क्रांतिकारी संत रविदास

शालेयवृत्त सेवा
0

 



भारतीय समाजाचा विचार करता प्राचीन काळी वर्ण जाती व्यवस्थेची चिरेबंदी तटबंदी होती. ही वर्ण जाती व्यवस्थेची तटबंदी तोडण्याचा फारसा प्रयत्न कोणत्याच  वर्ण जातीतील व्यक्ती करू शकत नव्हती. म्हणून या काळात फारसे सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तन झाल्याचे दिसत नाही.इ.स.पू. पाचव्या ते सहाव्या शतकात तथागत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांनी आणि प्रस्थापित वैदिक  तत्वज्ञानाला विरोध करून मानवतावादी विचार, प्रज्ञा, शील ,करुणा, शांतता अहिंसावादी विचार मांडले आणि यातूनच मध्ययुगात विविध भक्ती चळवळी निर्माण झाल्या. भक्ती चळवळीने एकूणच मध्ययुगीन समाज ढवळून काढला. नवीन मूल्य विचारातून संत,महंत साधू पुरूष  उदयास आले. विशेष म्हणजे या काळात विविध वर्ण,जाती,पातीतून संतमहंत,मूनी निर्माण झाले.


यात काही धर्मांध अपवाद वगळता सर्वच बहुजन संत महंतावर  बौद्ध व जैन तत्त्वज्ञानाचा कमी-अधिक प्रमाणात प्रभाव आहे. जैन व बौद्ध धर्माचा उदय आणि र्हासानंतर  भक्ती चळवळीचा उदय झाला आहे.पण  या काळात बहुजन समाजात संत,महंत, साधू निर्माण झाले ते आपल्या जातीपुरते मर्यादित राहिले. कारण त्यांचे विचार कितीही समताधिष्ठित महान असले तरी भारतीय वैदिक धर्मानुसार त्यांचा जन्म खालच्या जाती  वर्णात  झालेला असल्यामुळे इतर उच्चजाती त्यांचे श्रेष्ठत्व स्वीकारताना दिसत नाहीत. म्हणून मध्ययुगात जरी भक्ती चळवळीच्या माध्यमातून विविध जाती वर्णनातून संत ,महंत,साधू उदयास आले असले तरी त्यांना त्यांच्या जाती पुरतेच मर्यादित ठेवले.म्हणून ब्राम्हण संत तुळशीदास म्हणतो,"पूजिए विप्र शील गुण ,ज्ञान हीना,न पुजिए शुद्र, शील,गुण,ज्ञान,प्रवीना".    तुलशीदास म्हणतात पुजिए विप्र म्हणजे भट(ब्राम्हण ) हा शीलवान नसला,गुणवान नसला,ज्ञानवान नसला तरी तो पुजनीय आहे.उलट शुद्र कीतीही शीलवान,गुणवान,ज्ञानवान असला तरी पुजन्याच्या योग्यतेचा नाही. हीच गोष्ट समर्थ रामदासानी दासबोधात सांगितली आहे.समर्थ रामदास म्हणतात,"

  गुरु तो सकाळशी  ब्राह्मण,

 जरी तो झाला क्रियाहीन"

म्हणजे समर्थ रामदास म्हणतात की ब्राम्हणाला कसलीच अक्कल नसली तरी तोच सर्वांचा गुरू असला पाहिजे. 

 

           याउलट संत रविदास म्हणतात -

 "रैदास  बामण मत पूजिए,जो होवे  गुणहीन!

पूजिए चरण चांडालके,जो होवे गुण परवीन !!"

           रविदास म्हणतात गुणहीन ब्राम्हणांची पूजा करू नका त्यांना आदरणीय मानू नका पण गुणप्रविण चांडाळ जरी असेल तर त्याची पुजा करा.असा रोख ठोक क्रांतिकारी विचार रविदासाने मांडला.


           अशा या महान संताचा जन्म  विक्रम संवत 1433 (इ.स. 1376) मध्ये उत्तर प्रदेशातील काशीजवळील मांडूर या गावी एका गरीब चर्मकार कुटुंबात झाला. त्यांच्या  बुद्धिमत्तेची हुशारीची चमक बालपणापासून दिसून येत होती. कुशाग्र बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी,प्रतिभा व ज्ञानग्रहण करण्याची क्षमता यांच्या जोरावर  विषमतेचे जातीयतेचे  चटके सहन करत कठोर परिश्रम घेऊन संस्कृतचा उर्दू ,फारशी, हिंदी ,गुजराती पंजाबी इत्यादी  भाषांवर प्रभुत्व संपादन केले.  ज्या काळात अस्पृश्य समाजाला ज्ञानार्जन करणे, वेद-वेदान्त ऐकण्याचा अधिकार नव्हता. विविध प्रकारचे निर्बंध घातले गेले होते अशा काळात संत रविदासांनी इतक्या भाषांचा अभ्यास करणे सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते शक्य करून दाखवले.



               संतांचे आंदोलन सामाजिक नीतिमत्तेच्या प्रस्थापनेसाठी होते. धार्मिकता आणि जातीव्यवस्था यांच्याशी संतांच्या आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता. धार्मिकतेमुळे  माणसे दैववादी बनतात; तर जातिव्यवस्थेमुळे संकुचित बनतात  तर सामाजिक नीतिमत्तेमुळे माणसे प्रयत्नवादी बुद्धिप्रामाण्यवादी आणि समताप्रिय बनतात. म्हणून संत रविदास आपल्या साखीमध्ये म्हणतात,

"जात-पात के फेर में उलझ रहे सब लोग!

 मनुष्यता को खा रहा,रैदास जातका रोग!! 

जात जात मे  जात है,ज्यों केले में पात !

रैदास माणूस न जूड सकै जब तक जात न जात !!" 

              जातीमूळे  माणसे जोडली जात नाहीत.तर तोडले जातात. म्हणून संत रविदासाने वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन उभे कले.संत रविदासाने संपूर्ण आयुष्य  वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी घालवले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोही संत रविदास यांच्या सन्मानार्थ आपला  'The untouchable' हा ग्रंथ संत रविदासांच्या नावे समर्पित केला आहे. 



             संत रविदास म्हणतात जन्माच्या आधारावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही.तर माणसाच्या कर्माच्या आधारावरूनच तो श्रेष्ठ कनिष्ठ ठरतो त्यासाठी ते म्हणतात,

               "रैदास जन्म के कारणे ,होता नही कोई नीच!!

नर  को नीच कर डाले है,ओछे करमो की कीच !!"

           असा जाती धर्मा पलीकडे जाऊन समता,मानवतावादी विचार रविदास मांडतात .जातपात विसरून सर्व मानवजात एकाच ईश्वराची लेकरे आहेत असा समतावादी संदेश देतात. असा संदेश यापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला होता. जन्मताच कोणी उच्च-नीच अस्पृश्य नसतो तो त्याच्या कर्मावरून ठरत असतो. असे  संत रविदास मानतात. त्यांचा जन्मसिध्दांतावर विश्वास नाही तर कर्मसिद्धांतावर विश्वास आहे. या जगात कोणतीच व्यक्ति मानव  उच्च - नीच  असू शकत नाही असे त्यांना वाटत होते.


             संत रविदासाचे  संपूर्ण  तत्त्वज्ञान खालील एकाच साखी म्हणून सांगता येईल.संत रविदास म्हणतात,

          " ऐसा चाहू राज मैं,मिले सभी को अञ !

छोटे बडे सम बसै,रैदास रहै प्रसन्न  !!"

              संत रविदास म्हणतात मला असे राज्य पाहिजे जेथे सर्वांना अन्न मिळण्याची शाश्वती आहे.सर्वांचा मान सन्मान केला जातो.लहान- मोठा उच- नीच असा भेदभाव नष्ट होऊन  समता प्रस्थापित होईल. तेथे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाचे राज्य असेल असे राज्य संत रविदास यांना हवे आहे.  हेच राज्य डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिप्रेरित आहे.


                आज एकविसाव्या शतकात देखील रविदासांना मानणारा समाज त्यांच्या विचारापासून दूर गेला आहे. पूर्वीच्या कर्मकांडात अडकून पडला आहे.त्यांना केवळ फायद्यापुरते  रविदास आणि त्यांच्या विचारांची आठवण होते. आजही समता परिवर्तनवादी विचार या समाजाने अजून फारसे  स्वीकारले  नाहीत  याची खंत वाटते. रविदासांच्या विविध विचारांचा विविधांगांनी विचार होण्याची गरज आहे. नवीन समतावादी मुल्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारांकडे आज पाहिले जावे त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन समाजाने पुन्हा एकदा फीनिक्स पक्षाप्रमाणे झेप घ्यावी  एवढीच अपेक्षा.



लेखक - शंकर नामदेव गच्‍चे 

(एम.ए.बी.एड् ) जि.प. प्रा.शा.वायवाडी 

ता.हिमायतनगर जि. नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)