अजिंठा एक जागतीक वारसा आणि लेणीचा शोध..

शालेयवृत्त सेवा
0

 


[ २८ एप्रिल : जागतीक वारसा ठिकाण असलेल्या अजिंठा चा शोध दिवस. त्याविषयी कलासक्त शिक्षक मिलिंद जाधव यांनी लिहिलेला लेख देत आहोत. - संपादक ]


अजिंठा एक जागतीक वारसा स्थळ, भारतीय चित्रकलेचा व शिल्पकलेचा समृद्ध वारसा असलेले पावित्र ठिकाण,जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कैक वर्ष वाघुराच्या घनदाट जंगलात लुप्त झाली होती. या लेण्यांची नव्याने ओळख झाली तो दिवस २८ एप्रिल १८१९. औरंगाबाद शहरापासून एकशे तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे वारसा स्थळ  जॉन स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्यांला  सर्वप्रथम दिसले. या शोधाला आज दोनशे तीन वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने अजिंठ्याच्या चित्रशिल्पवैभवाच्या शोध प्रवासाविषयी लेखन करण्याचा एक छोटासा प्रयास.


इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीपासून अजिंठ्याच्या खोदकामाची सुरुवात झाली असावी . पुढील काळात त्यात अनेक बदल होत गेले. सातव्या शतकात  प्रसिद्ध चिनी प्रवासी    ह्युएन-त्संग  यांनी भारत भ्रमण केल्यानंतर त्याच्या प्रवासवर्णनात .अजिंठ्याच्या लेण्याशी मिळतेजुळते वर्णन केल्याचे इतिहासकाराचे मत आहे.


      अनेक नैसर्गिक व अस्मानी संकटावर मात करत अजिंठ्याची शिल्पकला व चित्रकला ढ्या वर्षानंतरही टिकून आहे.तेथील आश्चर्यजनक असे चित्र - शिल्प हेपर्यटक, इतिहासकार, संशोधक, चित्रकार,शिल्पकार व पुरातत्व अभ्यासक यांना आजही मोह घालणारे ठरते. वाघुरा नदीच्या काठावर नालाकृती आकारात, कोरलेल्या अजिंठा लेण्या मध्ये एकूण ३० गुंफा आहेत. पाच चैत्यगृहे स्वरूपातील अर्थात बौद्ध भिक्षुचे बुद्धांची उपासना करण्याचे ठिकाण आणि उर्वरित विहारे म्हणजे बौध्द भिक्षु आणि विद्यार्थ्यांना वास्तव्यासाठीचे व वर्षावासात पावसाळ्यातील काही दिवसात  यांना राहण्यासाठी तयार केलेले मठ वा संथागार. 


बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार व्हावा अशा उद्देशाने  निर्माण केलेल्या अजिंठा लेणी ही वाकाटक चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात या काळात निर्माण झाल्या. अजिंठाचे वर्गिकरण महायान व हीनयान अशा कालात केले जाते. हिनयान काळात बुध्दमूर्ती पुजा केली जात नव्हती. चैत्यगृह , स्तूप या सारख्या बुद्धाच्या प्रतिकात्मक रूपात  पूजन केले जात असे. नंतरच्या काळात बुद्धप्रतिमा कोरलेल्या जाऊ लागल्या .अजिंठा लेण्यांच्या भिंतीवर छतावर स्तंभावर नैसर्गिक रंगाने काढलेली खडकाच्या भिंतीवर नैसर्गिकरित्या लिंपन करून त्यावरील सुंदर चित्रे दोनहजार वर्षापूर्वीचा जीवनकाळ, सामाजिक-धार्मिक जीवन ,तत्कालिन संस्कृतीचे कलात्मकरीत्या केलेले दर्शन. भगवान बुद्धाच्या जीवनातील घटना दर्शविणारे चित्रे , बुद्धाच्या पूर्वआयुष्यातील जातक कथेवर आधारित घटना, बौद्ध तत्वज्ञानावर आधारित चित्रे, पशुपक्षी, लता वेली, यांचा सुरेख संगम असलेले चित्र व चित्रावशेष आजही पहावयास मिळतात.



 निजामशाही भागातील मद्रास रेजिमेंट चा जॉन स्मिथ हा इंग्रज अधिकारी या परिसरात शिकारीसाठी निघाला होता. घनदाट जंगल, अनेक हिंस्त्र पशू यांचा मुक्त वावर असलेलेल्या परिसरात जॉन स्मिथ काही स्थानिक नागरीकासह वाघुर परीसरातील जंगलात आला.एका वाघाचा पाठलाग करत असतांना त्याला अजिंठा लेणी दिसली. नंतर जॉन स्मिथ ने या शोधाची माहिती ब्रिटीश सरकारला दिली. परिसराची साफसफाई , डागडुजी केल्यानंतर सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे भारतीय चित्रकलेचे दालन ,प्राचिन चित्रकलेचा ठेवा जगासमोर आला. लेणी क्रमांक ' दहामध्ये जॉन स्मिथने  एका चित्रावर स्वतःची सही व तारीख लिहिल्याचा पुरावा आजही पहावयास मिळतो.


१८२४ साली स्कॉटलंडमधील सर जेम्स अलेक्झांडर हा लष्करी अधिकारी अजिंठ्यातील लेण्यांना भेट दिली व त्याचे वर्णन लिहून ठेवले .त्यानंतर अनेक विदेशी अभ्यासक, पर्यटक स्थानिक अजिंठाला भेटी दिल्या. त्यात अनेक चित्राचे पापुद्रे, तुकडे स्मरण म्हणून घेऊन गेले. चित्रांवर नावे कोरून नासधुस केले. राल्फ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांने हे थांबविण्याचा प्रयत्न केला.१८३९ मध्ये बॉम्बे कुरिअर वृत्तपत्रात ब्लेक यांनी अभ्यासपूर्ण त्यावर आधारित लेख लिहिला .१८४३ मध्ये जेम्स फर्ग्युसनने अजिंठ्यातील लेण्यांचा अभ्यास केला .प्राचीन भीतीचित्राचे महत्त्व जाणून ,त्याचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने अजिंठ्यातील चित्रांच्या प्रतिकृती चितारण्यासाठी मद्रास रेजिमेंटचे मेजर  रॉबर्ट गिल या तरूण चित्रकाराची नेमणुक ब्रिटीश सरकारने केली. २९ मे१८४४ते १८६३या अजिंठ्यातील चित्रांच्या प्रतिकृती तयार केल्या.लंडन येथील सिडम हॅम मधील क्रिस्टल पॅलेसमध्ये ही चित्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दुर्देवाने क्रिस्टल पॅलेस ला आग लागली व तेथील जवळ जवळ सगळी चित्रे  जळून खाक झाली. 


१८७२ मध्ये जेम्स फर्ग्युसन व बर्जेस यांनी अजिंठ्यातील चित्राची प्रतिकृती करण्यासाठी  ते पुन्हा विनंती केली .जेजे स्कूल ऑफ आर्ट प्रमुख चित्रकार जॉन ग्रिफीत यांच्या नेतृत्वात भारतीय विद्यार्थीचित्रकारासह केलेल्या १२५ चित्रांच्या प्रतिकृती लंडनच्या साऊथ कॅनिंगस्टन मध्ये पाठविण्यात आल्या. १२जून १८८५ला त्याही म्यूजियमला आग लागली .तेथील ८७चित्रे जळाली. पुढे लेडी हेरिंगहेम व ईतर चित्रकारांनी अजिंठ्यावर काम केले. त्यांच्या चित्रांच्या आधारे अजंता फेस्कोज नावाचा ग्रंथ चित्रांच्या प्रतिकृती सह १९१५ला प्रकाशित झाला.अगदी अलीकडच्या काळात म्हणजे २०१९मध्ये डॉ.राधीका टिपरे यांचा अजिंठा संशोधनात्मक ग्रंथ कृष्णा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.


अजिंठ्याच्या चित्रकला व शिल्पकलेचा वैभवशाली वारसा जगाला आजही आकर्षित करतो. न सरणारा हा कलासागर हजारो वर्षानंतरही इतिहासकार, संशोधक, चित्रकार पर्यटक व विद्यार्थी यांच्याअभ्यासासाठी उपलब्ध आहे. चित्रे नामशेष होत असली तरी शिल्प रूपाने अजिंठ्याचे वैभव आजही जिवंत आहे.फोटोग्राफीच्या रूपात, ग्रंथरूपाने, इंटरनेटच्या माध्यमातून अजिंठा विश्वात समृद्ध ठरतो आहे. अजिंठा लेण्यातील भित्तीचित्रे छायाचित्राच्या माध्यमातून  पुनरूज्जीवीत .करणाऱ्यासाठी अतोनात कष्ट करणारे नाशिकचे छायाचित्रकार, चित्रकार संवेदनशील विचारवंत कलाकार प्रसाद पवार, धुसर होणाऱ्या अजिंठ्यातील चित्राच्या प्रतिकृती समाजमनापर्यंत पोहोचविणारे औरंगाबाद येथील एम.आर. पिंपरे व विजय कुलकर्णी सारख्या आधुनिक चित्रकारांचे कार्य व योगदान अजिंठा जतनाच्या अनुषंगाने अतूलनिय आहे.


 प्रसिद्ध अजिंठा लेणीच्या शोधांला आज २०३पूर्ण झालेले आहेत.१९८३ पासून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या अजिंठ्याचे जतन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाने घेतली असली तरी. समृद्ध परंपरेच्या भारत देशाचा नागरीक म्हणून आपलाही तेवढीच जबाबदारी ठरते.




- मिलिंद पुंडलिकराव जाधव

( कलासक्त शिक्षक, जि.प. नांदेड ) ९४२३९०२४५४

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)