नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आपल्या आईला सोडून बालक शिक्षक नावाचा दुसऱ्या आईकडे येत असते. त्याचे हे शाळेच्या प्रांगणात विश्वासाने टाकलेले पहिले पाऊल शाळेने आपल्या काळजावर जपून त्याचे भविष्य घडवावे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.ते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे आयोजित शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन करताना बोलत होते.
मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन करणारे हरहुन्नरी केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव जाधव यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून पालकांच्या समुपदेशनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रवेशपात्र बालकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या शाळेच्या प्रांगणात आकर्षक शैक्षणिक स्टाॕल्स लक्ष वेधून घेत होते. यात नावनोंदणी, पालकांचे समुपदेशन, भावनिक विकास, भाषाविकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, गणनपूर्व क्रिया इ. विषयाचे टेबल शैक्षणिक साहित्याद्वारे सजवण्यात आलेले होते.
बालकांच्या स्वागतासाठी चित्तवेधक रांगोळी काढण्यात आली होती. रंगीबेरंगी फुले, आंब्याच्या पानांची तोरणे व फुग्यांची सजावट करून संपूर्ण शाळा सुशोभित केली होती. लेझीम पथकाच्या व ढोलताशाच्या गजरात प्रवेशपात्र बालकांची मिरवणूक काढून वाजतगाजत संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली. नवागत बालकांसाठी फुलापानांच्या आकर्षक सजावटीने सजलेला सेल्फी पाॕईंट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, मुख्याध्यापक बाबुराव जाधव, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे यांनीही बालकांसह या सेल्फी पॉईंटमध्ये फोटो काढून घेतले. उत्साहाने भारावलेल्या शैक्षणिक वातावरणात मेळावा संपन्न झाला. प्रवेशपात्र बालकांच्या पावलांचे ठसे घेऊन उज्ज्वल भविष्याच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विविध आकाराच्या टोप्या, कार्टूनचे मुखवटे, फुलांचे हार घालून सजलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, उपक्रमशील मुख्याध्यापक बशीर पठाण, शालेय व्यवस्थापन समितीच्या शमिमा, सदस्य, पालक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. सूत्रसंचलन रूपाली गोजवडकर यांनी केले. शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी सीमा देवरे, उषा एडके, मुदस्सर अहेमद, फहीमुन्नीसा बेगम यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
प्राथमिक शाळा इंजेगाव येथे शाळा पूर्व तयारी मेळावा..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजेगाव येथेही शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शाळेने जतन करून ठेवले. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे यांनी मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक संगमेश्वर पांचाळ, सहशिक्षिका सौ प्रणिता अकोशे यांचे अभिनंदन केले.
नवागतांच्या सर्वांगीण विकासासाठी हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे . .
प्रा. शा. वाडीपुयड येथील शाळा पूर्व तयारी उपक्रमात व्यंकटेश चौधरी यांचे प्रतिपादन
नवागत विदयार्थ्यांच्या शैक्षणिक, बौध्दिक, मानसिक व शारीरिक विकासासाठी शाळापूर्व तयारी उपक्रम सर्वार्थाने महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीपुयड येथे विदयार्थ्यांच्या जोशपूर्ण उत्साहात व सर्व शिक्षकाच्या उत्कृष्ट नियोजनात शाळा पूर्व तयारी उपक्रम संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना चौधरी बोलत होते. मुख्याध्यापक दत्तप्रसाद पांडागळे सहशिक्षिका सौ. मेघा पोलावार, श्रीमती सविता पत्की, सौ.सुवर्णा मामीडवार, सौ.विद्या भालेराव, श्रीमती रेहाना शेख दादे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल शिविअ व्यंकटेश चौधरी व केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे यानी सर्वांचे अभिनंदन केले.
प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. मेघा पोलावार व सर्व शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आले. सुबक रांगोळी, शाळा परिसराची सुंदर सजावट, प्रवेशद्वारावर बांधलेली आंब्याच्या पानांची व वेगवेगळया फुलांची तोरणे, शाळा पूर्व तयारीसाठी विविध शैक्षणिक साहित्याची व्यवस्थितपणे केलेली रचना, विदयार्थ्याना पुष्पहार व कागदी टोपी घालून त्यांचे केलेले स्वागत हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
सकाळी सकाळी सर्व चिमुकले वेगवेगळ्या पोषाखात व वैविध्यपूर्ण रंगछंटामधे साडी, लुगडी, धोती शर्ट घालून नटून थटून आले होती. गावातून ढोलताशा लेझीम पथकासह, विद्यार्थी अनेक भूमिकेत प्रभातफेरीत सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी गावकर्यांचे लक्ष वेधून घेत होते. शाळा पूर्व तयारी उपक्रमास पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .