परिपूर्णतेचा ध्यास घेत आत्मोन्नती साधा- शिक्षणाधिकारी सविता बिरगे

शालेयवृत्त सेवा
0

 


वाजेगाव बिटस्तरीय उपक्रम : धम्मदिना सोनकांबळे, पौर्णिमा अंकमवार, सारंग स्वामी, युसुफ खान यांना शिक्षक भूषण पुरस्काराने तर बशीर पठाण यांना विशेष अक्षर भूषण पुरस्कार


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षकांनी नेहमी परिपूर्णतेचा ध्यास घेत स्वतःचा विकास साधला पाहिजे. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केले पाहिजे. नेहमी इतरांकडून काहीतरी शिकण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे. मी जेव्हा शिक्षिका होते तेव्हा व्यंकटेश चौधरी माझे सहकारी शिक्षक होते. त्यांच्या सारखे सुंदर हस्ताक्षरातील सुविचार फलकलेखन मलाही जमायला हवे यासाठी मी नेहमी प्रयत्नरत असायचे. त्यासाठी मी त्यांना गुरुस्थानी मानले होते. अशाच प्रकारे स्वतः मध्ये निरंतर सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आत्मोन्नती साधण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करायला हवा असा मौलिक संदेश शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिला. त्या वाजेगाव शिक्षण विभागाच्या बीटस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.


कृतज्ञता मनुष्याच्या काळजाचा सुगंध असते. ती संपली की माणसाचे मनुष्यत्व लोप पावते. म्हणूनच आयुष्यभर विद्यार्थी हितासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांना गौरवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षर परिवारातील उत्कृष्ट शिक्षकांना दरवर्षी सृजनशील विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी शिक्षक भूषण पुरस्काराने सन्मानित करत असतात. यावर्षी देखील बीटमधील धम्मदिना सोनकांबळे (के प्रा शा वाजेगाव), पौर्णिमा अंकमवार (प्रा शा वडगाव), सारंग स्वामी (प्रा शा वांगी), युसुफ खान(के प्रा शा वाजेगाव) यांना शिक्षक भूषण पुरस्काराने तर बशीर पठाण(प्रा शा फत्तेपूर) यांना विशेष अक्षर भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.


याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची विशेष उपस्थिती होती. या ठिकाणी येऊन मला अतिशय भारावल्यासारखे होत असून येथील कौटुंबिक वातावरण पाहून, तसेच सर्व शिक्षक आपल्या विस्तार अधिकाऱ्याला माऊलीची उपमा देताना पाहून आनंदाचे डोही आनंदे तरंग ची भावना अनुभवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर शिक्षकांचा स्वाभिमान टिकवायला हवा.ह्या शिक्षक पुरस्काराचे हेच वैशिष्ट्य जाणवते आहे की येथे कुठलाही प्रस्ताव अथवा पुरावे न मागता शिक्षकांच्या स्वाभिमानाला जपत त्यांच्या कामाचे निष्पक्ष मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार म्हणजे अंतिम ध्येय नसून ही केवळ अल्प विश्रांती आहे. ह्या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली असून अजुन जोमाने काम करत रहा असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी सर्व शिक्षकांना दिला.


विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी माझ्या बीट मधील प्रत्येक शिक्षक या पुरस्काराचा मानकरी आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळे विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवित असतात. त्याचे श्रेय ते मला देतात हा त्यांचा मोठेपणा आहे. अशा गुणी शिक्षकांच्या सोबत काम करण्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव जाधव, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, मुदस्सर, रूपाली गोजवडकर, सीमा बोबडे, सादिया, सुमैय्या खुटानबुजे सर्व शिक्षक वृंद वाजेगाव यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कु. माहीन, कु. अंतरा तारु, कु. स्नेहा हटकर यांनी सुरेल स्वागतगीत गाऊन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी प्रास्ताविक दत्तप्रसाद पांडागळे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बाबुराव जाधव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)