जिजाऊ - अहील्या - सावित्री - रमाईच्या आम्ही लेकी !

शालेयवृत्त सेवा
0

 




माँ जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्री,रमाईच्या आम्ही  लेकी, शिकायचं आहे आता आम्हाला जरी लावली  समाजाने डोकी! आत्मनिर्धाराने  आम्ही जगणार, सदाचाराने समाजात वागणार. हक्कासाठी सन्मानानं लढणार वाईट रूढीविरुद्ध आम्ही भिडणार. या देशाच्या व्यवस्थेनं सांगितलं न स्त्री-स्वातंत्र्य महर्ती. म्हणजेच स्त्रीन स्वतःचं डोकं वापरायचं नाही लहानपणी पित्याच्या ताब्यात  राहायचं. मोठेपणी पतीच्या आधीन राहायचं.म्हातारपणी मुलाच्या आधीन राहायचं. तिने स्वतःचं डोकं वापरायचं नाही. तिने विचार तर मुळीच करायचा नाही. कारण मनुस्मृतीन सांगून ठेवलं की स्त्री ही मरेपर्यंत गुलाम असली पाहिजे स्त्री ही भोगवस्तू आहे. ती दासी आहे ती गुलाम आहे. ती चंचल आहे तिला बांधून ठेवलं पाहिजे. आमच्या देशाच्या धर्मग्रंथांनीही हेच सांगितलं.


रामचरित्र मानसमध्ये तुळशीदास म्हणतात ढोल, गवार पशु, शूद्र, नारी ये सब ताडनके अधिकारी. म्हणजेच काय तर ढोल म्हणजे वाजवायचं वाद्य, गवार म्हणजे अडाणी लोक,पशु म्हणजे प्राणी शूद्र म्हणजे धर्मव्यवस्थेने ठरवले लोक आणि नारी हे ठोकण्याच्या लायकीचे असतात. बडवण्याच्या लायकीचे असतात.



 या सर्व स्त्रियांना मान, सन्मान देण्याचं काम माझ्या जिजाऊ ने केले, तेच काम शिवरायांनी केले. तेच काम अहिल्यादेवींनी केले,सावित्रीने केले. पण तरीही स्त्री मुक्त झाली नव्हती तर सर्व स्त्रियांना मुक्ती देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कोणत्याही  देशाची प्रगती ही त्या देशातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील  स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्याचे प्रणिते आहेत. हे या देशातील स्त्रियांनी लक्षात ठेवावे.



या देशातील स्त्रियांना मुक्त कोणत्याही देवदेवतेने केले नाही. कोणत्याही बुवा, बापूंनी केले नाही. ही गोष्ट स्त्रियांनी आपल्या मेंदूत कायमची नोंदवून ठेवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व स्त्रियांना आपल्या पित्याच्या  संपत्तीत अर्धा वाटा दिला, पतीच्या संपत्तीत अर्धा वाटा दिला, महिलांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार दिला. स्त्री-पुरुष समतेचा कायदा केला. स्त्रियांना सहा महिने पगारी प्रस्तुती व बालसंगोपन रजा, सर्व कर्मचाऱ्यांना जीपीएफ, रविवारची सुट्टी या सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाल्या म्हणून आज या देशातील स्त्रिया मान-सन्मान, प्रतिष्ठेने जगत आहेत. आणि विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. आणि आपल्या उपकारकर्त्यांना शिवराय, जोतीबा, सावित्री-जिजाऊ,अहिल्या यांना विसरून कोणत्यातरी बुवा बापूच्या नादाला लागलेल्या आहेत हे मात्र दुर्दैव आहे. 



स्वराज्याला राजा मिळाला शूर आणि स्वाभिमानी जिजाऊचा प्रेरणेतून घडली शिवबाची कहाणी. जिजाऊने स्वराज्याचे स्वप्न नुसते  पाहिले  नाही तर  शिवरायांना प्रेरणा देऊन जुलमी सत्तेविरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली. नसत्या  जन्मल्या असत्या जिजामाता शिवरायही घडले नसते नाही दिली असती प्रेरणा शिवबाला स्वराज्यही उभारले नसते. जिजाऊच्या प्रेरणेतूनच स्वराज्याची निर्मिती झाली. जयावेळी १७ मार्च १७६७ रोजी मालेरावांचा मृत्यू झाला त्यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या दरबारात हिशोब लिहिण्यास असलेल्या गंगोबा तात्यांनी रघुनाथराव पेशवे यांना पत्र लिहून कळवले की होळकर यांच्या  शेवटच्या वारसदाराचा मृत्यू झालेला आहे. अहिल्यादेवी दुःखात आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याची हीच वेळ आहे. त्यावेळी पत्र पाठवून अहिल्यादेवी होळकर म्हणाल्या,तुम्ही जर मला हरवले तर महिलांच्या फौजेला हरवणाऱ्याचा समाजात फार गौरव, कौतुक होणार नाही पण आमच्याकडून जर तुम्ही हारल्या गेलात तर मात्र तुमची नाचक्की होईल. तुम्हाला जगात तोंड दाखवण्यास जागा राहणार नाही. अशा या स्वाभिमानी अहिल्यादेवी होळकर यांनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांना न्यायदान करत असत. अहिल्यादेवींनी स्त्री शासक बनवून स्त्री शक्तीची ओळख जगाला करून दिली. त्यांनी सुयोग्य प्रशासन चालून स्त्रीशक्तीची महती वाढवली. 



हेच काम स्वतःचा जीव धोक्यात घालून रूढी-परंपरा यांना  नाकारून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे या देशातील स्त्रीशिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवणारे दांपत्य होते. लोकांच्या शिव्या, शाप,शेण, दगड-माती झेलून ज्या सावित्रीने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला त्या क्रांतीमातेला  स्मरण्याचा   आजचा दिवस. स्त्रीने सती जावे, स्त्रीने राज्य करू नये,स्त्रीने शिक्षण घेऊ नये,अशा बुरसटलेल्य विचाराने समाज गढूळ झाला होता. तत्कालीन समाज चूल आणि मूल या विचारांच्या मोहपाशात गटांगळ्या खात असताना समाजाला त्यातून बाहेर काढणे म्हणजे एखाद्या विषारी कोब्रा नागावर जाणूनबुजून पाय ठेवण्यासारखे होते. या चालीरीती विरुद्ध जगणे तत्कालीन समाजात अशक्यप्राय होते. अशा काळात सावित्रीने हे वृत्त अंगिकारले आणि त्याच यज्ञामध्ये त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला. त्याच सावित्री मातेस आज महिला दिनी कोटी कोटी प्रणाम.



माता रमाई नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रकांडपंडित, ज्ञानाचा महासागर या जगाला दिसला नसता. रमाईच्या त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे दैदिप्यमान यश संपादन करू शकले. रमाई एक आगपेटी दोन महिने काटकसरीने वापरत. रमाई बाबासाहेब आंबेडकर परदेशात असताना प्रत्येक दिवशी फक्त ४ भाकरी बनवत. १ यशवंतला १ मुकुंदाला १ शंकरला आणि राहिलेली १ भाकर रमाई, लक्ष्मीबाई, आणि गौरी तिघे मिळून वाटून खात. किती हाल-अपेष्टा किती कष्ट याची जाणीव महिलादिनी आपल्या महिलांना असायला हवी. एका बॅरिस्टरची पत्नी गौवर्या थापून आपल्या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करीत होती. केवळ औषध पाणी न मिळाल्यामुळे चार-चार लेकरांना मूठमाती द्यावी लागली. या महानायिकेच स्मरण महिलादिनी आपल्या महिलांना झालं पाहिजे. रमाई सारखी काटकसर महिला दिनी आपल्या महिला शिकल्या तर महिला दिन साजरा केल्याच भाग्य आणि समाधान आपल्याला मिळेल. बॅरिस्टरच्या पत्नीला लुगडं नाही म्हणून फेटा नेसून बाबासाहेबांचा सन्मान सोहळा  पाहण्यासाठी गेलेली रमाई आपल्याला आठवली पाहिजे.



आज स्त्रियांनी संगीत, नाट्य,ग्रिर्यारोहन संगणक अशा सर्व क्षेत्रांमध्ये मुसंडी मारली आहे. आज दहावी बारावी परीक्षेचा निकाल पाहिला तर त्या परीक्षेमध्ये पहिली, दुसरी तिसरी येणारी मुलगीच आहे पण यातील अनेक पहिल्या-दुसऱ्या येणाऱ्या मुली उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत यावरही महिलादिनी चिंतन झाले पाहिजे. खेड्यात दहावी-बारावी झाली की त्यांचे आई वडील त्यांचे लग्न लावून देतात आणि फार मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात गावात मिरवतात. आपल्या मुलीचे पाऊल वाकडे पडेल या भीतीपोटी ते आपल्या मुलींना उच्च शिक्षणापासून रोखून ठेवत आहेत. यावर सुद्धा महिला दिनाच्या दिवशी गंभीर चिंतन होणे गरजेचे आहे.




लेखक - शंकर नामदेव गच्‍चे 

जि.प. प्रा.शा.वायवाडी ता.हिमायतनगर जि. नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)