जीवनमनाच्या स्मृती जागवणारा : सांगाती

शालेयवृत्त सेवा
0

 



पती पत्नी म्हणजे जीवनात संसाररथ ओढणाऱ्या रथाची दोन चाके होत. सुखदुःखाचा सामना करीत आयुष्याच्या पैल तीरावर ते आपला रथ घेवून जात असतात. पण याच संघर्षात जर रथाचे एखादे चाक  आखातून अचानक निघून गेले तर हा रथ ओढत पैलतीरावर घेवून जाण्यासाठी जीवाची ओढाताण करावी लागते. तर जीवनभर  दुःखाचा पर्वत चढून पार करावा लागतो.आणि त्याच संघर्षाची आठवण करून देणारा 'सांगाती' हा काव्य संग्रह होय.तो कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांनी पुस्तक रुपाने वाचकांसमोर ठेवलेला आहे.


नुकतेच त्यांचे पती अँड.सिकंदर शेख यांचे दुःखद निधन झाले. कवयित्रीने पतीच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी त्यांच्या प्रित्यर्थ सांगाती हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. याच वेगळेपण  म्हणजे हा दोन विभागात विभागला गेलाअसून तो मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेतून लिहिला आहे. त्यामध्ये एक चारोळी आणि काव्यगुंफण केलेली आहे. याचे सुंदर  मुखपृष्ठ दिलीप दारव्हेकर या सुप्रसिद्ध चित्रकाराने चित्रीत केले आहे. विशेष सांगायचे झाले तर शेख कुटुंबीयांच्या वेलीवरील फुले म्हणजे अमेया आणि अरबाज यांनी या चित्राची संकल्पना मांडली आहे. म्हणून पुस्तकाचे मुखपृष्ठच अधिकच बोलके झाले आहे. पुस्तकास साजेसं आणि समर्पक अस चित्र लाभले. त्यात पतीपत्नीचे छायाचित्रे पाहून आतील काव्याचा नक्कीच अंदाज येतो.


पुस्तकाची पाठराखण प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी कमी शब्दात व्यापक अर्थ सांगणारी अशी सुंदर केलेली आहे. तर पुणे येथून वेदांत प्रकाशनने त्यास योग्य न्याय देवून वाचकांसाठी खुले केले आहे.


  पहिल्याच पानावर अँड.सिकंदर शेख यांच्या छायाचित्राखालील चारोळीत कवयित्री अनिसा सिकंदर  म्हणते,


नजरसे दुर सही,दिल के पास हो।

बिखरे जिंदगी में जीने की आस हो।।


या ओळी अंतःकरण हेलावून टाकणाऱ्या आहेत. यातून दोन जीवाच प्रेम जिव्हाळा आणि त्यामध्ये काळाने केलेली दोन जीवाची ताटातूट जाणवते. कवयित्री अनिसा सिकंदर एकाकीपण भरुन काढण्याची आस पतीच्या आठवणीतून घेते. तर पतीच्या स्मृतितूनच ती आजही जीवन जगतांना एक आत्मिक आधार घेताना दिसते. जणू लेखणीत लिहण्याच बळ ती आपल्या पतीकडूनच घेते. तसेच सोबत जोडलेली विविध सुखद  छायाचित्रे आजही आठवणी जागवते.


 प्रथम पानावरील सुरुवातच शिर्षक चारोळी ही पतीनिष्ठेची जाणीव करुन देत साश्रूनयनांनी ती आठवणीत चिंब भिजून जाते. ती म्हणते,


तुच माझी आस

तुच माझा श्वास

तूच माझ्या संसाराचा

सुखकर प्रवास


या चारोळी संग्रहात बहुतांश काव्य हे पतीच्या आठवणी, सहवास, प्रेम,त्यांचे उदात्त कार्य, दुःख, विरह या विषयी दिसून येते. 

पतीच्या जीवन इतिहासाची महानता या चारोळीतून कवयित्री सांगते..


सखा माझा शिस्तीचा

घराची आहे शान

गरजवंताला मदत करतो

मला त्याचा सार्थ अभिमान



यासोबतच कवयित्रीने विविध सर्वच विषय हाताळलेले आहेत. म्हणून हे पुस्तक कधी हसवते, रडवते, रमवते,शिकवण देते आणि विचारही करायला लावते. हे करुणामय जीवन जगत असताना कवयित्री समाजमनाचा वेध घेताना दिसते. जगण्याबरोबरच शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हेही ती सांगते.तिच्यामते शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कारण जीवनाला योग्य वळण हे शिक्षणामुळेच मिळत असते.

हे सांगताना कवयित्री म्हणते.


गुरु देई आम्हा ज्ञान

शाळा ज्ञानाचे भांडार

मिळे शाळेत शिक्षण

होते जीवन साकार


कवयित्रीने एकापेक्षा एक अशा सुंदर व्यापक कल्पना अतिशय मोजक्या शब्दात म्हणजेच चार ओळीत शब्दबध्द केलेल्या आहेत.

यातून गुंफन,श्वास, जीवलगा, मन, विरह, खळी, सुसंवाद, हिररांझा, वचन, टिपूर चांदणे, स्पर्श, गोडवा, विश्वास, स्वातंत्र्य, दैवत छत्रपती, एकात्मता, शिक्षण, ज्ञानाचा मार्ग, माता रमाई, आम्ही लेकी, पर्यावरण, वारा,धारा, श्रावण,हुरहूर, सखा, शेतकरी, पाणी, गंध मातीचा, अंधश्रद्धा, नंदन,राख,जागर,शुक्राची चांदणी,भान,मोबाईल, पाऊलखुणा, शहीद,-हास, ममता, जाणीव, सत्य, उपेक्षा, पुण्यवान, कर्म,उपकार, प्रतिबिंब, कौतुक, सावित्री, फतिमा,धरित्री, घायाळ, संवेदना, सुख रेशीमगाठी, विवेकबुद्धी,जिजाऊ आणि कातरवेळी अशा रसदार प्रतिभाशाली, रुपकआणि प्रतिकांनी भरलेल्या एकशे तेरा चारोळ्यांचा हा संग्रह आहे.


कवयित्रीचे बालपण ग्रामीण भागात गेल्यामूळे शेतकऱ्यांच्या कष्टांना तिने जवळून अनुभवले आहे. म्हणूनच ती म्हणते..


राब राबतो शेतात

शेतकरी देशाची शान

कष्टाने धान्य पिकवतो

करा त्यांचा सन्मान



राष्ट्रमाता जिजाऊ, शिवराय,सावित्री,फतिमा रमाई, फुले,शाहू,आंबेडकरी विचारांना कवयित्री भारावून जाते.  वाचकांना राष्ट्रप्रेमाचा सुंदर बोध करते.तर मैत्री, बंधुभाव आणि एकतेचा संदेशही देवून वाचकांस जागर करायला भाग पाडते.


जात धर्म मिटवून

करु सर्वांचा आदर

भारतीय संस्कृतीचा

चला घालूया जागर


याबरोबरच  या संग्रहात काही भाग कवितेचा ही आहे. त्यात वाचक प्रेमकाव्यांचा मनमुराद आस्वाद घेवू शकतात.

एका अष्टाक्षरी रचनेत कवयित्री म्हणते..


रुप तुझं गंं दखणं

माझ्या -हदयी भरलं

नाक तुझ धारदार

माझ्या मनात कोरल

 

रुप तुझे बघताना

धुंद स्वप्नात रंगलो

गेलो प्रितीत न्हाऊन

भान विसरून गेलो.


तर काव्यसंग्रहाचा समारोप वाचकांच्या डोळ्यात आसवे उभं करतो.

 

ऐन बहारात आलेली अंगणी फुले सुकली

आधाराच्या सावलीला कायमचीच ती मुकली

जीवनात त्यांच्या रे होते आनंद फुलवायचे

भावनांनी दाटले पसरले धुके आठवांचे


'सांगाती' हा  कवयित्री अनिसा सिकंदर यांचा समग्र काव्यसंग्रह अंतःकरण खुलवित काळजाचा ठाव घेतो. सर्व वयोगटातील वाचकांना रममाण करणारा आणि एक बोधपर संदेश देवून जाणारा आगळा वेगळा वाचणीय संग्रह होय. साहित्य रसिक याचे स्वागतच करतील. हे नक्कीच!

  कवयित्रीस पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..


बाबुराव पाईकराव

समीक्षक

डोंगरकडा जि.हिंगोली.

9665711514

----------------------------------------


चारोळी काव्य संग्रह-  सांगाती

कवयीत्री- अनिसा सिकंदर शेख

मुखपृष्ट- तुषार निवंडीकर

प्रकाशक- सौ.सुप्रिया कुलकर्णी

प्रथम आवृत्ती- १५ सप्टेंबर २०२१

मुल्य- *७०/-

फोन- ९२७००५५६६६

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)