अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीमुळे शिक्षण क्षेत्र नव्याने भरारी घेईल -शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

पंचसूत्रीच्या आधारे राज्याचा विकास साधताना मनुष्यबळ विकासाअंतर्गत शालेय शिक्षण विभागासाठी राज्याच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोविडच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या वर्षात शिक्षण क्षेत्र नव्याने भरारी घेईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. विभागासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची प्रा.गायकवाड यांनी दिली.


ई-गव्हर्नन्स प्रकल्पासाठी ३०० कोटी


सन २०२२-२३ या वर्षाकरिता ई-गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत रु. ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत ई- साहित्य वाटप, भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी उभारणीच्या खर्चाचा समावेश आहे.


प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण


राज्यात रचनावादी आणि दर्जेदार शिक्षणाचे बीज रोवण्यासाठी झटणाऱ्या गुणवंत आणि प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता रु. ७ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.


जवाहर बाल भवनला गतवैभव प्राप्त होणार


भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवनला एक समृद्ध असा वारसा आणि इतिहास आहे. येथे सर्व सोयी-सुविधायुक्त सुसज्ज अशा शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्राची आणि जागतिक दर्जाच्या म्युझियमची उभारणी केली जाणार आहे.


महापुरुषांच्या ऐतिहासिक शाळांचा विकास


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या जन्मगावाच्या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे अशा ऐतिहासिक/ महापुरुषांशी संबंधित शाळांमध्ये सोयी सुविधांच्या विकासासाठी प्रती शाळा एक कोटी रूपये इतका निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात दहा ऐतिहासिक शाळांचा विकास प्रस्तावित आहे.


आदर्श शाळांसाठी ३०६ कोटी


जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा, यासाठी आम्ही 'आदर्श शाळा' हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. २०२२-२३ साठी ३०६ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पायाभूत विकास


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्यांचे बांधकाम व इतर सोयी सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नियतव्ययापैकी ५ टक्के निधी यापुढे उपलब्ध होणार ही महत्वपूर्ण तरतूद या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


'स्टार्स' प्रकल्पासाठी १२० कोटी


राज्यात अध्यापन-अध्ययन प्रक्रिया आणि परिणाम अधिक मजबूत करण्याकरिता अमलात आणलेल्या स्टार्स (STARS) प्रकल्पासाठी रु. १२० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण हे अधिक विद्यार्थीभिमुख होईल.


अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी वाढीव निधी


अपघातग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेमध्ये लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेत भरघोस वाढ प्रस्तावित आहे. यासाठी १२ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीचे शाळेतील शिक्षिका निधी तांबे व शिक्षक विजय महाजन यांनी स्वागत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)