' ऊसकोंडी ' - डॉ. श्रीकांत पाटील

शालेयवृत्त सेवा
0



          सुप्रसिद्ध 'लॉकडाऊन' या यशस्वी कादंबरीनंतर डॉ. श्रीकांत पाटील यांची 'ऊसकोंडी' ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली. ती नुकतीच माझ्या हाती पडली. ती एका बैठकीत वाचून काढली. त्या कादंबरीवर काहीतरी लिहिले पाहिजे असे माझ्या मनी आले, म्हणून हा लेखन-प्रपंच.


               डॉ. श्रीकांत पाटील यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध कादंबरी म्हणजे 'लॉकडाऊन'. या * कादंबरीचा हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा सहा ते सात भाषांत अनुवाद झालेला आहे. अशा सिद्धहस्त लेखकांची 'ऊसकोंडी' ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. सुप्रसिद्ध असलेली म्हण म्हणजे 'साखरेचे खाणार त्याला देव देणार.' अशी ही साखर ऊसापासून निर्माण होते. पण अशा ऊस-उत्पादकाला काय मिळते? अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत शेतकरी ऊस-शेती करतो. शेती करत असताना मजुरांची समस्या, मशागतीचे वाढलेले दर, वाढलेल्या किंमतीची खते व औषधे, सोसायटी, पाणीपुरवठा या ठिकाणी जाऊन हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक समस्यांनी गांजलेल्या शेतकऱ्याची कहाणी म्हणजे 'ऊसकोंडी.' या कादंबरीत शेतकऱ्याची अनेक दुःखे आलेली असली, तरी या कादंबरीचा नायक कुठेही आपले रडगाणे गात बसलेला नाही. *गांजलेल्या* अनेक शेतकऱ्यांप्रमाणे शेवटची भूमिका म्हणजे आत्महत्या करणे याचाही तो कधी विचार करीत नाही. उलट सकारात्मक विचाराने परिपूर्ण नायकाचे दर्शन या कादंबरीत करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. यामध्येच या कादंबरीचे यश लपलेले आहे. 


             या कादंबरीचा 'मनुदा' हा शेतकरी नायक आहे. जरी तो शेती करीत असला, तरी सुशिक्षित आहे. बी.ए. पास झालेला आहे. त्यामुळे त्याची वैचारिक पातळी चांगली आहे. हाडाची  काडं आणि रक्ताचं पाणी करुन तो ऊस पिकवतो. शेतामध्ये करावी लागणारी संपूर्ण कामे तो मोठ्या हिमतीने आणि धाडसाने करतो. जोमाने आलेल्या ऊस पिकाचा त्याला अभिमान वाटतो. परंतु गावगाड्यात बांडगुळ वृत्तीची माणसं त्याला छळत असतात. यामध्ये ऊस तोडणीसाठी चिटबॉयची हांजी हांजी करावी लागते. सुरुची केलेली लागण गुलाल टाकून न्यावी लागते. अनेक ठिकाणी त्याची अडवणूक, पिळवणूक, छळवणूक होते. त्याची होणारी घुसमट, मनाची तगमग आणि सर्व बाजूंनी होणारी कोंडी वाचकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने या कादंबरीची निर्मिती डॉ. श्रीकांत पाटील यांनी केलेली आहे. एका बाजूला चिटबॉय, ट्रॅक्टर ड्रायव्हर, कंत्राटदार अशा दुष्ट प्रवृत्ती त्याला त्रास देत असतात. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचे वडील त्याला प्रेरणा देतात. त्याची पत्नी शीतल त्याला सहकार्य करते. त्याचे जिवाभावाचे मित्र मदत करतात. म्हणजेच ऊसकोंडी कादंबरीत सुष्ट आणि दुष्ट वृत्ती आणि प्रवृत्तीचा समतोल साधण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. 


           एकविसाव्या शतकातही भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील सुमारे सत्तर टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर आधारित आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. आपल्या देशाने किंवा जगातील इतर राष्ट्रांनी कितीही औद्योगिक प्रगती केली, तरी मनुष्यप्राण्याला जगण्यासाठी अन्नच खावे लागते. कारखान्यात निर्माण होणारी वस्तू खाऊन त्याला जगता येत नाही. शेतकरी बांधवांनी शेती करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एका बाजूला अशा सुलतानी संकटाबरोबरच लहरी असलेला निसर्ग हासुद्धा अतिवृष्टी किंवा अनावृष्टी या अस्मानी संकटांनीसुद्धा शेतकऱ्याचे जीवन जगणे मुश्किल करतो. माणसाच्या हव्यासापोटी जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले वाढली आहेत. त्यामुळे निसर्गाचे संकट शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणावर आले आहे. अशाप्रकारे शेतकऱ्याला पदोपदी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा या शेतकऱ्याची कथा आणि व्यथा मांडत असताना सकारात्मक विचार या कादंबरीतून लेखकाने पेरलेले आहेत. आज महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण पाहतो. पण यातील नायक 'मनुदा' हा पलायनवादी दृष्टिकोन न बाळगता सकारात्मक विचारातून आपले जीवन जगत असतो. 


            या कादंबरीचा नायक मनुदा कर्तृत्ववान आणि कर्तबगार आहे. यामुळे मुंबईला नोकरीनिमित्ताने गेलेला त्याच्याच गावातील व्यक्तीने सुरुवातीला आपली शेती वाट्याने दिली होती. त्याला सांगितले, "तुझ्या सोयीने हवे ते पीक घे. पण उत्पन्न मात्र चांगले काढ." पुढे जाऊन त्याने आपली संपूर्ण शेती मनुदालाच विकत दिली. 

            सगळ्या संकटावर मात केल्यानंतरसुद्धा ऊसदर वाढीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे तुटलेला ऊस शेतातच वाळून गेला. किमान पंचवीस टक्के वजन घटलं. अशी समस्या त्याच्यावर आली होती. तो खूप निराश झाला होता. पण त्याच्या वडिलांनी त्याला आधार दिला. 

   

         या कादंबरीत लेखकाने आपल्या परिसरातील म्हणजे वारणा काठच्या गावातील बोलीभाषेचा वापर केला आहे. शिवार, व्हय, वारंघशी, आकडी, आजुरा, आवो, उसाभर, कवचाळ, कढ काढा, केन, कांडं, खदखद, घट्ट रिबुट अशा बोली भाषेतील शब्दांमुळे वेगळेपण आले आहे. या कादंबरीत शब्दांतील गोडवा, कोल्हापुरी ठसका आणि भाषेतील वेगळेपणा निश्चितच वाचकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. 


          या कादंबरीत लेखकाने 'बी पॉझिटिव्ह', 'बी फ्री', 'बी शार्प' 'बी अलर्ट', 'बी हॅपी' या पंचसूत्रीचा वापर केला आहे. या सकारात्मक वागण्याचा परिणाम चांगलाच होतो, हा अनुभव वाचकाला या कादंबरीत पाहायला मिळतो. कार्यतत्पर, नेहमी आनंदी असणारा नायक या कादंबरीत लेखकाने रंगवलेला आहे. त्याला शांत, संयमी, सतत साथ देणारी पत्नी शीतल लाभली आहे. सदैव प्रेरणा देणारे त्याचे वडील आहेत. आपल्या मालकाच्या प्रत्येक कामात हिरीरीने भाग घेणारे त्याचे मजूर आहेत. जया, भीम्या, नाम्या, पंड्या हे मजूर त्याला साथ देतात. आत्महत्येसारख्या शेवटच्या टोकाला जाणाऱ्या शेतकरी बंधूसाठी ही कादंबरी निश्चितच प्रेरणादायक ठरणारी आहे. कारण 'संघर्ष हेच जीवन आहे आणि जीवनात संघर्ष अटळ आहे' हे समजून घेऊन त्याला सामोरे गेले पाहिजे. 'वादळाची संकटे झेलणार त्यांना वादळाची काय भीती, तेच माझी गीत गाती' या उक्तीप्रमाणे सतत कार्यरत राहिले पाहिजे हा संदेश या कादंबरीतून वाचकाला निश्चित मिळतो. 


           या कादंबरीत हांजी हांजी करणे, राब राब राबणे, हाडाची काडं करणे, रक्ताचं पाणी करणे, वाट मोकळी करून देणे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणे, तहान भागविणे, माणुसकी असणे, पाणीदार होणे, *आप्पलपोटी* असणे, कामाचा फडशा पाडणे, अंगावर मूठभर मांस चढणे, ससेहोलपट होणे, प्रकाश देणे, कोरडा ठक्क होणे, गायब होणे, सांसुद लागणे, आगडोंब उसळणे, तुकडे पडणे अशा अनेक वाक्प्रचारांचा वापर ~या कादंबरीत~ लेखकाने खुबीने केलेला आहे. 


           किमान रानाची तहाण तर भागंल. *कडुसं* पडल्यावर मनुदा रानातनं आला. एखादा प्रश्न नाही सुटला तर द्यायचा सोडून. 'ठेविले अनंते तैसेची *राहावे'* असं शीतल स्वतःला समजावीत होती. वाहतुकीचा चांगलाच *आजुरा* यायचा. स्वप्नात पैसा खर्च व्हायचा. तवा माणसाजवळ गिन्नी नसायची, पण माणुसकी होती. सारं गाव पाणीदार झालं, हिरवंगार झालं. माणसं स्वार्थी आणि आप्पलपोटी झालीत. उगीच लगेच पाठोपाठ गेलं तर अंगावर तावदाराय नको. 'एकच ध्यास शेती विकास.' रान पार निबार झालतं. 'जिथं प्रश्न आहे तिथं त्यावर उत्तरही असतं.' ऊस बियाणांचे मनमानी दर, नाकी मारणे, तोंडे करणे याचे अव्वाच्या सव्वा मजुरीचे दर. अनुभवातून माणूस शिकत राहतो. वास्तविक अनुभव हाच खरा माणसांचा गुरू आहे. ठावक्यावर ठेवलेली चिमणी भगभगत प्रकाश देत उसळ्या मारत होती. सराराsss गोठा लोटला. चळाळा sss धारा *पिळल्या.* 'च्या मायला, सगळ्या सऱ्या भरल्यात.' पावसानं सात जूनला मृग नक्षत्राचा फक्त उद्घाटन केलं आणि गायब झाला. पोटात भुकेचा नुसता आगडोंब उसळलेला. "अरं लेका, इमानदारी मरत न्हाय. लोकांचा आपल्यावर विश्वास हाय. हीच आपली पत हाय." या प्रकारची वाक्यरचना या कादंबरीत आलेली आहे. खरेतर लालित्यपूर्ण रचना नाही. तरीही लोकांच्या नित्य बोलण्यातील भाषा असल्यामुळे ती वाचकांच्या अंतकरणाला जाऊन भिडणारी आहे. 


           ही कादंबरी वाचताना मनुदाच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत असा वाचकांना भास होतो. आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग या कादंबरीत आलेले आहेत. अगदी ओघवती भाषा साधे-सोपे बोली भाषेतील शब्द यामुळे या कादंबरीची उंची वाढलेली आहे. 

           या कादंबरीचे मुखपृष्ठ विजय जोगमार्गे यांनी अतिशय सुंदर असे रेखाटलेले आहे. या मुखपृष्ठाचा संदर्भ पान नंबर ७७ वर पाहायला मिळतो. "बाबा, तुम्ही वाड्याचा वाघ तयार करा." मनुदानं आबाला सांगितलं. आणि लागलंच नारळ वाढवून *उसाच्या* लावणीला सुरुवात करूया. बाजूच्या किरणच्या रानातलं *उसाचं* चार-पाच वाढं आणलं आणि त्याचा वाघ तयार केला. तर मलपृष्ठावरील डॉ. सदानंद देशमुख यांची पाठराखण कादंबरीला साजेशी लाभलेली आहे. परिशिष्ट एकमध्ये वारणा काठची बोलीभाषा याबाबत माहिती दिली आहे. तर परिशिष्ट दोनमध्ये वारणा काठचे आलेले शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. 


         विद्यार्थी दशेत १९९५ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार, २०१३ मध्ये राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार, २००७ महाराष्ट्र राज्य शासनाचा ग. त्र्यं. माडखोलकर साहित्य संशोधन पुरस्कार आणि २०२१ सालचा 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' या बालकादंबरीला साहित्य आणि संस्कृती मंडळाचा बाल वाङ्मयासाठी 'साने गुरुजी' पुरस्कार प्राप्त झालेल्या श्रीकांत पाटील सर यांच्या 'लाॅकडाऊन' या कादंबरीला महाराष्ट्रातील विविध भागातून डझनावारी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याच डॉ. श्रीकांत पाटील यांच्या 'ऊसकोंडी' या कादंबरीचे वाचक मनापासून स्वागत करतील अशी मला आशा वाटते. त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

    

परीक्षण : श्री. परशराम आंबी

(सचिव, मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर)

पुस्तकाचे नाव : ऊसकोंडी 

लेखकाचे नाव : डॉ. श्रीकांत पाटील 

प्रकाशन : ललित पब्लिकेशन, 

मुंबई मूल्य : ₹ २५०/

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)