युगप्रवर्तक माता सावित्रीबाई

शालेयवृत्त सेवा
0

 


 

फुले इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली! इंग्रजी वैखरी,बहुजनांची!! इंग्रजी शिकूनी, जातिभेद मोडा! फेकुनिया, भट भारूडा!!  असा क्रांतिकारी संदेश देणाऱ्या क्रांती माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे  पाटलांच्या कुळात  झाला व अवघ्या नवव्या वर्षीच त्यांचा विवाह युगप्रवर्तक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.१८४० पासून त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. 


अज्ञान, अंधार, आत्मनाश, संपवण्यासाठीच महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे  महायुद्ध पुकारले त्यात सावित्रीबाईने उडी घेतली. आपल्या संसाराचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजली. म्हणून म्हणावेसे वाटते जीवन तर सारेच जगतात, त्यात थोडा सुगंध वाहू दे.जे चंदनाप्रमाणे झिजतात, त्यांचे जीवन कीर्तिमान होऊ दे. अशा कीर्तिमान दाम्पत्यांनी सांगितलं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या देशात सर्व अनर्थ एका अविद्येने केला आहे. हे कटू सत्य महात्मा फुले यांनी ओळखून १८४८ मध्ये पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व माता सावित्री या देशाची पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली . 


मनुवादाने बरबटलेल्या नराधमाने सावित्रीच्या अंगावर शेण,विष्ठा टाकून त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण सावित्रीने हा तर माझ्या कार्याबद्दल केला जात असलेला  फुलांचा वर्षाव आहे असे सांगून समतेचा ज्वालामुखी आपल्या ह्रदयात धगधगता ठेवला. जोतीरावाने १ मे १८४९ रोजी पुणे येथे प्रौढांच्या  शाळेची स्थापना केली.तेथेही सावित्रीने अध्यापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली. पुढे पुणे, सातारा, नगर जिल्ह्यात समाजजागृतीसाठी स्थापन केलेल्या काही शाळांमधून सावित्रीने शिक्षिकेची भूमिका पार पाडून आपले  कर्तव्य पूर्ण केले.१८५२ मध्ये जेव्हा शाळांची तपासणी झाली तेव्हा सावित्रीबाईंना आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय मिळाला. 


म्हणून १२ जानेवारी १८५३ रोजी मेजर कँडी यांच्या हस्ते फुले दांपत्याचा विश्रामबागवाड्यात गौरव करण्यात आला. या प्रेरणेनंतर सावित्रीबाई व ज्योतिबा पेटून उठले. ही घटना मात्र पुण्यातील कर्मठ लोकांसाठी वेदनादायी ठरली  आणि त्यांनी ज्योतिराव फुले यांना ठार करण्याचा घाट घातला. त्यासाठी त्यांनी रोडे रामोशी व धोंडीबा कुंभार यांची नियुक्ती केली पण त्यांचा तोही बेत  फसला  त्यानंतर मात्र रोड्या रामोशी व धोंडीबा कुंभार हे सावित्रीबाई फुले यांचे अंगरक्षक बनले. ते सावित्रीबाईला शाळेपर्यंत नेऊन सोडत व पुन्हा सावित्रीबाईला घरी आणून सोडत. 


धोंडीबा कुंभाराने  तर पुढे वेदाचार नावाचा ग्रंथ लिहून मोठा चमत्कार केला. 


सन १८५२ मध्ये ज्योतीबांनी अनेक  शाळा काढल्या त्यांच्या लग्नाला दहा-बारा वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे नातेवाईक मित्र शेजारी पाजारी यांच्यात चर्चा सुरू झाली. नातेवाइकांत एक विचार सुरू झाला की ज्योतिबाला दुसरी बायको करून द्यावी. मग एक दिवस सावित्रीबाई ज्योतिबांना म्हणाल्या स्वामी आपलं लग्न होऊन आता १०-१२  वर्ष झाली आपणाला काही आता  मूलबाळ होत नाही, तेव्हा ज्योतिबा सावित्रीला म्हणाले म्हणजे म्हणायचय काय तुला?सावित्री म्हणते आपला वंश बुडून जाईल म्हणून तुम्ही एक काम करावं की  तुम्हाला आता दुसरी पत्नी करून द्यावी असे मला वाटते.  तेव्हा ज्योतिराव म्हणतात सावित्री कदाचित तो दोष माझ्या मध्ये असेल तुझ्यातच असेल असं कशावरून तर मग तुला जर दुसरा सवता करून दिला तर नाही का चालणार ? म्हणजे एवढी समता, एवढी मनाची व्यापकता फुल्यांकडे होती. 


पुढे या दाम्पत्याने काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतलं व शिकून डॉक्टर केले.१८६८  मध्ये अस्पृश्य लोकांसाठी ज्योतिबा व सावित्रीने आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. सावित्रीबाई हाडाच्या शिक्षिका होत्या. समाजाच्या सुखदुःखाची त्यांना जाणीव होती. सामाजिक जीवनात कार्य करताना त्यांना आढळून आले की या देशातील शूद्र-अतिशूद्र समाज हा व्यसनांचा गुलाम आहे. या व्यसनांच्या राक्षशी मगरमिठीतून हा समाज सोडवल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही.


 व्यसने कशी घातक आहेत हे सांगताना त्या म्हणतात व्यसनापासून माणसाची बुद्धी भ्रष्ट होते व माणुसकी नष्ट होते. तस्मात व्यसन हे मनुष्याची प्रतिष्ठा वाढविणारे नसून मनुष्यत्वास बाधा आणणारी   खोड आहे. यास्तव विलंब न करता सत्वर सोडून द्यावी. कोणत्याही व्यसनाने मनुष्याचा विचार पिंड धुंद होतो.व्यसनाच्या कैफात तो आपले मनुष्यत्व विसरून जातो. व कैफाच्या धुंदित मी कोण? माझी योग्यता काय? हे त्यास समजत नाही. दारूपायी उसळी गावच्या पाटलाची कशी वाईट अवस्था झाली हे त्यांनी या भाषणात सांगितले. अंधश्रद्धेवर प्रहार करताना त्या म्हणतात धोंडी मुले देती! नवसा पावती, लग्न का करती! नारी नर! सावित्री वदते! करूनी विचार, जीवन साकार! करूनी घ्या दगडाचे देव जर मुलांना जन्माला घालत असतील तर महिलांना पुरुषांशी लग्न करण्याची गरज काय?  असा जळजळीत प्रश्न सावित्री या ठिकाणच्या व्यवस्थेला विचारते. कर्ज घेऊन व्र्यर्थ  उधळपट्टी करणे,वृथावैभवाचा आभास निर्माण करणे किती चुकीचे आहे हे त्यांनी कर्ज या विषयावरील भाषणातून स्पष्ट केले आहे.


शेटजीचे कर्ज जो घेई. तयाचे सुख दूर जाई. संकटाने हैराण होई बेजार होई कर्जदार!! कर्जाने लागत असे चिंता. घालवावी सारी मालमत्ता. संसारात वाढवी गुंता आली अहंता ऋणकोची.

 शहाण्याने कर्ज काढू नये असे  का म्हणतात, ते त्यांनी साधार स्पष्ट केले आहे. काही लोक कर्ज काढतात व आपल्या अंगचे उद्योग, चातुर्य, धाडस, बुद्धी, पराक्रम, उत्साह हे षडगुण हरवून बसतात. सदाचरणावर बोलताना सावित्रीबाई म्हणतात, सदाचरण हे मनुष्यास अधिक सुख प्राप्त करून घेण्याचे वृत्त आहे. या वृत्तामुळे सर्व संसार दुःखाचा नाश होतो. सावित्रीबाई ह्या बोलक्या नाही तर कर्त्या सुधारक होत्या. त्या कठोर राष्ट्रभक्त होत्या. जेव्हा पुणे परिसरात १८७५ ते १८७७  दरम्यान सतत दुष्काळ पडला होता.शेकडो  मुले अन्न अन्न करून तडफडून मरू लागले तेव्हा ज्योतीबाने ५२ आन्नछञे उघडून आंधळे पांगळे व लहान मुले यांना सतत जेवण दिले. धनकवडी येथे एक अन्नछञ उभारले व त्याची सर्व जबाबदारी सावित्रीने स्वतः वर घेतली. 


अनेकांना भूकबळी पासून वाचवले. तिथे ती स्वतः भाकरी करून खाऊ घालत असे. रोज दोन हजार भाकरी तयार करून वाढल्या जात यासाठी सावित्रीबाई कधीही थकल्या नाहीत. ज्योतिराव फुले१८८८ मध्ये पक्षाघाताने आजारी पडले. अर्धांगवायू झाला. तरी या काळात त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचे पुस्तक डाव्या हाताने लिहिलं. किती ओबीसी ने ते पुस्तक वाचलं ? ज्योतिबांना वाटायचं बहुजन समाज शिकला तर काय वाचणार ? पोथ्या-पुराणं जे त्यांच्या गुलामी साठी  लिहिलीत म्हणून ज्योतिबा व सावित्रीने साहित्य निर्माण केलं. २८ नोव्हेंबर १८९० ज्योतिरावांवर काळाने झडप घातली. सावित्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला.


 ज्योतिबाला अग्नी कोणी द्यायचा हा वाद सुरु झाला. कारण ज्योतीबाने सावित्रीला सांगून ठेवले होते, ज्या लोकांनी मला विरोध केला त्यांना माझ्या देहाला हात सुद्धा लावू देऊ नको. त्यावेळी ज्योतिबाचे भाऊबंद वारसा हक्क सांगत.बाबा फुले व माहदबा फुले भांडण करू लागले. तिरडीला खांदा देण्यासाठी व अग्नी देण्यासाठी यशवंत हा आमच्या वंशाचा नाही असे म्हणू लागले व वाद निर्माण झाला. तेव्हा सावित्रीने पोलिसांना बोलून त्यांना हाकलून दिले व स्वतः सावित्रीने गाडगे हातात धरले व पतीच्या चितेला अग्नीही दिला. ही धर्म ग्रंथानी निर्माण केलेल्या रूढी-परंपरेच्या गालावरची जबर चपराक होती. 


१८९६ च्या दुष्काळातून लोक सावरत असतानाच १८९७ पुण्यात प्लेग ने हाहाकार माजवला. अनेक लोक प्लेग ने मृत्युमुखी पडत होते.अशा परिस्थितीत सावित्रीमाईनी डॉक्टर यशवंतला नोकरीवरून सुट्टी काढून बोलावून घेऊन 'उपचारकॅम्प' सुरू केला.त्या स्वतः ही घराघरात,झोपडी-झोपडीतून लोकांना आधार देत होत्या. रोग्यांची शुश्रूषा करत होत्या. अशातच मुंढवा गावच्या पांडुरंग बाबाजी गायकवाड या प्लेगची लागण झालेल्या मुलाला स्वतः पाठीवर उचलून दवाखान्यात घेऊन आल्या.त्यातच त्यांनाही त्याचा संसर्ग होऊन प्लेगची लागण झाली.अशातच १० मार्च १८९७ ला रात्री ९ वाजता क्रांतीज्योती सावित्रीमाईची प्राणज्योत मालवली. अशा या महान क्रांती मातेस त्यांच्या स्मृतिदिनी  कोटी कोटी प्रणाम !


लेखक  - शंकर नामदेव गच्‍चे

(एम.ए.बी.एड्.) जि.प.प्रा.शा.वायवाडी 

ता.हिमायतनगर जि.नांदेड  

मोबाईल नंबर-  ८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)