समाजशिल आद्य कवयित्री : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

शालेयवृत्त सेवा
0

 

 (चीत्र सौजन्य : प्रसिद्ध चित्रकार बळी खैरे / यवतमाळ)


देशाच्या इतिहासात महिलांच्या कार्यांचे अनमोल योगदान लाभलेले आहे. तशी स्त्रीची बरोबरी विश्वात कोणीही  करु शकत नाही. तर तिच्या उपकाराची परतफेड सुद्धा करणे शक्य नाही. करण ती विश्वाची जननी आहे. रणांगणावर लढण्यापासून ते जीवनाची पहिली सुरुवात करणारा गुरुच श्रेय सुद्धा तिलाच जाते. अस म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक स्त्रीच असते.

ती महान शिक्षणाची गंगोत्री आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.


सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या शिक्षिका, सामाजिक सेविका, स्त्री शिक्षणाची जननी,आणि पहिल्या प्रसिद्ध कवयित्री होत्या.


याठिकाणी त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास आपल्या समोर ठेवायलाच मला आवडेल. सावित्रीबाई फुले यांच्या काव्यरचनेचा आढावा घेतला तर उपलब्ध साहित्यांपैकी दोन काव्य संग्रह आढळतात. एक 'काव्य फुले' आणि दुसरा ' बावन्नकशी सुबोध रत्नाकर' हे होय. पहिला १८५४ मध्ये  तर दुसरा १८९२ साली प्रकाशित झाला. 'काव्यफुले' यामध्ये सावित्रीबाईं फुले यांनी बारा ओळींची प्रास्ताविका जोडलेली आहे. त्यात त्या म्हणतात, मी शब्दांची सुमने माळीत ओवीत आहे.याच्या आस्वादाने वाचकांच्या अंतरी शांतीरसाची निर्मिती होईल. यातून त्यांनी दलित पिडीत, बहुजनांना शिक्षणामृत पाजून पिढ्यानपिढ्या झोपेत असलेल्या समाजास जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो सफलही झाला आहे. त्या आपल्या कवितेत म्हणतात,


ज्ञानदाते इंग्रज आले विद्या शिकून घ्यारे।

ऐशी संधी आली नव्हती हजार वर्षे रे।।

राज्यात बळीच्या आम्हा विद्या घडो।

यशाची आमच्या दुंदभी नगारे झडो।।

असे गर्जूनी विद्या शिकण्या

 जागे होऊन उठा।

परंपरेच्या बेड्या तोडून शिकण्यासाठी उठा।।


'बावन्नकशी सुबोधरत्नाकर' हा जोतीराव फुले यांच्या गौवरार्थ लिहलेला काव्यग्रंथ होय. पण तरीही त्यामध्ये आर्यांच्या आगमनापासून पेशवाई पर्यंतचा इतिहास शब्दबद्ध केलेला आहे.तसा तो सहा भागात विभागलेला आहे. त्यात दस्यूच्या  कार्याचा व शौर्याचा गौरव,आर्यांच्या संस्कृतीचा इतिहास, शिवशाहीचा गौरव,पेशवाई आणि आंग्लाई याचे सुंदर वर्णन केलेले आहे.


हे दोन्ही काव्यग्रंथ वाचकांचे प्रबोधन करतात. समाधान देतात तर अनिष्ट रुढी परंपरेच्या चक्रव्यूव्हातून बाहेर काढतात.


यातून पिवळा चाफा,जाईचे फुल,जाईची कळी,गुलाबाचे फुल,फुलपाखरु आणि फुलाची कळी,मानवसृष्टी, सामाजिक काव्यात शिकणेसाठी जागे व्हा,मनु म्हणे,शूद्रांचे दुखणे, ईंग्रजी माऊली, शुद्र शब्दाचा अर्थ,बळी स्तोत्र,तयास मानव म्हणावे का,अज्ञान, सावित्री, जोतिबा संवाद. प्रार्थना काव्यात प्रास्ताविका, अर्पनिका,शिवप्रार्थना, शिवस्तोत्र,स्वागतपरपद्य आणि ईशस्तवन.


तसेच तेच संत,श्रेष्ठ धन, बाळास उपदेश, नवल, बोलकी बाहुली, इंग्रजी शिका  आणि सामाजिक संवाद. महत्त्वाचे काव्य छत्रपती शिवाजी आणि राणी छत्रपती ताराबाई हे प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी काव्य वाचकांना वाचायला मिळते.


सावित्रीबाईंनी जोतीराव फुले यांच्या कार्याची महती सांगताना त्या म्हणतात,


काळरात्र गेली ।अज्ञान पळाले

सर्वा जागे केले।या सुर्याने।।

शुद्र या क्षितिजी। जोतिबा सूर्य

तेजस्वी अपूर्व। उगवला।।


सावित्रीबाईंनी जोतीरावांसाठी हे काव्य अर्पिले असले तरी त्यातून जनकल्याण ही साधले आहे. त्यांनी काव्यासाठी वापरलेली भाषा मराठीच आहे. एकतर त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला आणि साधी सुलभ वाचणाऱ्या प्रत्येकास ती समजेल अशी भाषा वापरून वाचकांना समृद्धी कडे घेवून जाते. त्यातील आषय वाचकांचे भावविश्व बदलून मनोरंजनातून जागृतीकडे घेवून जाते. तसेच ती वाचकांना प्रेरणा देवून प्रभावित करते. मानवता,बंधुभाव, समता, न्याय ही मूल्ये शिकवून जाते.


'तयास मानव म्हणावे का'या काव्यात मानुसकीची जाण करुन देताना सावित्रीबाई म्हणतात,


ज्ञान नाही विद्या नाही

ते घेणेची गोडी नाही

बुद्धी असूनी चालत नाही

तयास मानव म्हणावे का


दुसऱ्यास मदत नाही

सेवा त्याग दया माया नाही

जयापाशी सद्गुण नाही

तयास मानव म्हणावे का


आजही महत्त्व पूर्ण त्यांचे वैचारिक कार्य आपणास स्फुर्तीदायी आहे. यापुढेही ते समाज मनाला दिपस्तंभासारखेच असेल, हे निर्विवाद सत्य.


अशी ही महान कवयित्री, जोतीरावांची सहचारिणी, कार्यकर्ती,स्त्रीशिक्षणाची जननी,समाजसेविका जीवनभर समाज हितासाठी लढली,जगली आणि समाजमनात व स्त्रीजीवनात  स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवून इतिहासात आपले कार्य सुवर्ण अक्षरात लिहणारी क्रांतीज्योती सावित्री शिवाय दुसरे कोणीही नाही.


आज १० मार्च हा सावित्रीबाईंचा स्मृति दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..


- बाबुराव पाईकराव

डोंगरकडा मो. 9665711514

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)