विविध उपक्रमांच्या आयोजनाने किनवट मध्ये जागतिक महिला दिन सप्ताह साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :

आजादी का अमृत महोत्सव व जागतिक महिला दिनानिमित्त दि. 2 ते 8 मार्च दरम्यान किनवट पंचायत समिती सभागृहात  महिला सप्ताह "उत्सव स्त्री जाणीवांचा" विविध उपक्रमांच्या आयोजनाने साजरा करण्यात येत आहे.


        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये दररोज सकाळी शालिनी सेलूकर ह्या झुंबा नृत्य व रेखा उबाळे योगाभ्यास घेताहेत. दररोज एका विषयावर मार्गदर्शन या मालिकेमध्ये साहित्याची जाण या विषयावर स्वाती तांडे , मासिक पाळी या विषयावर ज्योती रावते , महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. वंदना पत्की आणि महिला संरक्षण व कायदे या विषयावर ऍड. दीपाली सोनकांबळे यांनी मार्गदर्शन केले. शाळा स्तरावर दोन गटात निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.


           महिलांसाठी  रांगोळी व पाककला स्पर्धां घेण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या नेतृत्वात शिक्षिका, ग्रामसेविका,अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व इतर सर्व महिला कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा शिक्षिका रियाजरिन सय्यद इक्बाल व पंचफुला देशमुखे यांच्या नेतृत्वात क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व उत्तम कानिंदे  यांची उपस्थिती होती.  


          या स्पर्धेतील विजेते असे : गोळा फेक : प्रथम-  मीना पांढरे ग्रामसेविका, द्वितीय- शाहीन बेग शिक्षिका, संगीत खुर्ची : प्रथम- शाहीन बेग द्वितीय- प्रिती पोलावार , वेगाने चालणे : प्रथम- वर्षा कांबळे ग्रामसेविका, द्वितीय-पुण्यरथा उमरे व उत्तेजनार्थ-सविता राठोड

         या सर्व कार्यक्रमाच्या समन्वयिका म्हणून वर्षा कुलकर्णी, रूपाली तेलंग, पुण्यारथा उमरे, रेखा उबाळे व शालिनी सेलूकर ह्या काम पाहत आहेत.


         मंगळवार (दि. 8 ) रोजी सकाळी साडे अकरा वाजता पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती सभापती हिराबाई लक्ष्मण आडे यांच्या अध्यक्षतेखाली  महिला दिन सप्ताहाचा समारोप समारंभ आयोजित केला आहे. यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव (विषय : सर्वांगीण उन्नतीसाठी महिलांचे कर्तृत्व ), सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके (विषय : महिला चळवळ काल , आज व उद्या) व  पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके (विषय :महिलां पुढील आव्हाने व उपाय) हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)