त्यागमूर्ती माता रमाई

शालेयवृत्त सेवा
1

 




माता रमाई कडे केवळ एक व्यक्ती म्हणून पाहता येणार नाही. माता रमाई कडे एक स्त्री म्हणून पाहता येणार नाही. माता रमाई कडे फक्त आई म्हणून पाहता येणार नाही.माता रमाई कडे एक दुःखाचा महासागर म्हणून पाहवं लागेल. काळजाची एक कथा म्हणून पाहावे लागेल. काळीज चिरून टाकणारा  एक मर्मभेदी हृदय म्हणून पहावे लागेल. हे माता रमाईच वैशिष्ट्य आहे. 


 प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या  मागे एक स्त्री असतेच हे इतिहासाने सिध्द केलं आहे.मग ती आईच्या  रूपात, पत्नीच्या रूपात, बहिणीच्या रूपात आजपर्यंत त्यांच्या ऋणातून कोणीही मुक्त झालेलं नाही.  कोकणातील दाभोळ शेजारचे एक छोटेसे गाव वणंदगाव पाच-पंचवीस लोकांची वस्ती होती. तिथे एकुलते एक घर भिक्कु धोत्रे यांचे होते. ते दाभोळ बंदरात माशांच्या  पाट्या वाहून नेण्याचे काम करत. त्यांची पत्नी रुक्मिणीबाई शेण गोवर्या थापायची. भिक्कू धोत्रेचा भाऊ व मेहुणा मुंबईला होते. 


भिक्कू धोञे यांनी आपले नाव बदलून वलंगेकर असे केले.ते मुंबईला अधूनमधून जायचे म्हणुन घरी टापटीप पणा असायचा. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. नंतर त्यांना रमा,गौरी आणि शंकर  असे मुले होती. माता रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९७  साली झाला.रमा  सकाळी उठून आईला मदत करायची. शेण गोवर्या थापायची. पाणी भरायची. रुक्मिणीबाईने  रमायला व्यवहार ज्ञान शिकवले.कोणाची निंदा करायची नाही. आपले  काम नीट करायचे. एक दिवस रमाईच्या आईचे निधन झाले. तिच्या पाठोपाठ वडिलही गेले. रमा काका  व मामा सोबत भावंडांना घेऊन मुंबईला आली.पाहता पाहता रमा नऊ  वर्षाची झाली. परळीच्या डबक  चाळीत राहणारे सुभेदार रामजी सपकाळ यांचा मुलगा इयत्ता नववीत शिकत होता. वाचन म्हणजे जीवन जीवन म्हणजे वाचन असे त्यांचे ध्येय होते. कोणीतरी सुभेदाराला भिक्कू वलंगेकराची  मुलगी सुचविली. सुभेदाराने रमाला बघितले बघताक्षणीच सुभेदारांनी  तिला पसंत केले. 


रमाला आई-वडील नाही आपण तिचे आई-वडील होऊ असा विचार सुभेदारांनी केला. भायखळ्याच्या मासळी बाजारात बाजार भरण्यापूर्वी सकाळी सकाळी रमा भिमाचे  लग्न पार पडले. सुभेदाराचे घर कबीर पंथीय होते. सकाळी उठल्यावर कबीराच्या ओव्या अभंग सुरू राहायचे.भीमराव शाळेत जायचे. रमाई खिडकीतून बघायची. भिमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले सुभेदारला मोठा आनंद झाला. रमाने सारे घर सांभाळले. सर्वांची ती  लाडकी  होती.भीमरावाला वाटायचे रमाने शिकले पाहिजे. पण घरातून वेळ मिळेना. भीमराव म्हणाले "रामी ज्याला इतिहास माहित नसतो त्याला तो घडवता येत नाही म्हणून तू शिकलं पाहिजे".


 भिमरावांनी  रमाईला शिकवले.रमाई पुस्तके  वाचू लागली. त्याच काळात रामाईने एका गोजिरवाण्या बाळाला जन्म दिला. तो म्हणजे यशवंत होय. भीमराव बाप झाले.रमाई आई झाली. भीमराव बडोद्याला गेले. इकडे सुभेदार आजारी पडले. भीमरावांना तार करून बोलविण्यात आले.तेवढ्यात सुभेदार म्हणाले "माझ्या बाळा लांब जाऊ नकोस, तुला वादळाशी झुंज द्यायची आहे,आगीशी  सामना करायचा आहे. हजारो डोळे तुझ्याकडे आशेने पहात आहेत. त्यांचा तू आधार हो. अंधारात चाचपडणाऱ्याना तू प्रकाश दाखव. हजारो हातांनी सामना करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे." तेवढ्यात सुभेदाराने डोळे मिटले.रमाई आक्रोश  करून रडू लागली. कारण रमाचा आधार सुभेदार होते.भीमराव ढसाढसा रडू लागले. 


भीमराव करारानुसार बडोद्याला नोकरीला गेले.पण तेथेही अपमानास्पद वागणुक मिळाल्यावर बडोदा नरेशांनी त्यांची बीनशर्थ मुक्तता केली.त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. रमाई च्या डोळ्यात अश्रु आले.भिमरावांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळविला.बाबासाहेबांनी   रमाईला पत्र पाठवले. तुझे आभार कसे मानावे कळतच नाही. शर्यतीत जिंकलो तर देशाला उजेडात उभे करीन इथे जातीयता नसल्यामुळे माझ्या मध्ये एक नवी शक्ती संचार करीत आहे. या शक्तीचे रूपांतर वादळात होईल. या वादळाच्या पाठीशी तुला उभे राहायचे आहे." भीमराव अमेरिकेत ज्ञानाचे शिखर गाठत होते. तर रमा परिस्थितीशी झुंज देत होती.उन पावसाचा सामना करीत होती. तिचा संसार सांभाळत होती.यशवंताचा आजार चालूच होता. दुसरा मुलगा रमेश त्याचा अंत झाला. ज्याच्या छातीवर डोके ठेवून रडायच ते बाबासाहेब कोसो दूर होते.


बाबासाहेबांनी दोन-तीनशे पुस्तके पाठवली होती ती बोट बुडाली. नुकसानभरपाई म्हणून सहाशे रुपये मिळाले. बाबासाहेबांनी प्राध्यापकाची नोकरी केली. पहिला पगार रमाला दिला. सहाशे रुपये मिळाले.रमाईने त्यातून सर्वांना कपडे खरेदी केले.


 बाबासाहेबांना  वाटलं रमाई पैशाची अशी उधळपट्टी करू लागली तर आपल्याला परत परदेशात शिक्षणाला जाता येणार नाही. म्हणून त्यांनी रमाईला समजून सांगितलं आणि मला पुन्हा परदेशात जायचं आहे याची कल्पना दिली. त्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे ही गोष्ट रमाईच्या लक्षात आणून दिली त्यानंतर मात्र रमाईने  कधीच  पैशाची उधळपट्टी केली नाही. अत्यंत काटकसरीने संसार केला. भाजी भाकरी वाया जाणार नाही तेवढीच बनवायची दोन काड्यापेट्या महिनाभर पुरवायची. त्याच काळात रमाईने एका मुलीला जन्म दिला परंतु तीही गेली. 


बाबासाहेबांनी लंडनला जायचे ठरवले रमाईला अतिव दुःख झाले.पण त्याच क्षणी  सुभेदाराचे शब्द रमाईच्या  कानावर पडले आणि ती जागी झाली. सारे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा असे म्हणून बाबासाहेबांना कायमचे संसाराच्या पाशातून मुक्त केले भीमराव ७ जुलै १९२०ला मी लंडनला गेले. पतीला निरोप देताना तिला असंख्य यातना होत होत्या. परंतु ती त्यांच्या दिग्विजयासाठी झटत होती. शंकर नोकरीला जायचा. त्यात ती  चार भाकरी करायची १ मुकुंदाला,१ यशवंताला,१ शंकरला आणि उरलेली १  रमाई लक्ष्मीबाई आणि गौरी वाटून खायच्या. पैसे नसल्यामुळे रमा वरळीला जाऊन  शेण गोवर्या थापायची आणि संध्याकाळी दादरला जाऊन सरपण गोळा करून आणायची.  पैसे संपले तेव्हा रमाईने बाबांना पत्र लिहिले बाबासाहेब म्हणाले मी इकडे पाण्यात  पाव भिजवून खात आहे.दागिने मोडून घर चालव. मी आल्यावर दुसरे दागिने करून देईल. रमाईने तिच्या वाटयाचे जेवणाचे पैसे बाजूला ठेवून १३ रुपये जमा केले व लंडनला मनीऑर्डर करून पाठवले तेव्हाच तिने अन्नाला स्पर्श केला.गंगाधरचा मृत्यू झाला. बाबासाहेबांनी पत्रात रमाचे सांत्वन केले. १५ जून १९२४ ला राजरत्न चा जन्म झाला. राजरत्न  बाबासाहेबांचा अत्यंत आवडता होता. लहानपणापासून ते त्याला म्हणायचे तू खूप मोठा हो.मी तुला खूप मोठा करणार आहे. ते सुद्धा लेकरू मेलं.


रमाई भिमरायाचा जयजयकार करताना हे माहीत असलं पाहिजे. ते सुद्धा लेकरू औषधावाचून मेलं.  मेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धायमोकलून रडू लागले. तेवढ्यात एक माणूस जवळ आला.अन् बाबासाहेब  आंबेडकरांना म्हणाला "साहेब नवा कपडा आणायला पैसे द्या.पण खिशात  नवा कपडा आणायला सुद्धा पैसे नव्हते. मोठमोठ्याने रडु लागले.रमाईच्या  लक्ष्यात आल की साहेबांनाच दुःख काय ? दुःखात भर पडली. रमान घरातून एक नाटीचा तुकडा आणला.आणि त्यात गुंडाळून राजरत्नच दफन केल.


रमाई म्हणजे त्याग मूर्ती, रमाई  म्हणजे करुणेचा सागर, रमाई म्हणजे प्रेमाचा अखंड झरा. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या धारवाडच्या वस्तीगृहात ३० - ३५ मुले होती.बोर्डिंगला अनुदान रूपात  मिळणारी रक्कम खूपच अपुरी होती. त्यामुळे बाबासाहेबांना बोर्डिंगच्या मुलांचा खर्च भागवण्यासाठी धारवाडचे सावकार व शेतकरी अन्नधान्यासाठी व इतरही मदत करत.बळवंतराव वराळे ते बोर्डिंगचे अधीक्षक होते.बोर्डिंगचा  सर्व कारभार ते पहात असत. बाबासाहेब परदेशात गेल्यावर रमाबाई एकदा धारवाडला गेल्या. बळवंतराव सामाजिक सुधारणा व जिल्हा लोकल बोर्डाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यावेळी लोकल बोर्डाच्या निवडणुकीचा काळ होता. वराळे साहेब हे  निवडणुकीत थोडे व्यस्त असल्यामुळे बोर्डिंगच्या अन्नपुरवठ्याकडे लक्ष देऊ शकले नाही व बोर्डिंगचे धान्य संपले.


रमाबाई दररोज बाहेर मुलांची धिंगामस्ती पहात पण त्या  दिवशी बोर्डिंगच्या आवारात  एकही मुलगा नव्हता. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती.मुले ऐवढी शांत का झालीत म्हणून रमाईने चौकशी केली. तेव्हा कळले की दोन दिवस झाले वस्तीगृहातील अन्नधान्य संपले आहे व सावकार पाठीमागची उधारी दिल्याशिवाय अन्नधान्य द्यायला तयार नाहीत. तेव्हा रमाईने बळवंतराव बोलावून घेतले. व रमाईने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या आणि सांगितले की  हे दागिने  कोणाकडेतरी गहाण ठेवा. साहेब आल्यावर सोडून आणता येतील परंतु मुलांच्या जेवणाची ताबडतोब व्यवस्था करा म्हणणारी त्याग मूर्ती रमाई किती मोठ्या मनाची होती हे कळते.माता रमाई ज्यावेळी महाडच्या सत्याग्रहची तयारी चालू होती, त्यावेळी माता रमाई ने बाबासाहेबांना विनंती केली की, मला येऊ द्या त्या सत्याग्रहाला. मला पाहायचाय तो सत्याग्रह. बाबासाहेब म्हणाले रामू त्या ठीकाणी  जवळपास दहा हजार लोक जमणार आहेत त्यांचा स्वयंपाक तुला करावा लागेल. तू करू शकशील एवढ्या लोकांची व्यवस्था.रमाई म्हणते  साहेब कितीही लोक येऊ द्या मी रात्रंदिवस स्वयंपाक करील.रमाने येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी दहा हजार लोकांचा स्वयंपाक बनवावा लागेल असं सांगितलं.कारण बाबासाहेबांनी हेरल होत  माता रमाई ची तब्येत बरोबर नव्हती.माता रमाईची  तब्येत ढासळत चालली होती.बाबासाहेबांनी शेवटी स्पष्ट  शब्दात नकार दिला.रमा  तुला येता येणार नाही.


रमाने तरीही ठरवलं काय होतय बाबासाहेब पुढे गेले  की आपणही मागून जावं.किंवा बाबासाहेब ज्या  गाडी जाणार आहेत त्या गाडीत अगोदरच जाऊन बसावं तिथून थोडेच  काढून देणार आहेत.बाबासाहेबांनी  तोही रमाचा डाव ओळखला आणि कार्यालयातून परस्पर महाडच्या सत्याग्रहाला  निघून गेले. आणि नंतर रमाईला माहीत झाल.माता  रमाईला  याच्यासाठी त्या  महाडचा सत्याग्रहात जायच होतं की रमाईच्या कानावर आजूबाजूकडून कुजबुजत येत होती की बाबासाहेबांसोबत काहीतरी दगाफटका होणार आहे. म्हणून माता रमाईला  तिथं जायचं होतं. आणि झालंही तेच बाबासाहेबांवरती  तिथे दगाफटका झाला. लोकांनी दगडफेक केली आणि त्या दगडफेकीत बाबासाहेबांच्या डाव्या खांद्याला इज्जा झाली. आणि त्याच वेळेस  माता रमाईच ह्रदय चिरल्या गेल आणि त्या चिरलेल्या ह्रदयामध्ये क्षय रोगाने शिरकाव केला.


 बाबासाहेबांवर झालेला आघात पाहून माता रमाई  चिंताग्रस्त झाली आणि माता रमाईला  क्षय रोगानं ग्रासल गेलं. या क्षयरोगानं  ग्रासलं असतानाही माता रमाई बाबासाहेबांना थांगपत्ता लागू देत नव्हती. गेल्या तीन महिन्यापासून माता रमाईची प्रकृती खालावत चालली होती.क्षय रोग त्यांना सोडत  नव्हता.रमाई एकदा साहेबाला म्हणाल्या साहेब मला एकदा पंढरपूरला घेऊन चला. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले काय रामू  पंढरपुर घेऊन बसलीस तिथही  मंदिराच्या बाहेरूनच पायरी पासूनच वापस यावं लागत.आत नाही जाता येत. हे बघ एक दिवस असा येईल की मी तुझ्यासाठी नव पंढरपूरच  निर्माण करील. तुझ्यासाठी सुखच सुख असेल तो दिवस रमाईच्या वाट्याला आलाच नाही.शेवटी रमा आजारी पडली हाडाचा सापळा झाला.


डाॕ.बाबासाहेब  आंबेडकर रमाईजवळ बसून आहेत.रमाच डोक त्यांनी  आपल्या मांडीवर घेतलेल आहे.रमाईच्या डोक्यावरून हात फिरवून डाॕ.बाबासाहेब आंबेडकर  म्हणाले रामू तुला आयुष्यात कधीच सुख मिळालं नाही कारण रमाई चे आई वडील लहान पणीच मेले होते.आई वडीला वाचून पोरकी झालेली ही पोर आईचा मृत्यू झाल्यानंतर सहाच महिन्यात वडील वारले होते रमाईचे. रमाईला दोन छोटे भावंडं होती. मरताना वडील म्हणाले तुला स्वतःलाच पंख फुटले नाहीत हे दोन लेकर तुझ्यावर सोडून मला माझा प्रवास थांबवावा लागतो.काय करशील? आई सुद्धा नाही आणि मी सुद्धा मरतोय. तुलाच आणखी मृत्यू चा अर्थ नीट कळला नाही दोन लेकर  तुझ्यावर सोडून जातोय अरे आभाळ कोसळलं.डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हापासून चा इतिहास,रमाईच जीवन माहीत होतं. गेल्या तीन महिन्यापासून माता रमाईची प्रकृती खालावत चालली होती.क्षय रोग त्यांना सोडत नव्हता. बाबासाहेबांनाही कळून चुकलं होतं की हा क्षयरोग माता रमाई ला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचे दौरे चालू होते. पाहटे साडेचार वाजता बाबासाहेबांना कुणकुण लागली की माता रमाई सोबत आज काहीतरी घडेल. तरी बाबासाहेब कामावर गेले बाबासाहेब थांबले नाहीत.  संध्याकाळी आठ-साडेआठ वाजता बाबासाहेबांना कळलं  आता मात्र माझ्या रमाचे श्वास वाढायला लागलेत. आयुष्यभर रमाची  एक छोटीशी आशा पूर्ण करू शकलो नाही.त्या रमासोबत आज तरी बसून थोडस बोलावं. रमाच डोकं बाबासाहेबांनी मांडीवर घेतलेलं आहे. रमाचा हात हातात घेतला. रमाई बाबासाहेबांकडे बघून हसल्या. बाबासाहेब रात्रभर रमाच्या जवळ बसून होते आणि एकच विनंती करीत होते रमा तू जाऊ नकोस.  


बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते "रामू लहानपणी तुझी आणि सुखाची कधी भेट झाली नाही.माझी पत्नी झालीस  तरी कधीच मी तुला सुख देऊ शकलो नाही.आयुष्यभर दुःखानी कधीच तुझी पाठ सोडली नाही.मी तुला वेळ दिला नाही रामू".  रमाई म्हणाली  "जाऊद्याना साहेब तुम्ही आयुष्यभर मला वेळ दिला नाही त्याच कारण अस थोडच होत की तुम्ही कुठतरी जाऊन मौज मजा करत होतात. समाजासाठी आयुष्य देणारे तुम्ही मला नाही वेळ मिळाला म्हणुन काय झालं. या देशाच्या समग्र लोकांच्या कल्याणासाठी झटता मला भूषण आहे तुमचं. स्वाभिमान वाटतो की तुम्ही माझे पती आहात. जाऊद्या आयुष्यभर तुम्ही मला वेळ दिला नाही पण मरताना तरी तुम्ही माझ्यासोबत आहात" ऐवढे बोलून रमाने २७ -  मे १९३५रोजी सकाळी ९ वाजता आपले प्राण सोडले..


बंधूंनो आणि भगिनींनो हृदयाला भेगा पाडणारा  इतिहास आपणाला माहीत पाहिजे.तिच्या मनात कोणत्या वेदना होतात हे माझ्या नवऱ्याला कळू नये असं म्हणणारी जगातील एकमेव पत्नी माता रमाई होती. म्हणून माता रमाई विषयी महणावेसे वाटते.. 

शरीराने झिजलीस तू 

कष्टाने थकलीस तू 

दीप बाबांचा झालीस तू

 प्रकाश आम्हा दिलास तू

 रमाई जयंती  निमित्त कोटी कोटी प्रणाम!



लेखक :

 - शंकर नामदेव गच्चे

( एम.ए.बी.एड्.) प्रा.शा.वायवाडी ता.हिमायतनगर

 जि.नांदेड  मोबाईल नंबर -८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

  1. माता रमाई विषयी लेख वाचून प्रत्येक घरातील पत्नीने हा लेख वाचणे गरजेचा आहे असं मला वाटतं म्हणून मी माझ्या व्हाट्सअप ग्रुप वर सर्व हा लेख व त्याची लिंक पाठवलीमनोज कुमार रणदिवे शिरोळसेक्सी 99 22 91 18 99

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा