पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित झाले आहे. या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची फेरतपासणी केली जाणार आहे.
राज्य सरकारने या फेरतपासणीसाठी ३४ जिल्हा परिषदांमधील मिळून १०२ जणांची तपासणी समिती स्थापन केली आहे. या समितीत प्रत्येक जिल्हा परिषदेतून सरासरी तीन सदस्यांचा समावेश केला आहे.
या फेरतपासणी समितीत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, संगणक प्रोग्रॅमर, वरिष्ठ लेखनिक, डाटा एंट्री आॅपरेटर, सहायक प्रशासकीय अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी आदी विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश केला आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेतून कनिष्ठ सहायक जीवन गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे आणि सहायक प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड या तिघांना या समितीत घेण्यात आले आहे.
याआधी या मसुद्यात सरकारने तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार या ॲपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट करण्यात आलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम व दुर्गम शाळांची नावे, सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती, आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुर्नपडताळणी करण्याचे सांगण्यात आले होते. शिवाय राज्य सरकारने मोबाईल ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.
राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केले आहे. नवीन बदली धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हे खास ॲप विकसित केले आहे. हे ॲप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या आॅनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत. या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले आहे. आयुष प्रसाद यांच्याच अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच सीईंओंचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफारस केली होती. सरकारने ही शिफारस सरकारने स्वीकारली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .