांडण्याचं धाडस करते .


" रुढींना तोच दरवाजा खुला असतो

  जिथे दारात उलटा बाहुला असतो !"

             (पृष्ठ क्र.31 )


                      किंवा


" मी पावलांचे सोडले मागे ठसे

  त्यावर नका कोणी फुलांना अंथरू !"

          (पृष्ठ क्र.29)


येथे गझलेने विज्ञानवादाची कास धरलेली आपल्याला जाणवते . ती आपले मत परखडपणे मांडते. वैचारीक स्थित्यंतर घडविण्याचा प्रयत्न करते . मानवी जिवनमूल्यांचा विचार मांडते . ती नव पिढीला सजग करते . ठराविक दिशा त्यांच्या समोर ठेवते . परिस्थितीशी संघर्षाचा कानमंत्र देतानाही दिसते .


" मातीमध्ये रुजणे जमले त्याला जगता येते

  जगणा-याला पुन्हा नव्याने,येथे फुलता येते


कधीही करू नकोस मित्रा परिस्थिचा बाऊ

युद्ध शेवटी तोच जिंकतो ज्याला लढता येते"

                ( पृष्ठ क्र.22)


            ही रचना परिस्थितीशी लढण्यास बळ देते . तिला हार माणने पसंत नाही . दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून  जगण्याचा नवा मार्ग शोधायला शिकविते . अनेक महापुरुष संघर्ष करूनच पुढे आलेत .त्यांनी तत्कालीन प्रतिकुल परिस्थितीचे बंध झुगारीत एक नवा विचार पेरण्याचं धाडस केलं . त्यावेळचं त्यांचं ते धाडसाचं पाऊल आज अनेकांना भाकर देऊन गेलं . फुले दांपत्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतलेत .शेतक-यांचा असो, अस्पृश्यता निवारणाचा असो, स्त्री शिक्षणाचा असो, भेदाभेद नष्टतेचा असो , विधवा विवाह असो ,अनिष्ट प्रथा बंद करण्याचा असो. आज त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना समाजात जिवन जगणे सुकर झाले आहे. पुढे या बाबींना संविधानातील कलमानुसार बळकटी प्राप्त झाली आहे . धार्मवादाला खतपाणी न घालताना त्याला हद्दपार करणे लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल ठरेल .  या संदर्भात कवी, लेखक,वक्त्यांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे . ते टाकतांना दिसतातही . पण त्याकडे अंगुलीनिर्देश होता कामा नये . याबाबतचे वास्तव कवडे यांची गझल मांडताना दिसते .


" आडनावातली शोधतो जात अन्

   टाळतो रोज मजला कुणी ना कुणी "

              (पृष्ठ क्र.95)

                                किंवा


"वाढ झाली संकुचित वृत्तीमध्ये

काय कामाचे नियम जातीमध्ये


मी जशी चौकट प्रथेची मोडली

जाहलो तेव्हा अधम जातीमध्ये !"

          (पृष्ठ क्र.     )


                 माणूस जेवढा शिकला तेवढाच विचाराने सोकत चाललेला आहे की काय? कधी कधी असं वाटायला लागतं . माणसापासून माणूस दूर जातोय का हल्ली ? असं कुठेतरी मनाला वाटून जातं . सामान्य जनतेच्या मनावर अनावश्यक गोष्टी बिंबविण्या पेक्षा त्यांच्या भाकरीचा प्रश्न मला अधिक महत्वाचा वाटतो .परिवर्तन हा निसर्गाचा नियम असला तरी ते समाजाला पोषक अर्थाने आलं पाहिजे . इतर क्षेत्रात सातत्याने उचीत स्थित्यंतर घडत गेली पाहिजेत . रोजगार, शिक्षण, नोकरी, महागाई कमी करणे, हे ही विषय जिव्हाळ्याचे आहेत . चालणा-या पावलांना वाटा मोकळ्या असल्या पाहिजेत, गगनभरारी घेऊ इच्छिणा-या पाखरांना आकाश कवेत घेता आलं पाहिजे . पावलात बेड्या आणि पंख छाटण्याचे काम होऊ नये, असे कवडेंच्या गझलेला वाटते . संविधानामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या जिवनमूल्यांना बळकटी प्राप्त झाली . अनिष्ट गोष्टीत अडकून न पडता नव पिढीला आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न वास्तवतेत उतरविता येत आहे . सकल बहुजन समाज आज आपणास प्रगती पथावर दिसतो . याचं प्रतिबिंब पुढील मतला आणि शेरात दिसतं.


" माझ्या तुझ्या मनाचा जेव्हा मिलाफ झाला

अवघाच हा जमाना अपुल्या खिलाफ झाला


चौकट परंपरेची तू मोडुनी निघाला

रस्ता नव्या युगाचा दुनियेस साफ झाला !"

            (पृष्ठ क्र.34)


आज जाती-धर्माच्या भिंती पाडून नव पिढी विचाराने, वैवाहीक बंधनाने एकमेकांच्या जवळ येत आहेत . हे सामाजीक व वैचारीक परिवर्तन आहे . जो पर्यंत कुणी समोर पाऊल टाकण्याचं धाडस करणार नाही, तोपर्यंत बदल घडून येणार नाही . आणि ते धाडस नव्या पिढीकडे असल्याचं दिसते. जिवनाचा मार्ग हा सुख-दुःखाने व्यापलेला असला तरी ज्यांच्यामध्ये यातून मार्ग काढण्याची धमक आहे ,तो आपला प्रवास सुखकर करून घेतो .


" वेदना माझ्यावरी दिलदार झाली

  तीच माझी शेवटी घरदार झाली


   ताठ पाठीचा कणा ज्या माणसांचा

   तीच येथे माणसे कलदार झाली


   कास्तकारांच्या पिढ्यांचा घाम जिरला

   येथली माती अशी कसदार झाली !"

          (पृष्ठ क्र.18)


       जगाचा पोशींदा आपली संपूर्ण वेदना, कष्ट,व्यथा,भूक पचवून इतरांसाठी जगत असतो . तो कष्ट उपसतो पण व्यवस्थेमुळे त्याचेवरच कधी कधी उपाशी राहण्याची पाळी येते .पण तरीही तो हार न मानता परिस्थीतीवर मात करीत, घाम गाळून शेती कसतो . माती त्याला तुडविते आणि तो तिला . हे समीकरण नित्याचेच झाले आहे. तरी पण तो तिच्यात स्वप्न फुलवितो .तो परिस्थितीचा कधीच बाऊ करीत नाही . जणू पोशींदा या नात्याने स्वकुटुंबाप्रमाणेच जगाच्या पालन-पोषणाचीही जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावर घेतली असावी . कवडे यांची गझल ही कष्टक-यांचं मनोबल वाढविण्याचं काम करताना दिसते .ती त्याच्या सुख-दुःखात पाठीशी भक्कमपणे उभी राहताना दिसते . अशाप्रकारे गझलेने आपल्या वैचारीक सीमा रुंदावण्याचं काम करावं . सौंदर्यवादी दृष्टीकोण जपून तिने सामाजीक भानही जपलं पाहिजे . ती मुशाय-यातून, विचारमंचावरून समाजाच्या व्यथा, वेदना, दुःख मांडते आहे . यातूनच ती लोकमान्य होईल .ती कधी कधी व्यवस्थेच्या विरोधातही एल्गार पुकारताना दिसते . वैदर्भीय गझलकार यात आघाडीवर दिसतात .मला वाटते कवडे यांचीही गझल त्या दिशेने निघालेली आहे . ती कृतीप्रवण होत वृक्षतोडीच्या विरोधात आपलं मत मांडताना दिसते आहे .


" वेदनांनी काळजाच्या सरहदी ओलांडल्या

येऊनी भरती अचानक पापण्या पाणावल्या


वर्षभर झाली कटाई सर्व वृक्षांची जुन्या

आमच्या शहरात यंदा फक्त भिंती वाढल्या !"

                ( पृष्ठ क्र.39 )


या ओळी समाजातलं भीषण वास्तव मांडतात . वृक्षतोड होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते आहे . याचा विचार गझल मांडते याचा अर्थ तीचा वावर सर्वत्र असतो .ती रस्त्यावर फिरते, शेतात जाते, ती शहरात फिरते,गावात जाते, ती शेतातल्या मातीशी, माणसाशीही हितगुज करताना दिसते. हे तिचं कार्य एखाद्या लहानग्या मुलीने मोठी कामगीरी पार पाडण्यासारखं गौरवास्पद वाटते .


" ऐकतो आहे पुन्हा एल्गार मातीचा

श्वास क्रांतीचा नव्या मिळणार मातीचा


अजुनही वृद्धाश्रमाचा स्पर्श ना झाला

नांदतो गावामध्ये संस्कार मातीचा


केशरी हिरव्या निळ्या रंगात नाही मी

धर्म मी स्वीकारला दिलदार मातीचा !"

               ( पृष्ठ क्र.44)


कवडेंच्या गझलेला जाती-धर्माचं, विविध रंगांच्या झेंड्याचं आकर्षण नाही, तर तिची नाळ ती दिलदार मातीशी जोडू इच्छिते . मातीत खपणा-या माणसांशी जोडू इच्छिते, त्यांची व्यथा जाणून घेते . या मातीतील चांगले संस्कार जपून त्याचं दान ती नागरी मातीला देऊ इच्छिते . हा उदारमतवादी दृष्टीकोण ती जपते . कवडे यांच्या 'दस्ती' च्या घडीत वंचित,सोशीत ,पिडीत माणसावरील अन्यायाचा विचार दडलेला दिसतो . ही दस्ती आपली घडी वाचकाला अलगद उकलायला सांगते . तो विचार जपायला प्रेरीत करते, ती समाजमनाचं चिंतन मांडते .एवढंच नाही तर गझल शाळेतही जाते, शिक्षकांनाही भेटते , विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांची व्यथा,कथाही जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे.


" लागले मतदारही शोधायला गुरुजी

  आणि शौचालय किती मोजायला गुरुजी


   राहिले आता कुठे,शिकवायला गुरुजी

   रोज खिचडी लागले शिजवायला गुरुजी!"

              ( पृष्ठ क्र.62)


                       किंवा 


    "वाहतो ओझे अपेक्षांचे किती मी

     एकदा वजनात मोजून घ्या दप्तर !"


      नव विचाराची सशक्त पिढी घडविण्याचे महत्वाचे कार्य ज्यांचेकडे आहे, तो शिक्षक शाळाबाह्य कार्यात गुंतून पडलेला असेल तर, शिक्षणाचं काय होणार ? याची कल्पनाच केलेली बरी. विद्यार्थ्यांचीही कैफियत या पेक्षा काही वेगळी नाही. तोही तप्तराच्या ओझ्याने वाकत चाललेला आहे . त्याचं बालपण, जगणं, बागळणं पालकांच्या वाढत्या अनाठायी अपेक्षांनी हिरावून घेतलं आहे .कवडे डोळस दृष्टी व निरीक्षणाचं अंगं लाभलेलं व्यक्तिमत्व आहे . तरीही  मातृत्वाच्या प्रेमात मात्र बालमन रमतांना दिसते. मुल कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते लहानच असतं . येथे मातृत्वाप्रती नितांत आदर दिसतो .


" खेळतो आई तुझ्या पदरात मी

   गुंततो आई तुझ्या पदरात मी


   जीवनाच्या वेदनांना विसरुनी

   झोपतो आई तुझ्या पदरात मी


   दुःख कोणा सांगता आले न जे

   सांगतो आई तुझ्या पदरात मी !"

            ( पृष्ठ क्र.55 )


        कोणताही कलाकार हा संवेदनशील व  हळव्या मनाचा असतो . जेव्हा माणूस खचून जातो तेव्हा त्याला आई अधिक जवळची वाटते, ती त्याला धीर देत असते. जगातील कोणताही माणूस आईच्या मातृत्वाविणा अपूर्ण असतो .याची प्रचिती ही रचना करून देते . तद्वतच बाबाची वंचनाही तो जाणतो .


    " या आसवांना रिझविता बाबा कसे

       हसण्यात रडणे लपविता बाबा कसे


       पाहून हाती दोर भीती वाटते

       कुंकू घराचे टिकविता बाबा कसे


       वाहून जाते पीक हे डोळ्यापुढे

       नयनी पुराला पचविता बाबा कसे ?"

                  ( पृष्ठ क्र. 58 )


             शेतकरी बाबाचं दुःख जो जाणतो , अनुभवतो, तोच त्याच्या काळजातील व्यथा सकसपणे मांडू शकतो .कवडे हे शिक्षक असले तरी शेती-मातीशी परिचीत असलेलं व्यक्तीमत्व आहे . व-हाडभूमीत वास्तव्य असल्याने व गावाशी नाळ जुळून असल्याने, हे सर्व त्यांच्या गझलेत उतरलं असावं . देशात सांसदीय लोकशाही आहे . ती आहे म्हणून सर्वांचे हक्क,अधिकार सुरक्षीत आहेत . पण लोकशाही सुखाने नांदते आहे का ? याचाही आढावा कवडेंनी घेतलेला दिसतो.


" लोकशाहीचे खरे वाहक तुम्ही आम्ही

कागदावर राहिलो मालक तुम्ही आम्ही


या व्यवस्थेशी झगडने संपले नाही

या व्यवस्थेतील आंदोलक तुम्ही आम्ही !"

           (पृष्ठ क्र.82 )


         डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, "जर लोकशाही जिवंत राहिली तर तिची फळे नक्कीच आपणास लाभतील. जर लोकशाही मेली तर तो आपला विनाश आहे. या संबंधी शंकाच नाही " ( खंड 18 भाग 2 ).  खरच का आपण  लोकशाहीचे प्रत्यक्ष वाहक आहोत ? की केवळ नावापुरतेच उरलो आहोत ? ही बाब चिंतनीय  व चिंतेची वाटते . येथे कवडे यांची गझल समाजमनाचं वास्तव चित्र अधोरेखीत करू पाहते. ती वास्तवाशी भिडते . हे वास्तव लिहीण्याचं धाडस तमाम कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकारांमध्ये येण्याची गरज आहे . साहित्तिकांनी वास्तव   मांडायला हरकत नाही. या कार्यात निलेश कवडेंची गझल मात्र हे आवाहन स्विकारण्यासाठी सज्ज झाली दिसते . ती उजेडप्रवाही शब्दांची मशाल हाती घेऊन काळोखास नेस्तनाभूत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे .


"अंधार मी युगाचा थोडा चिरून आलो

मी काल काजव्यांना जागे करून आलो


काळोख ठार करण्या का?चालले रिकामे

थांबा मशाल माझी हाती धरून आलो !"

            (पृष्ठ क्र. 89 )


       महापुरुषांनी आपल्याला विचारांचा, ज्ञानाचा उजेड प्राप्त करून दिलेला आहे . जागल्याच्या रुपाने सदैव पहारा देत आपल्या भल्यासाठी तो टिकविण्याची जबाबदारी आपली आहे .   त्या उजेडाची राखण करण्यासाठी  व काळोखाचे हल्ले परतविण्यासाठी आपण आपली लेखनीरुपी मशाल रनांगणावर सदैव तैनात ठेवली पाहिजे . 'दस्ती' ही वंचीत, सोशीत,पिडीत माणसाचे अश्रू पुसून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम करते .  ज्याचा देह चंदनासारखा झिजतो, जो कापूरासारखा जळतो, जेथे शर्यत जिंकण्याची ऐपत असतांनाही सस्याला कपटाने हरविल्या जाते, ज्या पोपटाचे पंख छाटून पिंज-यात कैद केले जाते , जेथे माणसाला महत्व देण्यापेक्षा दगडाला महत्व प्राप्त होते . किंवा खेळणा-या बाळाला मुद्दाम पाळण्यात कोंबून ठेवल्या जाते, तेव्हा त्यांची दशा काय होत असावी ? याची कल्पनाच केलेली बरी . हे सामाजीक आकालन गझलकार उद्वेगाने आपल्या गझलेत मांडताना दिसतो . कवडे यांनी ब-याच प्रतिमांचे उपयोजन गझलेत मोठ्या कलात्मकतेने केले आहे . या सर्व प्रतिमांचं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व व साधर्म्यही आहे .

        स्वतःला स्वतःत शोधायचे , दुःखमुक्त जिवन जगायचे असेल आणि आंतर कलहाला पर्याय द्यायचा असेल तर बुद्ध समजून घेतला पाहिजे . बुद्ध तत्वज्ञान हे वैज्ञानीक विचार देतो . तो मानव कल्याणाचा मार्ग दाखवितो .


" शरण जाऊन बुद्धाला स्वतःच्या जवळ गेलो

स्वतःला शोधण्यासाठी हवे मांगल्य डोळ्याचे

                ( पृष्ठ क्र.65)


तर एकूणच या दस्तीत खुप काही दडलेलं आहे . कवडे यांच्या दस्तीचा आवाका मोठा आहे . सर्वांना कवेत घेण्याचा दिलदारपणा तिने जपलेला दिसतो .सामान्य माणसाची वेदना, व्यथा,दुःख, सुख, विरह, काळोख-उजेड, जीवन पद्धती,व्यवस्था , लढाऊबाणा, प्रेम, या सर्व बाबी मला दस्तीच्या घडीत आढळल्यात. ही गझल मानवी उत्थानाचा विचार मांडते. प्रत्येक विषयाचं मर्म वेगवेगळं आहे . 'दस्ती' ही ब-याच उपयोगाची आहे . ती दुःखीतांचे अश्रू पुसते, ती शेतक-या घाम पुसते, ती जखमेवरही बांधता येते, ती दुःखाच्या उन्हापासून संरक्षणही करते , जहाल विषाणू शरीरात प्रवेशू नये म्हणून तोंडाला बांधून संरक्षणही करते. यापेक्षाही बरंच काही दस्तीने दिलं आहे . परंतु वाचक तिचा उपयोग कशासाठी व कसा करतो ? हे सर्वस्वी वाचकांवर अवलंबून आहे . 


            या संग्रहाची प्रस्तावना गझलकार शिवाजी जवरे, बुलडाणा यांनी समर्पक लिहिलेली आहे . ते गझलेचं मर्म अधोरेखीत करताना म्हणतात ...... " दस्तीच्या घडीत अनेक मार्दवी-सुगंधी पाकळ्या आहेत, मौलिक बिजे आहेत, आपल्या मातीची धूळ आहे. केव्हाही उघडा आणि अनुभव घ्या ." ही बाब मला महत्वाची वाटते .पाठराखण जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी केली आहे . पुष्पराज गावंडे यांनीही सदिच्छा संदेश दिला आहे . गझलसंग्रह एकूणच वाचनीय ,बोधप्रद व विविधांगी आकलन मांडणारा आहे . या निर्मितीसाठी निलेश कवडे यांचे हार्दिक अभिनंदन . पुढील दमदार साहित्यकृतीसाठी हार्दिक शुभेच्छा !


समिक्षक : अरुण ह.विघ्ने

मु.पो. रोहणा

त. आर्वी, जि.वर्धा


◾️गझलसंग्रहाचे नाव : ' दस्ती '

◾️गझलकार : निलेश श्रीकृष्ण कवडे

◾️प्रकाशन : पायगुण प्रकाशन, अमरावती

◾️म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त

◾️प्रस्तावना : शिवाजी जवरे, बुलडाणा

◾️पाठराखण : श्रीकृष्ण राऊत

◾️पृष्ठसंख्या : 96 , मूल्य :150/-₹

◾️मो.नं. 9822367706

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)