विज्ञानवादी संत संत गाडगेबाबा

शालेयवृत्त सेवा
0

 



संत गाडगे बाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६  रोजी सेनगाव तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे परीट समाजात झाला.त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर हे आपल्या लोककार्यामुळे कर्मयोगी गाडगे महाराज म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचे  महान कार्य केले. ते नेहमी सांगत देवळात जाऊन नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका. अडाणी राहू नका.  पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देव, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका. अशी शिकवण आयुष्यभर देत असत. खर्चू नका पैसे देवासाठी!  शिक्षणाला पैसा तोच द्या हो!! नका मंदिराची कमवया भर ! छाञ जो हुशार त्यास द्यावा!!नको धर्मकृत्य पैसा खर्चूनिया ! घेण्यासाठी विद्या तोच  खर्चा !! शाळेहून थोर ते नाही मंदिर! देणगीदार  उदार शाळेला द्या !! भक्तीचा प्रचार  नाही श्रेयस्कर ! शिक्षण प्रचार सर्वश्रेष्ठ !! गरिबांनी तरी फेकावा विश्वास !देवाजीची आस पूर्ण खोटी !! नसलेले देव कोठून येणार! कल्याण होणार कधी सांगा!! स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने! शक्तीने,युक्तीने सुखी व्हावे !! 



रोज एका गावात जावं. तहान लागताच पाणी मागावं.भूक लागताच भाकर  मागावी. मागून मिळालं तेवढंच खावं.झाडाखाली  झोपावं. सकाळी नदीत पोहावं. हा संत गाडगेबाबांचा  दिनक्रम त्यांचा अवतार बघून लोकांनी हिणवावं. कुणी वेडा म्हणून दगड मारावेत,भिकारी समजून अपमानित  करावं.अंगरखा  फाटल्यावर एखाद्या बाईकडून सुईदोरा मागवून घ्यावा.चिंध्यांना टाके घालावेत. लोक त्यांना गोधड्या बाबा किंवा चिंध्यावाला बाबा म्हणायचे. 



त्यांच्या हातात गाडगे असल्यामुळे कुणी त्यांना गाडगे बाबा म्हणायचे.बघता बघता गाडगे बाबा हेच नाव रूढ झालं. गाडगेबाबा म्हणजे स्वच्छता.ते दिवसा गटार रस्त्याची घाण साफ करायचे व रात्री आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूतील घाण साफ करायचे.संत गाडगेबाबा एका गावात कधीच थांबत नसत. दिवसा गाव साफ करताना ते लोकांची मदत  करायचे. एखाद्या शिकलेल्या मुलाला पकडून त्यांच्याकडून संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचून घ्यायचे. रात्री त्याच अभंगावर कीर्तन करायचे. 



सकाळी उठले की ते फिरत फिरत कोणाच्या शेतावर जात. रस्त्यांनी चालताना ओझे घेऊन  जाणारी एखादी बाई दिसली की तिच्या डोक्यावरचे ओझे स्वतःच्या डोक्यावर घेऊन तिच्या घरी नेऊन पोहोचवत. कोणाला नांगरायला  मदत करत. तर कोणाला खुरपायला मदत करत. औत  हाणता हाणता  तुकोबाचे गोड अभंग गुनगुनत.आंधळ्याला  रस्ता दाखवत. पांगळयांना पाठीवरून नेऊन सोडत.  कधी कुष्ठरोग्यांच्या जखमा धूत लोकांना माणवतेचा  अर्थ सांगत. माणसासाठी ते झिजले. जगासाठी जगले. जगता जगता समाजामध्ये शिकले. समाजाला जाणून घेतलं. 


समाजाचे प्रश्न कीर्तनातून मांडले. रात्रीच्या किर्तनाला गावकरी एकत्र जमत. कुणी टेंभा पेटवून उजेड करत. कुणी टाळ, मृदंग, पेटी घेऊन येत.काही लोक हसत. टिंगल करीत. काही जण रागाने निघून जात. मग बाबा दोन हातात  दोन दगड घेत.  गोड आवाजात भजन म्हणत. त्यांचा गोड आवाज ऐकून लोकांचे पाय मागे वळत. लोकांना ते सांगत कर्ज काढू नका. कोण्या देवाची यात्रा करू नका.गाई-बैलांना पोटच्या लेकराप्रमिणे सांभाळा. घरात उपाशी रहा, अंगावर फाटके कपडे घाला,पण तुमच्या पोराबाळांना शिकविल्याबिगर राहू नका.कोण्या देवाला नवस करू नका. देवाला कोंबड्या बकऱ्यांचा नैवेद्य दाखवू नका. ज्याला भाकर हवी त्याला भाकर द्या. ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या.ज्याला भूक लागली त्याला भाकर द्या. हुंडा घेऊ नका. हुंडा देऊन पोरीचे लग्न करू नका. घरात दारू आणू नका. बाहेरून दारू पिऊन येऊ नका.



माणसातच देव शोधा. माणूस धर्माची पूजा करा माणुसकीने वागा. ज्यांनी कृषि निर्माण केली ज्यानी आकाश बनवलं ज्यांनी  निवारा तयार केला ज्यांनी  माणूस बनवला तो देव कोंबडं-बकरं खाईल का ? देवाला नवस करू नका. देव काही खात नाही.देव काही मागत नाही. दगडात देव नसतो. माणसात देव असतो.रंजल्या गांजलेल्यांच्या सेवेतच देव भेटतो. आंधळ्याला हात द्या. पांगळ्याला पाठ द्या. सत्यनारायण कोण करतो? जो लोभी असतो ज्याला गाडी मिळत नाही, पैसा मिळत नाही,  पोर होत नाहीत मग कर सत्यनारायण. सत्यनारायण करून वाण्याची बुडालेली नौका कधी वर आली नाही. फसवणूक हाय ही लोकांची.गरिबांवर दया करा. हाच खरा माणूस धर्मा आहे. बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. बाबा निरक्षर होते पण त्यांनी समाजाला शिकवलं, जागवलं, व्यक्तीधर्म,कुटुंबधर्म, समाजधर्म, राष्ट्रधर्म आणि माणूस धर्म शिकवला.  



एकदा गाडगेबाबा वर्धा जिल्ह्यात असताना गांधीजीच्या निमंत्रणावरून त्यांना भेटण्यासाठी ते सेवाग्राम येथे गेले. आसपासच्या लोकांना गाडगेबाबा सेवाग्रामला आल्याची बातमी समजली प्रचंड जनसमुदाय जमा झाला. गांधीजीच्या सांगण्यावरून गाडगेबाबांनी तिथे कीर्तन केले. गाडगेबाबांची लोकप्रियता आणि सरळ स्वभाव पाहून महात्मा गांधी मंत्रमुग्ध होऊन गेले. हा स्वच्छ अंतः करणाचा संत गांधीजींना प्रभावित करून गेला. महात्मा गांधीने संत गाडगे बाबाना  विचारले आपली प्रॉपर्टी किती ? बाबा म्हणाले काही नाही फक्त काठी, गाडगे व गोधडी माझी आहे. मृत्यूनंतर तीही जनतेच्या  हवाली महात्मा गांधी म्हणाले "मैने आज तक ऐसा सच्चा संत देखा नही, बाबा आप एकीही  महान निर्मोही त्यागी संत हो!" असे म्हणून गांधीजीने गाडगे महाराजांच्या पायावर डोके ठेवले.


५ मे १९२३ रोजी गाडगे महाराजांचा मुलगा गोविंद  मरण पावला.खारेपाटण रत्नागिरी येथे महाराजांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात त्यांनाही वार्ता समजली. महाराज एक मिनिट शांत झाले आणि म्हणाले, मेले असे कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी" डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाल्यावर मात्र गाडगे महाराज दिनांचा कैवरी गेला म्हणून  हंबरडा फोडून रडत होते. शेवटी त्यांनी बाबासाहेबांच्या निधनामुळं  स्वतःला कोंडून घेतल व अन्न त्याग केला.  आणि शेवटी १४ दिवसांनंतर आपला प्राण सोडला.असा हा  महान त्यागी संत २० डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!                        



लेखक - शंकर नामदेव गच्‍चे 

नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)